Tuesday, November 22, 2022

मनमाड-येवला रस्त्यावर

मागील एका घटनेमध्ये जसं मी सांगितलं होतं की कुणीही ट्राफिक पोलीस कर्मचारी वर्दीमध्ये समोर दिसला की तो आपल्याकडे आले आपले गिराईक अशा नजरेने पाहताना आम्हाला जाणवतो आणि त्याच्या तोंडातून गळत असलेली लाळ देखील दिसत असते. नाशिक जिल्ह्यातील किल्ले सर करून परत जात असताना घडलेला हा किस्सा देखील अशाच प्रकारचा आहे.
३१ डिसेंबर २०२१ हा दिवस होता. ३१ डिसेंबर म्हटलं की सगळीकडेच पोलिसांची गस्त असते. मनमाड शहरानजीक असलेल्या अंकाई-टंकाई किल्ल्यांचा ट्रेक करून आम्ही पुन्हा येवला शहराच्या दिशेने निघालो होतो. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गवरून अहमदनगर तसेच पुण्याकडे येणारा हा हमरस्ता आहे. म्हणूनच या रस्त्यावर मोठमोठ्या मालवाहू गाड्यांची सातत्याने वर्दळ असते. अनकाई किल्ल्याकडून येवला शहराकडे येताना अशीच भली मोठी गर्दी या रस्त्यावर झाली होती. साधारणतः सहा ते सात किलोमीटर अंतरावर ट्राफिक पोलीस गाड्यांना अडवताना दिसून आले. बहुतांश गाड्या या मालवाहू प्रकारातील होत्या. ३१ डिसेंबर असल्यामुळे कदाचित वेगळ्या प्रकारची चौकशी चालू असावी, असे आम्हाला वाटले. आमच्या गाडीचा MH14 हा क्रमांक बघून आमची गाडी बाजूला घ्यायला लावली. अगदी दुर्दैवानेच म्हणावं लागेल की १५ डिसेंबरलाच माझ्या गाडीची पीयूसी संपलेली होती! खरंतर यात माझीच चुकी होती की माझ्या ध्यानात राहिले नाही. संबंधित ट्राफिक हवालदाराने मागितलेली सर्व कागदपत्रे त्यांना सुपूर्द केली. फक्त पीयूसीची तारीख निघून गेलेली होती. साहेबांना नवीन बकरा पकडल्याने आनंद झाला असावा. त्यांनी मला बाजूला घेतले आणि सांगितले, 'पियूसीचे हजार रुपये दंड पडतात, तुम्ही दोनशे रुपये द्या आणि निघून जा.' १००० रुपयांचे काम जर दोनशे रुपयांमध्ये होत असेल तर कोणीही ते देऊन निघून जाईल. परंतु मला ते पटत नव्हते. त्यांना मी सरळ सांगितले, "ऑनलाइन फाईन करून द्या. मी भरतो."
पीयूसी नसल्याच्या कारणावरून दंड भरणारा त्यांना मी कदाचित पहिलाच व्यक्ती भेटलो असेल. त्यामुळे ते देखील चक्रावले.
हवालदार पुढे बोलू लागला, "साहेब तुम्ही चांगले दिसता. सगळी कागदपत्रे देखील आहेत. कशाला हजार रुपयाचा भुर्दंड भरताय? त्यापेक्षा दोनशे रुपयांमध्ये तुमचं काम करून देतो! कागदावर दंड देखील लागणार नाही."
त्यांना दोनच शब्दांमध्ये उत्तर दिले, "चालेल मला! करा फाईन."


मग त्याचा देखील नाईलाज झाला. त्याने मशीनमध्ये माहिती टाकली आणि बराच वेळ वाट बघत होता. इंटरनेटला रेंज नसण्याचे कारण सांगून तो शेजारच्या गाडीपाशी असलेल्याच्या दुसऱ्या सहकाऱ्याजवळ गेला व त्याला देखील काहीतरी सांगितले. मग तो त्याच्या जवळचे मशीन घेऊन इकडे आला. त्याने देखील पहिल्याचीच री ओढली. "साहेब तुम्ही चांगले दिसता कशाला फाईन वगैरे भरताय? दोनशे रुपये द्या लगेच गाडी मोकळी करतो."
मी पुन्हा म्हटलं, "साहेब ऑनलाईन फाईन करा. मी भरायला तयार आहे. आधीच्या साहेबांना सुद्धा मी हे सांगितलं आहे. यापेक्षा वेगळं मी काही करू शकत नाही."
मग त्याचा देखील नाईलाज झाला. गाडीला ऑनलाइन फाईन पडला. पण त्यांनी सांगितल्याप्रमाणे तो एक हजार रुपये नसून ५०० रुपये होता! लाखो ड्रायव्हरपैकी पियूसी नसल्यामुळे ऑनलाईन फाईन भरणारा कदाचित मी एकमेव ड्रायव्हर असावा!
दोघांच्याही चेहऱ्यावर आश्चर्यमिश्रित भाव होते. त्यांच्यासमोरच मी आरटीओच्या वेबसाईटवर फाईन भरला आणि गाडी चालू केली. एक मात्र धडा घेतला की लांबच्या प्रवासाला जाण्याच्या आधी गाडीची सगळं कागदपत्रे योग्य आहेत की नाही, हे तपासून घ्या आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोलिसांशी कुठलाही काळा व्यवहार करू नका.

Ⓒ Ⓐ  तुषार भ. कुटे

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com