Monday, January 16, 2012

युबंटू : नविन युगाची संगणक प्रणाली


पीसी अर्थात वैयक्तिक संगणकाची निर्मिती झाल्यापासूनच ऑपरेटिंग सिस्टिम (संगणक प्रणाली) चे युद्ध संगणक विश्वाला ज्ञात आहेत व या शीतयुद्धाची तीव्रता वर्षागणिक वाढतच आहे. आज घडीला सर्वात जास्त वापरण्यात येणारी संगणक प्रणाली म्हणजे मायक्रोसॉफ़्ट विंडोज होय. मायक्रोसॉफ़्ट कंपनीने व्यावसायिक दृष्टीकोनातून तीची २५ वर्षापूर्वी निर्मिती केली होती. तेव्हापासून आजपर्यंत या कंपनीने ऑपरेटिंग सिस्टिम क्षेत्रात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. असे असले तरी आज ९० टक्के संगणकांत वापरण्यात येणाऱ्या विंडोज ह्या पायरेटेड अर्थात विनापरवाना वापरण्यात येत आहेत. याचे कारण म्हणजे ही संगणक प्रणाली वापरण्यास सोपी असून बरेचशे सॉफ़्टवेअर हे विंडोज साठीच बनविण्यात येतात.
आयटी क्षेत्रात सॉफ़्टवेअर विक्रीच्या माध्यामातून मोठ्या प्रमाणात पैसा येत असला तरी अनेक अभियंत्यांची अशी विचारधारणा आहे की, किमान संगणक प्रणाली तरी संगणक वापरकर्त्याला मोफ़त व विनापरवाना उपलब्ध व्हावी. FOSS कम्युनिटी व ओपन सोर्स फ़ाउंडेशन ह्या संस्था या तत्वावर कार्य करत आहेत. पुर्णपणे मोफ़त उपलब्ध असणारी संगणक प्रणाली म्हणजे ‘लिनक्स’ होय. ओपन सोर्स फ़ाउंडेशन कडून लिनक्स प्रणालीचा जोरदार प्रचार केला जातो. आज ती वापरण्यास सहज सोपी असली तरी अभियंत्यांखेरीज तीचा वापर जास्त प्रमाणात केला जात नाही.
१९९१ मध्ये लिनक्स टॉरवर्ल्डस याने लिनक्स संगणक प्रणालीची निर्मिती केली. तेंव्हापासून ती पुर्णपणे खुली व मोफत वितरीत होणारी संगणक प्रणाली आहे. जगातील अनेक कंपन्यांनी स्वत:ची संगणक प्रणली तयार केली आहे. एकेकाळी लिनक्स म्हणजे ’रेडहॅट’ हेच नाव समोर यायचे परंतू आज अनेक लोकप्रिय व वापरण्यास सोप्या लिनक्स इंटरनेटवर उपलब्ध आहेत. त्यात युबंटू, डेबियन, फ़ेडोरा, मॅंड्रिव्हा, ओपन सुसे, मिंट, आर्च लिनक्स अशा ऑपरेटिंग सिस्टीमची नावे घेता येतील यातील प्रथम क्रमांकाची संगणक प्रणाली म्हणजे युबंटू होय.
सन २००४ मध्ये कॅनॉनिकल या ब्रिटनास्थित कंपनीने युबंटु या संगणक प्रणालीची निर्मिती केली. ती तयार करण्यामागचा मुख्य हेतू असा होता की, प्रत्येकाला अगदी सहजपणे मोफ़त संगणक प्रणाली द्वारे संगणक हाताळता यावा. डेबियन प्रणालीवर आधारीत युबंटूने हे ध्येय आजवर साकारत आणले आहे. आफ़्रिकन शब्द युबंटूचा अर्थ होतो – ’इतरांसाठी मानवता’. त्याचा सविस्तर कार्यानुभव युबंटू संगणक प्रणालीने संगणक विश्वात दाखवून दिला आहे. त्यामुळेच केवळ सात वर्षात ती जगातील सर्वात लोकप्रिय मोफ़त संगणक प्रणाली ठरली. आज कोट्यावधी संगणक वापरकर्ते विंडोजला पर्याय म्हणून तीचा वापर करत आहेत. युबंटु फ़ाउंडेशनतर्फ़े तीला विकसित केले जाते. शिवाय तीच्यामध्ये येणारे सर्वच सॉफ़्टवेअर्स संगणक विश्वातील GPL (General Public License ) नुसार मोफत देण्यात येतात.
ओक्टोबर २०११ मध्ये युबंटूची ऑनेरिक ऑसिलॉट हे कोडनेम असणारी ११.१० ही आवृत्ती तयार झाली. दर सहा महिन्यांनी म्हणजेच साधारणत: मार्च व ऑक्टोबर मध्ये तीची नविन आवृत्ती तयार होते व ती इंटरनेटवर www.ubuntu.com  ह्या अधिकृत संकेतस्थळावरुन मोफ़त डाऊनलोड करता येते. याकरीता लागणारी सर्व माहीती युबंटूच्या वेबसाईट्वर उपलब्ध आहे. क्लाउड कॉम्प्युटिंग या नव्या तंत्राचा प्रभावीपणे वापर युबंटूमध्ये करण्यात आलेला आहे. त्याद्वारे आपली सर्व माहिती आपण युबंटूच्या कोणत्याही संगणकावरुन काढू शकतो. गुगल क्रोम या प्रणालीनंतर ही सुविधा केवळ युबंटूमध्ये देण्यात आली होती.
आजही बहुतांश कंपन्या ह्या विंडोज ऐवजी मोफत उपलब्ध असणारी लिनक्स पुरस्कृत करत आहेत, त्यामुळे केवळ प्रणालीचाच नव्हे तर एण्टिव्हायरस व इतर अनेक सॉफ़्ट्वेअर्स विकत घेण्याचा खर्चही वाचतो. म्हणून अशी ही युबंटू लिनक्स प्रणाली वापरण्यास काय हरकत आहे?

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com