Thursday, April 29, 2021

मुसाफिर: अच्युत गोडबोले

साधारण तेरा-चौदा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. नाशिकच्या कर्मवीर काकासाहेब वाघ शिक्षण संस्थेने अच्युत गोडबोले यांचे परशुराम सायखेडकर नाट्यगृहामध्ये व्याख्यान आयोजित केले होते. तोपर्यंत मी अच्युत गोडबोले हे नाव केवळ ऐकून होतो. त्यांचं "ऑपरेटिंग सिस्टिम" हे पुस्तक आम्ही अभ्यासक्रमामध्ये 'रेफरन्स बुक' म्हणून वापरले होते. परंतु त्यापलीकडे अच्युत गोडबोले कोण आहेत, हे त्या दिवशी पहिल्यांदाच या व्याख्यानातून आम्हाला समजले. दोन तासात त्यांनी त्यांचा बराचसा जीवन प्रवास उलगडून सांगितला. त्याच वेळेस लक्षात आले की, हा माणूस कोणीतरी एक वेगळाच अवलिया आहे! आयआयटी सारख्या मोठ्या संस्थांमधून पास होणारे विद्यार्थी अशाच प्रकारे असतात, हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण होते. खरतर तेव्हापासून मला अच्युत गोडबोले समजले. मग त्यांचे प्रकाशित होणारे प्रत्येक पुस्तके मी विकत घ्यायला लागलो. 'किमयागार' हे मी वाचलेलं त्यांचं पहिलं पुस्तक होतं. वैज्ञानिकांबद्दल असलेली जुजबी माहिती विस्तृतपणे या पुस्तकातून समजली. मग त्यांची सर्व पुस्तके वाचून काढली. ते जेव्हा-जेव्हा नाशिकला व्याख्यानासाठी यायचे, आमची तिथे हजेरी असायची. शिवाय नाशिकला महाविद्यालयामध्ये काम करत असताना देखील आम्ही त्यांना व्याख्यानासाठी निमंत्रित केले होते. शिवाय माझ्या पहिल्या मराठी पुस्तकाला प्रस्तावना देण्यासाठी मी त्यांना विनंती केली होती. इतके मोठे लेखक माझ्या सारख्या नवख्या लेखकाला प्रस्तावना देतील का? याची शाश्वती नव्हती. परंतु त्यांचा प्रतिसाद अनपेक्षितच होता. चांगली तीन पानांची प्रस्तावना त्यांनी माझ्या पुस्तकासाठी लिहून पाठवली. तसेच नाशिकला आल्यानंतर या पुस्तकाच्या पहिल्या प्रतिवर स्वाक्षरी देखील केली त्यांनी दिली होती. सन २०१२ मध्ये प्रकाशित झालेले ते पुस्तक आजही मी जपून ठेवले आहे. गोडबोले सरांचे आत्मचरित्र लवकरच प्रकाशित होणार आहे, हे समजले तेव्हाच त्याची प्रकाशनपूर्व नोंदणी करून आपला अंक राखून ठेवला होता. परंतु निवांत वेळ मिळत नाही तोवर हे पुस्तक वाचायचे नाही, असे ठरवले होते. कारण इतक्या वेगवेगळ्या विषयांवर लिहिणारा हा माणूस नक्की कसा घडला, हे मला व्यवस्थित जाणून घ्यायचे होते. शेवटी तो योग आलाच सोलापूर सारख्या एका छोट्या शहरात जन्मलेला व मराठी माध्यमातून शिकलेला मुलगा इतक्या उच्च स्तरावर कशापद्धतीने पोहोचला, हा प्रवास निश्चितच प्रेरणा देणारा होता. आमच्या संगणक अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना मी नेहमी त्यांचे उदाहरण देत असे. अच्युत गोडबोले केमिकल इंजिनिअर असूनही संगणकशास्त्रामध्ये त्यांचा किती हातखंडा आहे, ते जरा पहा. हे वाक्य अगदी सहज बोलून जात असलो तरी त्यावर प्रभुत्व मिळवण्यासाठी गोडबोले सरांनी काय मेहनत घेतली होती, याची प्रचिती हे पुस्तक वाचल्यानंतर आली. कधीकधी अनेक घटना माझ्या शैक्षणिक आयुष्याशीही जोडल्या जात असल्यासारख्या वाटत होत्या. स्वतःमध्ये बदल केल्याशिवाय अनुभव येत नाही आणि व्यक्तिमत्त्वही संपन्न होत नाही, हा धडा मात्र निश्चितच गोडबोले सरांच्या एकूण प्रवासातून मिळतो. तो अतिशय प्रेरणादायी आहे. विशेषत: अशा मुलांसाठी जे ग्रामीण भागातून येऊन शहरातल्या वातावरणाला घाबरतात. तसेच इथल्या फाडफाड इंग्रजी बोलणाऱ्या लोकांसमोर मान खाली घालून बसतात. ध्येय, चिकाटी आणि आत्मविश्वास असेल तर आपण कोणतीही गोष्ट साध्य करू शकतो, हे गोडबोले सरांच्या एकंदरीत प्रवासातून जाणवले. त्यांनी त्यांची आवड कधीच सोडली नाही. उलट तिला 'पॅशन' बनवून ते चालत राहिले. म्हणूनच आज देशातल्या यशस्वी लोकांमध्ये त्यांची गणना होते. ते संगणक तज्ञ आहेत, लेखक आहेत, मराठी भाषेचे जाणकार आहेत, तंत्रज्ञ आहेत, अर्थशास्त्रज्ञ आहेत, संगीत विशारद आहेत, मानसशास्त्राचे अभ्यासक आहेत असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपल्याच मराठी मातीमध्ये जन्मले याचा निश्चितच अभिमान वाटतो. धडपडणाऱ्या मुलांसाठी प्रेरणा देणारे व त्यांच्या प्रयत्नांना योग्य दिशा देणारे असे हे पुस्तक निश्चितच आहे. 



No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com