Saturday, October 31, 2020

ध्रुवांगल पथीनारू

पहाटे साडेचारची वेळ. तीन मित्र पार्टी करून भर पावसात आपल्या कारने घरी चालले आहेत. अचानक त्यांच्या कारसमोर एक व्यक्ती येते. अपघात घडतो. या अपघातात ती व्यक्ती मरण पावते. तिघेही त्या मृतदेहाला कुणाला शंका येऊ नये म्हणून गाडीच्या डिक्कीत टाकून घरी घेऊन येतात. दुसऱ्या दिवशी पोलिसांना रस्त्यावर स्वतःला गोळी झाडून आत्महत्या केलेली एक व्यक्ती सापडते. या घटनेच्या तपासासाठी पोलिस वरील तीन युवकांच्या बंगल्यावर येतात. त्यांची झडती घेतली जाते. परंतु काल मरण पावलेल्या व्यक्तीचा मृतदेह त्यांच्या गाडीच्या डिकीतुन गायब झालेला असतो. थोड्याच वेळात एका फ्लॅटमधून मधून एक मुलगी गायब झाली असल्याची तक्रार पोलिस स्टेशनमध्ये येते. पोलिस स्टेशनमधील इन्स्पेक्टर हा थंड डोक्याने विचार करणारा आहे. तो शांतपणे या सर्व घटनांचा पाठपुरावा करतो व त्यातील संबंध शोधून काढतो. एक अपघात, एक आत्महत्या व एक हरवलेली व्यक्ती यांचा एकमेकांशी काय संबंध असेल? या प्रश्नाभोवती फिरणारा रहस्यपट म्हणजे "ध्रुवांगल पथीनारू" होय. तसा हा चित्रपट फ्लॅशबॅकमध्ये दाखवला आहे. परंतु, शेवट मात्र वर्तमान काळातील आहे. तीन निरनिराळ्या घटनांमधील रहस्य क्षणोक्षणी उलगडत जातं. पण खरा गुन्हेगार कोण? हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. शेवटच्या मिनिटाला या प्रश्नाचे उत्तर मिळतं व कथेचा अनपेक्षित शेवट होतो.
२०१६ मध्ये प्रदर्शित झालेला हा तमिळ चित्रपट कार्तिक नरेन यांनी लिहिला व दिग्दर्शित केलेला आहे. रहस्य पटाची एक वेगळी आवृत्ती यात पहायला मिळते.
 



No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com