Wednesday, October 21, 2020

गावकुसातील जित्राबं - भरत आंधळे

प्रत्येक गाव हे विविध प्रकारच्या लोकांनी भरलेलं असतं. त्यात निरनिराळ्या प्रवृत्तीचे, स्वभावाचे, शरीरयष्टीचे व व अतरंगी लोक भरलेले असतात. प्रत्येकाची मानसिकता वेगळी, दृष्टिकोन वेगळा आणि जीवन जगायची पद्धतही वेगळी असते. अशाच गावातील विविध व्यक्तींचे चित्रण लेखक भरत आंधळे यांनी त्यांच्या "गावकुसातील जित्राबं" या पुस्तकांमध्ये केलेले आहे. लेखकाचं नाशिक जिल्ह्यातील एक छोटस गाव. या गावात १९९० च्या दशकामध्ये होऊन गेलेल्या विविध व्यक्तींचे व्यक्तिचित्रण या पुस्तकांमध्ये केले गेलेले आहे. मी स्वतः १९९० च्या दशकामध्ये ग्रामीण भागात मोठा झालो असल्याने गावाकडची लोक कशा प्रकारची अवलिया असतात, हे जवळून पाहिलेले आहे. त्यामुळे हे लेखन लगेच भावले. वेगळ्या नावाची किंबहुना अशीच व्यक्तीचित्रण असणारी लोक आपल्या आजूबाजूला होती. किंबहुना ती सर्वच गावांमध्ये असतात. अनेक जण स्वार्थीपणाने कार्य करतात, काहीजण मनमौजी असतात, काहीजण मिळेल ते काम करतात, काहीजण नित्यनेमाने आयुष्यभर एकच काम करत असतात, काहींना पर्याय नसतो तर काहींना नवीन विचारसरणीचे व राहणीमानाचे आकर्षण असते. अशी अनेक माणसे या पुस्तकातून आपल्याला भेटून जातात. गावाकडच्या व्यक्तींसोबतच तिथल्या राहणीमानाचेही दर्शन होते.
आज बहुतांश लोक पुणे-मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये स्थलांतरित होत आहेत. शिवाय गावाकडील राहणीमानही वेगाने बदलत चाललेले आहे. निश्चितच त्याचा परिणाम गावगाड्यावर होताना दिसतो आहे. परंतु मागील शतकाच्या उत्तरार्धामध्ये जे ग्रामीण जीवन आमच्यासारख्यांनी अनुभवले, कदाचित ते पुढच्या पिढ्यांना अनुभवयास मिळणार नाही.
या पुस्तकातील प्रत्येक पात्र वेगवेगळे आहे. ते आपल्याला काहीतरी गोष्ट शिकवून जाते. त्यात जगावे कसे किंवा कसे जगू नये? या प्रश्नाचेही बहुतांशी उत्तर मिळून जाते. पु. ल. देशपांडे यांच्या "व्यक्ती आणि वल्ली" मधील विनोदी पात्रे या पुस्तकामध्ये नसली तरी अत्यंत साध्या ग्रामीण व्यक्ती आपल्याला त्यातून भेटून जातात. विशेष म्हणजे लेखकाने प्रामाणिकपणे आपल्या वडिलांचे प्रतापही व्यक्तिचित्रणाद्वारे या पुस्तकातून मांडले आहेत. ग्रामीण व्यक्ती व जीवन शैली अनुभवलेल्या प्रत्येकालाच यातील प्रत्येक पात्र जाणून घेण्यात निश्चितच आनंद वाटेल.
 

 

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com