Wednesday, March 9, 2022

एक अनपेक्षित शेवभाजी

महाराष्ट्रीय पदार्थ काही विशिष्ट हॉटेलमध्ये अतिशय चवदार भेटतात. अशाच पदार्थांपैकी एक म्हणजे शेव भाजी होय. नाशिकला असताना मेसच्या डब्यामध्ये आठवड्यातून कमीत कमी दोन वेळा तरी शेव भाजी यायची. त्यामुळे ती खाऊन खाऊन कंटाळा आला होता. म्हणूनच हॉटेलमध्ये गेलो तरी कधीही नंतर मी शेव भाजी खाल्ली नाही! पण इतक्या वर्षांनंतर घारगावच्या एका छोट्याशा हॉटेलमध्ये उत्तम शेव भाजी खायला मिळाली. काही भाज्या विशिष्ट पद्धतीमध्ये बनवल्या तरच छान चवदार होतात. शेव भाजीचं देखील असंच आहे. घारगावच्या 'हॉटेल श्री लक्ष्मी'मध्ये अशीच उत्तम शेव भाजी खायला मिळाली. त्यासाठी आम्ही २५ किलोमीटरचा प्रवास करत (एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात) गेलो होतो!
पुणे-नाशिक महामार्गावर घारगाव हे असे एकमेव गाव आहे, ज्याला बायपास बनवण्यात आलेला नाही. हायवेवरील उड्डाणपूल गावामधूनच जातो. या उड्डाणपुलामुळे गावामध्ये असणाऱ्या छोट्या व्यावसायिकांचा संपर्क हायवेशी तुटलेला आहे. यातीलच एक 'हॉटेल श्री लक्ष्मी' होय. उड्डाणपुलाच्या पूर्वेला खाली हे अतिशय साधे हॉटेल आहे. इथे शेव भाजीची स्पेशल प्लेट मिळते. तसेच आपण दह्याची सुद्धा वेगळी प्लेट घेऊ शकतो. अत्यंत उत्कृष्ट अशी चव या भाजीला आहे. मी कधी विचारही केला नव्हता की, भविष्यात पोट भरून शेव भाजी खाईल! काही गोष्टी अश्याच अनपेक्षित असतात, त्या अशा!
विशेष म्हणजे 'हॉटेल श्री लक्ष्मी' असे नाव असणाऱ्या या हॉटेलचे मालक रऊफभाई शेख नावाचे मुस्लिम आहेत! शहरात असं कधीच बघायला मिळणार नाही. मात्र गावाकडे अजूनही ही परंपरा सुरु आहे, याचे विशेष वाटते. 
2 comments:

  1. व्वा! आवडलं. सहज समजली नाही म्हणून हुडकून कृती अन चित्रफित पाहतोय. मजा आली. कधी खाल्ली नाहीये. एक शंका आहे, शेवेचा कुरकुरीतपणा राहतो ना? :-) बाकी चौपदरीकरण गावातल्या अशा छोट्या व्यावसायिकांची वाट लावतंय. कोकणात तर शेकडो वर्षांपासूनची झाडेही पणाला लागलीत, ते वेगळंच. आता प्रवासी न थांबता वेगाने निघून जाणार. ... :[

    ReplyDelete

to: tushar.kute@gmail.com