Wednesday, April 7, 2021

आमा

काठमांडूमधल्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये सायरन वाजवत एक रुग्णवाहिका वेगाने आत येते. एका वृद्ध व्यक्तीच्या डोक्याला जबर मार लागलेला असतो. साठी पार केलेली ती वृद्ध व्यक्ती बेशुद्ध झालेली असते. रुग्णालयातील डॉक्टर लगेचच ऑपरेशन करण्यासाठी सांगतात. त्या व्यक्ती बरोबरच केवळ त्याची साठी पार केलेली वृद्ध पत्नी असते. थोड्याच वेळात धावतपळत त्यांची मुलगी व जावई देखील या रुग्णालयात दाखल होतात. ऑपरेशन करण्यापूर्वी काही लाखांमध्ये रक्कम भरण्यासाठी त्यांना हॉस्पिटलकडून सांगण्यात येते. सदर परिस्थिती जिकिरीची असते त्यामुळे त्या वृद्ध व्यक्तीची मुलगी अर्थात आरती पुढाकार घेऊन ऑपरेशन करायला सांगते. तिचा भाऊ अर्थात त्या वृद्ध दाम्पत्याचा मुलगा परदेशामध्ये राहत असतो. त्यालाही सदर घटनेची माहिती कळविण्यात येते. परंतु तो लगेचच घरी परत देण्यास असमर्थता दर्शवतो. त्याच्याकडून पैशांची जुळवाजुळव सुरू करण्यात येते. मोठा भाऊ परत मायदेशात परत येण्यापूर्वी घरची सर्व जबाबदारी अर्थात आपली आई अर्थात आमा आणि रुग्णशय्येवरील वडिलांची जबाबदारी आरती स्वतःच्या खांद्यावर घेते. इथून पुढचं पूर्ण नाट्य हे रुग्णालयातच घडत राहतं. डॉक्टर रोज नवनवी कारणे सांगून नवनवीन औषधे आणायला सांगतात. वेगवेगळी इंजेक्शन द्यायला लावतात. रुग्णाची परिस्थिती कशी बिकट होत चाललेली आहे, हे संपूर्ण कुटुंबाला समजावून सांगतात. या सर्वांमध्ये त्यांचा बराच पैसा खर्च होत असतो. जमवलेले सर्व पैसे संपत चाललेले असतात. परदेशातील त्यांचा मुलगा फक्त फोनवरच धीर देत राहतो. प्रत्येक फोन गणिक तो मायदेशात परत येऊ शकेल की नाही? याची शक्यता अधिकच धुसर होत जाते. शेवटी हॉस्पिटलचा खर्च जवळपास बारा लाखांपर्यंत जातो. डोक्याला अधिक मार लागल्याने व रक्तस्त्राव झाल्यामुळे ती वृद्ध व्यक्ती केव्हाच गतप्राण झालेली असते. परंतु घरातल्या अन्य सदस्यांना त्याची हॉस्पिटल प्रशासनातर्फे माहिती देण्यात येत नाही. केवळ पैशांसाठी पुढचा तमाशा चालू राहतो. अखेरीस काही दिवसांनी त्या व्यक्तीला मृत घोषित करण्यात येते. तोवर हॉस्पिटलला देण्यासाठी सहा लाखांची थकबाकी शिल्लक असते. हा सर्व घटनाक्रम आरती समर्थपणे सांभाळत राहते. शिवाय आपल्या आईला देखील मोठ्या मुलाप्रमाणेच धीर देत असते. आलेल्या संकटातून कधीतरी बाहेर पडू, याच आशेने ते पुढचे पाऊल टाकत राहतात. अखेरीस रुग्णशय्येवर त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर मात्र त्यांचा मृतदेह पत्नीच्या किंवा मुलीच्या स्वाधीन करण्यात येत नाही. थकबाकी दिल्याशिवाय मृतदेह मिळणार नाही, असे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात येते. तो मृतदेह तसाच बंद शवाघराच्या बाहेर पडून राहतो. या सर्व धकाधकीमध्ये त्यांची पत्नी अर्थात आमा थकून गेलेली असते. आपल्या वडिलांचे अंतिम क्रियाकर्म करायचेच या उद्देशाने आरती पैशांची जुळवाजुळव करते. तिने व तिच्या पतीने "आईवीएफ"साठी जमवलेला सर्व पैसा ती हॉस्पिटलला देऊन टाकते आणि वडिलांचा मृतदेह ताब्यात घेते. अखेरीस आपला भाऊ परत यायच्या आधीच त्यांचे अर्थात आई आणि वडिलांचे अंतिम संस्कार सोपस्कारपणे पार पडते.
अशी स्टोरी लाइन असलेला हा नेपाली चित्रपट आहे आमा! चित्रपटाचे जे पोस्टर रिलीज झाले आहे, त्यावरून हा एक वेगळ्या धाटणीचा चित्रपट आहे, असे लक्षात येते. आणि खरोखरच एक वेगळे कथानक या चित्रपटातून समोर येते. नेपाली चित्रपट म्हणजे आपल्याकडचे भोजपुरी चित्रपट असावेत, असा माझा भ्रम होता. परंतु तो या चित्रपटाने दूर केला. जगातील कोणत्याही चित्रपटाशी तुलना करू शकणारा हा चित्रपट होय. तो संगीत, दिग्दर्शन आणि अभिनय या तीनही बाबींवर उच्च ठरलेला दिसतो. अभिनयाचा विचार केल्यास आरतीची भूमिका साकारलेली सुरक्षा पंता आणि आमाची भूमिका साकारलेल्या मिथिला शर्मा यांचा अभिनय निश्चितच उत्कृष्ट दर्जाचा आहे. शिवाय दिग्दर्शक दिपेन्द्र खन्याल यांची कामगिरी सुद्धा प्रशंसनीय अशीच आहे. विशेष म्हणजे सुरक्षा पंता हिने चित्रपटाच्या शेवटच्या दृश्यासाठी स्वतःचे केस खरोखर कापून घेतले होते! आयएमडीबीवर या चित्रपटाला 8.9 स्टार मिळालेले आहेत. No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com