Wednesday, November 16, 2022

इंडीजीनियस लँग्वेज

इंडीजीनियस लँग्वेज अर्थात देशी भाषा म्हणजे अशी भाषा जी एखाद्या परिसरातील मूळ रहिवाशांकडून बोलली जाते. भाषा आणि संस्कृती यांचं अतिशय दृढ असं नातं आहे. जेव्हा भाषा नष्ट होते तेव्हा त्या परिसरातील संस्कृती देखील लयाकडे प्रवास करत असते. मागील काही शतकांपासून जगभरामध्ये देशी भाषा लुप्त होण्याचं प्रमाण वेगाने वाढताना दिसत आहे. जगातील सात खंडांमध्ये हजारो प्रकारचे समाज वास्तव्यात आहेत. त्यांच्याद्वारे विविध प्रकारच्या भाषा बोलल्या जातात. मागील हजारो वर्षांचा इतिहास बघितला तर परकीय आक्रमकांनी आपल्या भाषा जगभरातील विविध परिसरांमध्ये नेल्या. हळूहळू त्यातील शब्द स्थानिक भाषेमध्ये यायला लागले. कालांतराने त्यांचा देखील नवीन भाषिक समूह तिथे तयार व्हायला लागला आणि स्थानिक भाषा लुप्त व्हायला लागली.
मागील शतकभरामध्ये हजारो भाषा या लुप्त झालेल्या आहेत. किंबहुना अनेक लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. इसवी सन २०१९ मध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेने देशी भाषांचे वर्ष म्हणून घोषित केले होते. ज्याद्वारे जगभरातून लुप्त होणाऱ्या स्थानिक भाषा टिकाव्यात म्हणून विशेष लक्ष वेधले गेले. परंतु त्याचा फारसा प्रभाव जागतिक समुदायावर पडलेला दिसत नाही. स्थानिक भाषा लुप्त होण्यामागे अनेक कारणे आहेत. परकीय आक्रमकांनी अनेकदा सामूहिक हत्या केल्यामुळे देखील भाषा लुप्त झालेल्या आहेत. तसेच नैसर्गिक आपत्ती देखील काही भाषांच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरलेली आहे. त्याहीपेक्षा मोठे कारण म्हणजे जुन्या पिढ्यांनी आपली भाषा नव्या पिढीकडे हस्तांतरित केली नाही. ही प्रक्रिया देखील अनेक शतकांपासून जागतिक समुदायांमध्ये अनुभवता येते. आज देखील त्यामध्ये बदल झालेला दिसत नाही. 


दक्षिण अमेरिका खंडाचा विचार केल्यास इसवी सन १६०० मध्ये तेथील देशांत सुमारे ५२ भाषा बोलल्या जायच्या. परंतु आज या भाषा जाणणारे अतिशय कमी लोक दक्षिण अमेरिकेमध्ये राहत आहेत. त्यांची टक्केवारी केवळ आठ टक्के इतकी आहे! अन्य लोक परकीय आक्रमकांच्या स्पॅनिश आणि पोर्तुगीज भाषा बोलतात. आज जगामध्ये ६,८०९ भाषा अस्तित्वात आहेत आणि त्यापैकी ९०% भाषा बोलणारे समुदाय एक लाखांपेक्षा देखील कमी आहेत! याचा अर्थ पुढील काही दशकांमध्ये कमीत कमी ६,१०० भाषा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. जगात ४६ भाषा अशा आहेत की ज्या केवळ एकाच व्यक्तीला ज्ञात आहेत आणि ३५७ भाषा या जास्तीत जास्त पन्नास लोकांकडून बोलल्या जातात. अर्थात पुढील दशकांमध्येच या भाषा पूर्णपणे लुप्त होऊन जातील.
आज संगणक व इंटरनेटच्या युगामध्ये केवळ मोठ्या भाषिक समुदायांनाच ग्लॅमर प्राप्त झालेले आहे. याच कारणास्तव छोटे भाषिक समुदाय नव्या भाषांकडे आकर्षित झालेले दिसतात. त्यांना आपल्या मूळ भाषांची व त्या बोलण्याची लाज देखील वाटते. म्हणूनच त्यांची भाषा व संस्कृती लवकरच संपण्याच्या मार्गावर आहे. भारतीय समाज रचना बघितल्यास भारतीय भाषांसाठी देखील काही वेगळी परिस्थिती नाही. जागतिकीकरणाच्या रेट्यामध्ये भारतीय लोक आपल्या भाषांना दुय्यम स्थान देताना दिसत आहेत. जी परिस्थिती दक्षिण अमेरिकेतील भाषांची झाली, तीच भारतीय समुदाय आपल्या मूळ भाषांवर लवकरच आणेल असेही चित्र आहे. म्हणजेच पुढील शतकभरामध्ये भारतातल्या बहुतांश भाषा या नष्ट झालेल्या असतील आणि मुख्य भाषा देखील अल्पमतात गेलेल्या असतील. आपली भाषा आणि संस्कृती याविषयी विशेष आस्था असलेले जगातील समुदायच टिकून राहतील.
मग आपल्या भाषा आणि संस्कृती टिकवायची की तिची हत्या करायची? हे अजूनही भारतीय लोकांच्या हातात आहे!

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com