Thursday, February 18, 2021

पहिली ठिणगी

गॅसचा लाइटर पेटवताना निघालेली ठिणगी पाहिली की प्रश्न पडतो की पृथ्वीवर आगेची पहिली ठिणगी केव्हा पडली असेल? किंबहुना आधुनिक मानवाने आगीचा पहिला वापर केव्हा केला असेल? अश्मयुगातील या इतिहासात डोकावले की ध्यानात येते की होमो इरेक्टस मानवाने १६ दशलक्ष वर्षांपूर्वी आधीचा सर्वप्रथम वापर केला होता. तसेच चार लाख वर्षांपूर्वीही होमो इरेक्टस आगीवर नियंत्रण मिळवू शकतात, याचे पुरावे सापडले आहेत. होमो इरेक्टस मानवाने केलेली हि प्रगती होमो सेपियन्सने पुढच्या स्तरावर नेली. होमो सेपियन्स अर्थात आधुनिक मानव आगीवर नियंत्रण मिळवू लागला. आकाशातील वीज पडून पृथ्वीवर आग लागते, हे त्यांनी पाहिले होते. शिवाय जंगलातली झाडे एकमेकांवर घासल्यावर देखील ठिणगी पडून आग लागते, हेही त्याच्या ध्यानात आले. त्यातूनच गारगोट्या एकमेकांवर घासून तसेच लाकडे एकमेकांवर घासून देखील आग तयार करता येते, हे मानवाला समजले. आगीवर नियंत्रण मिळवल्यावर एका अर्थाने मानवाला प्रगतीचे नवे द्वार खुले झाले होते. तो अन्न शिजवून खाऊ लागला. आगीमुळे त्याला प्रकाश मिळाला, थंडीपासून संरक्षण करता आले आणि विशेष म्हणजे अन्य जंगली प्राण्यांपासून देखील संरक्षक म्हणून आगीचा त्याला वापर करता आला. आज आगीमुळे शिजवलेले पोषक अन्न खाणारा मनुष्यप्राणी हा जगातील एकमेव प्राणी आहे. जवळपास प्रत्येक क्षेत्रामध्ये आगीचा वापर केला जातो. तो इतका प्रचंड वाढला आहे की तिच्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी विशेष अग्निशामन दलाची गरज भासते.
ऊर्जेचा एक मोठा स्त्रोत असणारी आग मानवी प्रगतीच्या इतिहासात मैलाचा दगड बनून राहिली होती, हे मात्र निश्चित! ओव्हिड हा प्राचीन रोमन कवी म्हणतो की, आग जरी विजत असेल तरी ती कधीच थंड होणारी नाही. आजची सामाजिक परिस्थिती व विविध वैचारिक दृष्टिकोन पाहता, हे बव्हंशी खरे देखील आहे!


 

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com