Showing posts with label translated. Show all posts
Showing posts with label translated. Show all posts

Monday, July 13, 2026

वैभवशाली देशाच्या विदारक लुटीची चित्तथरारक गाथा

प्राचीन भारताच्या अफाट वैभवाचे वर्णन करताना 'एकेकाळी आपल्या देशात सोन्याचा धूर निघत असे' अशी अत्यंत सार्थ म्हण वापरली जाते. हा केवळ एक वाक्प्रचार नव्हता, तर ती आपल्या देशाची खरीखुरी ओळख होती. प्राचीन आणि मध्ययुगीन काळात भारत इतका संपन्न आणि सुबत्त होता की, इथे सोने, हिरे, माणके आणि अमूल्य अलंकारांची अक्षरशः रेलचेल होती. जागतिक व्यापारामध्ये भारताचा मोठा दबदबा होता. तब्बल दोन हजार वर्षांपासून भारतीय साम्राज्ये युरोपीय देशांशी अत्यंत ताकदीने आणि बरोबरीच्या नात्याने व्यापार करत होती. तत्कालीन भारतीय राजे आणि युरोपीय सत्ताधीश संपत्ती तसेच सामर्थ्याच्या बाबतीत समान पातळीवर उभे होते. परंतु, तेराव्या शतकानंतर भारतावर झालेली परकीय आक्रमणे या वैभवशाली देशाच्या मुळावर उठली. विशेषतः या आक्रमणांनी भारतीयांच्या अथांग संपत्तीला जे भगदाड पाडले, ते कायमचेच! 'व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले' हा इतिहासातील धडा आपण सर्वच जण शिकलो आहोत आणि तो या देशाच्या बाबतीत शब्दशः खरा ठरला.

युरोपीय राजसत्तांनी जगभरात वसाहतवादाचे जे विषारी बीज पेरले, त्यातूनच त्यांना इतर देशांवर आधी व्यापार आणि नंतर थेट राज्य करण्याची सोपी वाट सापडली. भारतीय साम्राज्यांकडे असणारी अफाट संपत्ती युरोपीय देशांच्या डोळ्यांत सतत भरत होती. याच संपत्तीची अभूतपूर्व लूट करण्यासाठी पोर्तुगीज, इंग्रज, डच, डॅनिश आणि फ्रेंच यांसारख्या सत्तांनी भारताच्या भूमीवर पाऊल ठेवले. त्यांनी अत्यंत पद्धतशीरपणे इथली राजकीय आणि सामाजिक व्यवस्था आपल्या ताब्यात घेतली. शतकानुशतके त्यांनी स्वतःच्या तुंबड्या भरण्याचे आणि भारताला कंगाल करण्याचे एकमेव काम अत्यंत निष्ठेने केले.

भारताच्या या अमानुष लुटीचा विदारक इतिहास मूळ ब्रिटिश लेखक रॉय मोग्झाम यांनी त्यांच्या 'द थेफ्ट ऑफ इंडिया' या गाजलेल्या पुस्तकात पुराव्यांनिशी मांडला आहे. याच महत्त्वाच्या पुस्तकाचा अत्यंत ओघवता आणि सहजसोपा मराठी अनुवाद लेखिका सरिता आठवले यांनी 'असा लुटला भारत' या नावाने केला आहे. इसवी सन १४९८ ते १७६५ या प्रदीर्घ कालखंडात युरोपीय राजसत्तांनी कोणत्या कपटी मार्गांनी आणि विविध कारणांनी भारतात शिरकाव केला, याचा थरारक आलेख या पुस्तकात वाचायला मिळतो. त्यांनी सुरुवातीला इथल्या राजकीय व सामाजिक परिस्थितीचा अचूक अंदाज घेतला. त्यानंतर आपल्याकडील आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि कुटिल नीतीचा वापर करून त्यांनी भारतीयांना पद्धतशीरपणे वश केले. कालांतराने इथली अथांग संपत्ती जलमार्गाने युरोपात वाहून नेली. आज युरोपातील अनेक भव्य संग्रहालये केवळ भारतातून लुटून नेलेल्या याच मौल्यवान वस्तूंनी खच्चून भरलेली आहेत, हे वास्तव नाकारता येत नाही.

या पुस्तकाची सुरुवात पोर्तुगीजांच्या आक्रमक शिरकावाने होते. ब्राझीलसारख्या दक्षिण अमेरिकी देशांवर आक्रमण करून तिथे वसाहती स्थापन करणाऱ्या पोर्तुगालची हावरट नजर भारतावरही पडली. मूळचे मसाल्यांच्या व्यापाराचे निमित्त करून आलेल्या या पोर्तुगीजांनी भारतात केवळ व्यापारच केला नाही, तर आपल्या धर्माचा अत्यंत प्रखर आणि सक्तीचा प्रसारही केला. भारताच्या किनारपट्टीवर स्वतःच्या वसाहती आणि राज्यव्यवस्था निर्माण करून त्यांनी धर्मांतरासोबतच इथल्या अफाट संपत्तीवर निर्लज्जपणे डल्ला मारला. पोर्तुगीजांच्या पावलावर पाऊल ठेवत डच, फ्रेंच आणि डॅनिश लोकांनीही भारताच्या विविध भागांत आपल्या छोट्या-मोठ्या वसाहती स्थापन केल्या. सुदैवाने त्यांना संपूर्ण भारतावर एकहाती सत्ता गाजवता आली नाही. मात्र, ब्रिटिशांनी 'ईस्ट इंडिया कंपनी'च्या माध्यमातून अत्यंत धूर्तपणे संपूर्ण भारतावर आपले एकछत्री वर्चस्व प्रस्थापित केले आणि अक्षरशः बोटीच्या बोटी भरून इथली संपत्ती त्यांच्या मायदेशी नेली. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या द्रष्ट्या युगपुरुषाने या गोऱ्या शत्रूंचा कपटी कावा आणि त्यांचे छुपे हेतू आधीच अचूक ओळखले होते; परंतु दुर्दैवाने त्यांना प्रदीर्घ आयुष्य लाभले नाही, अन्यथा भारताचा इतिहास नक्कीच वेगळा असता.

अखेरीस गरिबी, पारतंत्र्य आणि लाचारी यांच्या दुष्टचक्रात अडकवून ब्रिटिशांनी भारतीयांवर शेकडो वर्षे निर्दयीपणे राज्य केले. त्यांनी रेल्वे किंवा टपाल यांसारख्या ज्या काही सुधारणा भारतात केल्या, त्या केवळ त्यांच्या स्वतःच्या सोयीसाठी आणि लुटीचा मार्ग सुकर करण्यासाठीच होत्या. या सुधारणांच्या बदल्यात त्यांनी त्याहून कितीतरी पटीने अधिक संपत्ती आपल्या देशातून ओरबाडून नेली. या सर्व अमानुष लुटीची अत्यंत धक्कादायक आणि संदर्भासहित कहाणी एका ब्रिटिश लेखकानेच सविस्तरपणे या पुस्तकात मांडली आहे, हे विशेष! पुस्तकात दिलेले लुटीचे आकडे वाचून आजच्या घडीलाही आपले डोळे विस्फारतात. कारण, त्यांनी लुटून नेलेली ती संपत्ती आजच्या काळात आपल्या देशातील अनेक प्रगत राज्यांच्या एकत्रित अर्थसंकल्पापेक्षाही कितीतरी मोठी आहे. भारताच्या इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या आणि आपल्या वैभवशाली देशाच्या खऱ्या इतिहासाविषयी जागरूक असणाऱ्या प्रत्येक नागरिकाने आवर्जून वाचावी आणि अंतर्मुख होऊन विचार करावा, अशी ही अत्यंत महत्त्वाची गाथा आहे.

--- तुषार भ. कुटे 

#मराठी #पुस्तक #परीक्षण #इतिहास #भारत


 

Sunday, January 11, 2026

तोत्तोचान

प्रत्येकाच्या जीवनामध्ये तसेच व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीमध्ये सर्वात मोठा वाटा असतो तो त्याच्या शाळेचा. शाळेतील अनुभव, संस्कार तसेच तिथे लागलेल्या सवयी आपले आयुष्य घडवतात. म्हणून आपली शाळाच आपले व्यक्तिमत्व घडवते, असे बोलले तर वावगे ठरणार नाही.
तेत्सुको कुरियोसाकी यांच्या स्वतःच्या शाळेतील अनुभव “तोत्तोचान” या पुस्तकांमध्ये त्यांनी मांडलेले आहेत. ग्रामीण भागामध्ये निसर्गाच्या सानिध्यात एका कल्पक, स्नेहशील आणि ध्येयवेड्या मुख्याध्यापकाची तोमाई नावाची शाळा. ती सुरू केल्यानंतर केवळ सात ते आठ वर्षांमध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडात जळून गेली. परंतु इतक्या अल्प कालावधीमध्ये या शाळेने अक्षरशः विद्यार्थी घडवले! अर्थात यामागे तिथल्या मुख्याध्यापकांचा सिंहाचा वाटा होता. अनुभव आधारित शिक्षण पद्धती आणि विद्यार्थ्यांच्या मनाची जाण ठेवून शिकवणारे शिक्षक या शाळेमध्ये होते. शाळेतील सर्व घटनांचे वर्णन करणारे हे पुस्तक म्हणजे तोत्तोचान.
तोत्तोचान अर्थात तेत्सुको कुरियोसाकी ह्या या पुस्तकाच्या लेखिका आहेत. शिवाय युनिसेफच्या सद्भावना दूत देखील. आजच्या आपल्या शिक्षणाच्या बजबजबुरीमध्ये एक अनोखा संदेश देणारे हे पुस्तक निश्चित वाचायला हवे!

--- तुषार भ. कुटे

 


 

Thursday, January 1, 2026

“अनस्टॉपेबल अस” - खंड दुसरा

लाखो वर्षांच्या सेपियन्सच्या प्रवासामध्ये घडलेल्या घडामोडींचे वर्णन युवाल नोवा हरारी यांच्या ‘अनस्टॉपेबल अस’ या ग्रंथशृंखलेमध्ये अनुभवता येते. पहिल्या खंडामध्ये माणसाने जग कसं जिंकलं? या प्रश्नाचे उत्तर मिळाले. याच्याच पुढे जग न्याय का नाही? या प्रश्नाचे उत्तर दुसऱ्या खंडामध्ये मिळते.
मनुष्य हा पृथ्वीवरच्या इतर प्राण्यांमधील एक प्राणी असला तरीही त्याने आपल्या मेंदूच्या बळावर अकल्पित अशी प्रगती करून दाखवली. आणि या प्रगतीचा वेग अजूनही वाढतोच आहे. आपल्या मेंदूच्या बळावर त्याने पृथ्वीवर आणि पृथ्वीवरील अनेक प्राण्यांवर नियंत्रण मिळवले. यातूनच तो जग जिंकायला लागला. हजारो वर्षांच्या प्रगतीच्या कालखंडामध्ये अनेक चढ उतार अनुभवत माणसाने स्वतःचे साम्राज्य निर्माण केले आणि यातूनच न्याय-अन्यायाची संकल्पना उदयास झाली. अनेक समस्यांवर त्याने आपल्या बुद्धीच्या बळावर तोडगा काढला. नवनवीन शोध लावले. त्यातून त्याचा आत्मविश्वास बळवला गेला. चांगल्या वाईट गोष्टींची जाण होत गेली. कोणता प्राणी आपल्यासाठी फायद्याचा आहे आणि कोणता नाही? त्याला कळायला लागले. हळूहळू तो शेती करू लागला. काही वर्षांमध्येच शेतीतील पिके देखील त्याच्या नियंत्रणाखाली आली. “ट्रायल अँड एरर” पद्धतीचा वापर करून तो शिकत गेला आणि स्वतःचं इतर प्राण्यांपेक्षा वेगळा अस्तित्व त्याने तयार केलं. हळूहळू त्याच्यामध्ये संघर्ष निर्माण होत गेले. दुष्काळ, पूर, प्राण्यांची रोग, माणसांचे रोग, असंतुलित आहार, कष्टाची काम, उपद्रवी कीटक, झाडांना होणारे रोग, युद्ध आणि गुलामगिरी यासारखी संकटे त्याने अनुभवली. त्यातूनही तो शिकला. माणसांमध्येही काही बुद्धिमान लोक राजे बनू लागले. इतर लोक हळूहळू त्यांचे गुलाम झाले. एक प्रकारची राज्यव्यवस्था तयार झाली. मालमत्ता नावाची संकल्पना उदयास साली. नोकरशाही तयार झाली. शिक्षणाची सुरुवात झाली. माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी नियम तयार झाले. आणि यातूनच न्यायाची संकल्पना देखील उदयास आली. अर्थात हे नियम सर्वांनाच समान पद्धतीने लागू झाले नाहीत. लाखो लोक अतिशय थोडक्यात लोकांचं अर्थात राजांचं, नेत्यांचं ऐकू लागले. हेच राजे नेते न्याय देणारे ठरले. परंतु न्यायाची संकल्पना समानतेकडे झुकली नाही. कदाचित आजही समाजव्यवस्थेतील ही परिस्थिती बदललेली नाही.
अशा विविध गोष्टींचा ऊहापोह करण्याचे काम रंगीत चित्रांद्वारे “अनस्टॉपेबल अस” च्या या खंडामधून होते. इतिहास हा नेहमी शिकवणारा असतो, बोध देणारा असतो. अर्थात इतिहासाच्या मांडणीतूनच तयार झालेला हा ग्रंथ बऱ्याच वेगवेगळ्या शिकवण्या देतो. आणि कदाचित याही पुढे आपली प्रगती न थांबविणारा सेपियन “अनस्टॉपेबल” म्हणूनच राहील, असे दिसते.

पुस्तकाचे नाव: अनस्टॉपेबल अस - खंड दुसरा 
लेखक: युवाल नोआ हरारी 
अनुवाद: प्रणव सखदेव 
प्रकाशक: मधुश्री पब्लिकेशन

— तुषार भ. कुटे


 

Sunday, August 17, 2025

लेफ्ट टू टेल

मागच्या वर्षी “मृत्यू पाहिलेली माणसं” नावाचं एक पुस्तक वाचनात आलं. त्यामध्ये रवांडा देशातल्या अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून पुनर्जीवन मिळालेल्या इम्माकुलीची गोष्ट पहिल्यांदा समजली. अतिशय रोमांचकारी वाटले. त्याच पुस्तकामध्ये लेफ्ट टू टेल या तिच्या आत्मचरित्राबद्दल देखील लिहिलेले होते. त्यामुळे हे चरित्र सविस्तरपणे वाचण्याची उत्सुकता देखील चाळवली गेली.
मध्य आफ्रिकेतील रवांडा हा अतिशय छोटा देश. चहूबाजूंनी वेगवेगळ्या देशांच्या सीमा याला लाभलेल्या आहेत. शिवाय आफ्रिकेतील अन्य देशांप्रमाणेच हा देशही निसर्गसंपन्न. परंतु परकीय आक्रमकांच्या विविध काटाकारस्थानांमुळे वर्षानुवर्षे गुण्यागोविंदाने राहत असलेल्या दोन वांशिक गटांमध्ये संघर्ष पेटायला सुरुवात होते. हुतु आणि तुत्सी हेच ते दोन गट. एक बहुसंख्यांक तर दुसरा अल्पसंख्यांक. अनेक वर्षांपासून एकमेकांच्या सोबतच राहत असल्याने दोघांमध्ये भेद ओळखणे तसं कठीणच. परंतु एकदा लागलेली ठिणगी पेटली ती पेटलीच. राजकीय नेत्यांच्या महत्त्वाकांक्षा आणि आततायीपणामुळे दोन्ही गटांमधील संघर्ष वेगाने पेटायला सुरुवात होते. आणि त्याची परिसीमा गाठली जाते. ही परिसीमा आहे क्रौर्याची, अन्यायाची, आक्रोशाची आणि वंशविच्छेदाची. शिवाय हा संघर्ष ही फार जुना नाही. अगदीच ३० एक वर्षांपूर्वी आफ्रिकेतील निसर्गसंपन्न देशात तो घडलेला आहे. या देशांमध्ये शांत वातावरणात राहणाऱ्या इम्माकुली हिने अनुभवलेला हा वांशिक संघर्ष आहे.


गावातील एका शिक्षक जोडप्याच्या पोटी जन्मलेले इम्माकुली हे तिसरे अपत्य. तिला दोन मोठे भाऊ आणि एक लहान भाऊ आहे. गावाच्या निसर्गसौंदर्याने नटलेल्या वातावरणात कुटुंबातील सहाही जण गुण्यागोविंदाने नांदत होते. परंतु मागील काही वर्षांपूर्वी पासून चालू झालेला वांशिक संघर्ष हळूहळू मोठा होतो आणि त्याची देशभर व्याप्ती वाढते. स्वतः अल्पसंख्यांक वंशामध्ये जन्मलेल्या इम्माकुलीच्या घरापर्यंत हा संघर्ष येतो. तिला घरातून पलायन करावे लागते. आजूबाजूला दिसेल त्याला थेट ठार मारून वंशविच्छेदाची योजना अमलात येत असते. अशातच बहुसंख्यांक समाजातील एक पाद्री तिला आणि अन्य सहा ते सात स्त्रियांना आसरा देतात. हा आसरा म्हणजे तरी नक्की काय? घरातील एका अतिशय छोट्या आणि दुर्लक्षित स्वच्छतागृहामध्ये त्यांना एक प्रकारे डांबूनच ठेवले जाते. या स्वच्छतागृहात तीन महिन्यांमध्ये घडलेल्या विविध घटनांचे सखोल वर्णन इम्माकुली ने आपल्या या पुस्तकामध्ये केलेले आहे.
खरोखर संघर्ष म्हणजे काय? याची प्रचिती देणारे हे पुस्तक. मनुष्यप्राणी इतक्या क्रूरतेने कसा वागू शकतो? हाही प्रश्न आपल्याला अनेकदा पडतो. माणसाला माणूस म्हणून जगता येत नाही का? किंवा इतरांना देखील जगवता येऊ शकत नाही का? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. राजकारणी लोक देशावर वर्चस्व ठेवायचे म्हणून सामान्य लोकांमध्ये संघर्ष पेटवून देतात. यातून केवळ मानवी मूल्यांचा ऱ्हास होत असतो. 
हे आत्मचरित्र म्हणजे अमानवता कशी असते याचे खरेखुरे चित्रण आहे. आपण आजही किती सुरक्षित वातावरणामध्ये राहत आहोत? याबद्दल निश्चितच धन्यवाद मानायला हवे. हाच विचार पुस्तक पूर्ण झाल्यानंतर मनात येतो. 
पुस्तकाच्या सुरुवातीलाच रवांडा आणि त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशाचा नकाशा दिलेला आहे. त्याच्यावरून एकदा व्यवस्थित नजर टाकली की एकंदरीत पुस्तकांमध्ये कोणती घटना कुठे घडली याचे प्रारंभिक चित्रण आपण रंगवू शकतो.
प्रकाशकांच्या कार्यालयात हे पुस्तक चक्क पन्नास टक्के सवलतीमध्ये उपलब्ध होते. कदाचित याविषयी अधिक माहिती अजूनही मराठी वाचकांपर्यंत पोहोचली नसावी. म्हणूनच या पुस्तकाचा खप तितका झालेला नाही.

— तुषार भ. कुटे

Monday, March 17, 2025

देवदारांच्या छायेतील मृत्यू

रस्किन बॉण्ड या भारतीय इंग्रजी साहित्यकाराच्या पुस्तकाचा हा अनुवाद. नावामध्येच रहस्यकथा अथवा मृत्यूकथा दडलेल्या दिसतात.  हा कथासंग्रह असला तरी एका वेगळ्या धाटणीतला आहे. सर्व कथांमध्ये  कोणाचा आणि कोणाचातरी मृत्यू जवळपास आहेच. हिमाचल प्रदेशातील मसूरीजवळील एकाच हॉटेल रॉयलमध्ये किंवा तिथल्या परिसरात या सर्व कथा घडतात. सर्व एकमेकांशी जोडलेल्या आहेत. तरीही ही कादंबरी नाही!  म्हणजेच आपण प्रत्येक कथा वेगळी वेगळी वाचू शकतो.
या सर्व कथांमध्ये काही पात्रे समान आहेत. मसूरी जवळच्या हॉटेल रॉयलमधील मिस रिप्ली बीन, हॉटेलचा मालक नंदू, रिप्ली बीनचा तिबेटी टेरिअर कुत्रा फ्लफ, हॉटेलमधील पियानो वादक मिस्टर लोबो हे प्रत्येक कथेमध्ये आपल्याला भेटतात. हिमाचल प्रदेशातील हा भाग देवदार वृक्षांच्या छायेमध्ये दडलेला आहे. आणि सर्व कथा याच ठिकाणी घडतात.  खून झालेला पाद्री, विवाहबाह्य संबंध ठेवणार जोडपं, जन्मतः दुष्ट असलेला मुलगा, बॉक्सबेड मधलं प्रेत, टपालातून आलेल्या विषाचं गूढ, कोन्याकमधून केलेला विषप्रयोग, रहस्यमय काळा कुत्रा आणि दर्यागंजचा खूनी लेखक अशा विविध पात्रांना केंद्रस्थानी ठेवून या कथा लिहिलेल्या आहेत.  त्या रहस्यकथा, गूढकथा,साहस कथा, भयकथा, सूडकथा आणि मृत्यूकथा अशा विविध प्रकारामध्ये मोडता येतील. छोटा सैतान आणि पत्रातून विषप्रयोग या थोड्याशा वेगळ्या वळणाच्या कथा वाटल्या.  बाकी वरील कथाप्रकारामध्ये आवड असणाऱ्यांसाठी हे पुस्तक म्हणजे एक उत्तम मेजवानी आहे, असेच म्हणावे लागेल.

--- तुषार भ. कुटे

#मराठी #पुस्तक #परीक्षण 



Saturday, February 8, 2025

अर्ली इंडियन्स

ऐतिहासिक कालखंडामध्ये जितके आपण मागे जात राहतो तितके पुरावे क्षीण आणि दुर्बल होऊन जातात. मग अशा इतिहासाची मांडणी करताना संशोधकांचा कस लागतो. यातून नवनव्या संशोधनपद्धती विकसित होतात. तर्कपद्धतीचा अवलंब केला जातो. आणि इतिहासाची मांडणी होते. भारतीयांचा ज्ञात इतिहास अडीच हजार वर्षांपासून सुरू होतो. बौद्ध-जैन धर्माचा उदय आणि मौर्य साम्राज्याची स्थापना इथून भारतीय इतिहास सुरू होतो, असे म्हणतात. परंतु भारतामध्ये पहिल्या बुद्धिमान मानवाचे अर्थात होमो सेपियन्सचे आगमन सुमारे ६५ हजार वर्षांपूर्वी झाले होते. मग या उरलेल्या ६२ हजार पाचशे वर्षांमध्ये नक्की काय झाले? याचा शोध घ्यायचा असल्यास आज उपलब्ध असलेल्या शास्त्रीय पद्धतींचा अवलंब करता येऊ शकतो.
अनुवंशशास्त्राच्या आधारे वानरांच्या प्रजातीतून विकसित होत असलेला किंबहुना झालेला बुद्धिमान मानव अर्थात होमो सेपियन्स आफ्रिकेतून हळूहळू बाहेर पडला, हे सिद्ध झालेले आहे. विविध मार्गांचा अवलंब करून जगाच्या इतरत्र भागामध्ये पोहोचत गेला. डार्विनपासून सुरू झालेला हा प्रवाह पुढील कित्येक दशके अनेक अनुवंशशास्त्रज्ञांनी पुढे प्रवाहित ठेवला. यातून नवनवे विचार, संशोधन पुढे आले. इतिहास उमजत गेला. तर्कवितर्क लढवले गेले. पारंपारिक समजुतींना तडे देखील बसले. परंपराच्या विरोधात संशोधनांचे तात्पर्य आल्यामुळे वादविवाद देखील झाले. परंतु संशोधकांनी सत्य शोधण्याचा आटोकात प्रयत्न केला. आजही विज्ञानाच्या आधारे सिद्ध होत असलेल्या अनेक संकल्पनांना परंपराधिष्टीत लोकांचा विरोध आहे. त्यातीलच अनेक प्रश्नांची उत्तरे टोनी जोसेफ यांनी ‘अर्ली इंडियन्स’ या पुस्तकांमध्ये विज्ञानाचा आधार घेत स्पष्टपणे मांडलेली आहेत.
एकेकाळी भारतामध्ये जगातील सर्वात प्रगत संस्कृतींपैकी एक संस्कृती आनंदाने नांदत होती. ती म्हणजे ‘हडप्पा संस्कृती’. अनेक अनुवंशशास्त्रज्ञ, पुरातत्त्ववेत्ते यांनी हडप्पावर सखोल संशोधन केले आहे. त्यातून विविध निष्कर्ष देखील काढलेले आहेत. भारतातील ही प्राचीन संस्कृती भारतीय संस्कृतीचा खऱ्या अर्थाने पाया होती. हे देखील त्यांनी सिद्ध केले आहे. किंबहुना यावर सर्वांचेच एकमत असल्याचे दिसते. हजारो वर्षे गुण्यागोविंदाने नांदल्यानंतर हळूहळू हडप्पा संस्कृती लयास गेली. आणि भारतातील इतर भागांमध्ये संचारत गेली. हडप्पा विकसित होण्याच्या आधीदेखील भारतामध्ये मानव संस्कृती नांदत होत्या. पण हडप्पा संस्कृती ही मैचा दगड ठरली.
इराणच्या झेग्रोस परिसरातून आर्यवंशीय लोकांचे भारतामध्ये स्थलांतर झाले आणि यानंतरच हळूहळू हडप्पा संस्कृती लयाला गेली, असे म्हटले जाते. या ऐतिहासिक संकल्पनेचे विस्तृत विवेचन टोनी जोसेफ यांनी विज्ञानाच्या दृष्टिकोनातून या पुस्तकामध्ये मांडलेले आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच जीनोम म्हणजे काय, याची विस्तृत स्पष्टीकरण वैज्ञानिक संकल्पनांच्या आधारे त्यांनी दिलेले आहे. ते अगदी बारकाईने वाचावे लागते. कधी कधी काही गोष्टी डोक्यावरून देखील जाऊ शकतात. परंतु तात्पर्याने डीएनएच्या आधारे एखाद्या मानवी समूहाचा वंश काढता येऊ शकतो, असं टोनी जोसेफ यांनी सिद्ध केले आहे.
या पुढील प्रकरणामध्ये भारताच्या विविध भागांमध्ये सापडलेल्या मानवी अवशेषांचा अभ्यास करून येथे मानवाचा वावर किती प्राचीन होता, याचे विस्तृत विवेचन वाचायला मिळते. पुस्तकाच्या जवळपास निम्म्या भागामध्ये हडप्पा संस्कृती वरील विस्तृत संशोधन लेखकाने मांडलेले आहे. सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये सापडलेल्या हडप्पा, मोहेंजोदारो, राखीघडी, धोलाविरा, कालीबंगन, मेहरगड अशा विविध स्थळांचा अभ्यास केलेला दिसतो. या ठिकाणी सापडलेल्या वस्तूंद्वारे त्या काळाची संस्कृती कशी होती, तसेच त्यांचा अन्य भागांशी व्यापार कशा पद्धतीने होत होता? याची देखील माहिती मिळते. तत्कालीन भौगोलिक रचनेचा तसेच वातावरणाचा अभ्यास करून हडप्पा संस्कृतीची एकंदरीत प्रगती लेखकाने मांडलेली आहे. काही गोष्टी तर्काच्या आधाराने तर काही विज्ञानाने सिद्ध केलेल्या दिसतात. भारतामध्ये सध्या वापरात असलेल्या चार प्रकारच्या भाषांपैकी इंडो-युरोपियन आणि द्रविडी भाषांमधील फरक अथवा साम्य तसेच हडप्पा लिपी आणि द्रविडी लिपी मधील साम्य यावरून विविध तर्क लेखकाने येथे विस्तृतपणे मांडलेले आहेत. हडप्पाची लिपी आजही कोणत्याही संशोधकाला वाचता आलेली नाही. अनेक संशोधकांनी आपल्या हयातीत बरेच परिश्रम करून देखील त्यांना हडप्पा चित्रलिपीचा अर्थ लावता आलेला नाही. कदाचित हडप्पाचा बहुतांश इतिहास हे चित्रलिपी वाचला वाचता आल्यानंतरच उर्वरित जगाला समजेल, असे दिसते. म्हणजेच एका अर्थाने अजूनही हडप्पाकालीन भारतीयांचा परिपूर्ण इतिहास आपल्याला ज्ञात नाहीच.
जनुकशास्त्राचा आणि रसायनशास्त्राचा आधार घेऊन लेखकाने हडप्पा संस्कृतीतील लोकांविषयी विविध तर्क मांडलेले आहेत. शिवाय आर्य खरोखर भारताबाहेरून भारतामध्ये आले होते का? याचे देखील सविस्तरपणे स्पष्टीकरण दिलेले आहे. उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय यांच्यातील जनुकीय फरक देखील यात मांडलेला दिसतो.
सरस्वती नदीची गोष्ट आणि हडप्पाकालीन चित्रलिपी याविषयी बहुतांश इतिहास अभ्यासकांना उत्सुकता असते. ही उत्सुकता शमवण्याचे काम देखील पुस्तकातील काही प्रकरणांमध्ये होते. एकंदरीत सव्वादोनशे पानांचे पुस्तक लिहिण्यासाठी लेखकाने केलेला विस्तृत अभ्यास हा वाखाणण्याजोगा आहे. भारतीय इतिहासाला एक वेगळी दृष्टी देणारे हे पुस्तक आहे असं आपण म्हणू शकतो.

— तुषार भ. कुटे

#मराठी #पुस्तक #परीक्षण #पुस्तक_परीक्षण


 

Monday, October 28, 2024

२१ व्या शतकासाठी २१ धडे - युवाल नोआ हरारी

मागच्या प्रत्येक शतकानुरूप माणसाने प्रगतीची द्वारे खुली केलेली आहेत. आपले जीवन सहज आणि सुकर होण्यासाठी विविध गोष्टींचा अवलंब केलेला आहे. तंत्रज्ञानाचा विकास केलेला आहे. त्याचा उपयोग आणि दुरुपयोग देखील केलेला आहे. परंतु आत्ताच्या अर्थात एकविसाव्या शतकामध्ये मनुष्य प्रगतीसाठी कोणत्या गोष्टींचा अवलंब करावा? या प्रश्नाचे उत्तर युवाल नोआ हरारी या पुस्तकातून देतात.

हरारी यांचे इतिहासावर टिप्पणी करणारे ‘सेपियन्स’ तर भविष्याचा वेध घेणारे ‘होमो डेअस’ हे पुस्तक यापूर्वी वाचले होते. परंतु २१व्या शतकासाठी २१ धडे हे पुस्तक वर्तमानाचा आणि त्यातून भविष्याकडे जाण्याचा वेध घेणारे आहे. 

मानवी जीवनशैली सातत्याने बदलत चाललेली आहे. अर्थात यामध्ये पर्यावरण अथवा वातावरणाचा फारसा प्रभाव नाही. मानवच मानवी शैलीवर प्रामुख्याने प्रभाव टाकताना दिसतो. याच कारणास्तव होणारे सामाजिक बदल आपल्याला स्वीकारावे लागतात. तरच मनुष्य म्हणून आपण या पृथ्वीवर टिकून राहू शकतो. असं म्हणतात की बदल ही एकमेव गोष्ट अशी आहे की जी कधीही बदलत नाही! २१ व्या शतकामध्ये आपण कोणत्या गोष्टी निश्चितपणे ध्यानात ठेवल्या पाहिजेत जेणेकरून पृथ्वीचा पालनकर्ता म्हणून मनुष्यप्राणी निदान हे शतक तरी तग धरून शकेल. याचा सारासार विचार हरारी यांनी या पुस्तकातून केल्याचा दिसतो.

पुस्तकाचे प्रामुख्याने पाच भाग आहेत. यातील पहिल्या भागात तंत्रज्ञानाचे आव्हान, दुसऱ्यामध्ये राजकीय आव्हान तिसऱ्यामध्ये आशा-निराशा, चौथ्या मध्ये सत्य आणि पाचव्यामध्ये लवचिकता या गोष्टींचा प्रामुख्याने विचार केल्याचा दिसतो. तंत्रज्ञानाचे आव्हान हे पहिल्याच भागामध्ये घेतल्याने त्याचे महत्त्व प्रामुख्याने अधोरेखित होते. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळेच मानवी जीवनशैली आणि सामाजिक रचना सातत्याने बदलत आहेत. या शतकात तिचा वेग वाढल्याचे दिसते. हरारी यांनी इतिहासातून बोध घेऊन पुढील वाटचालीतील धोके अतिशय सुयोग्य पद्धतीने नमूद केल्याचे दिसते. अर्थात ललित लेखन नसले तरी ही एक बोधकथा आहे. तंत्रज्ञान माणसाला रसातळाला कसे नेऊ शकते? हे आपल्याला समजते. परंतु याबरोबरच राष्ट्रवाद, धर्मांधता आणि स्थलांतर या गोष्टींवर देखील हरारी प्रकाश टाकतात. राष्ट्रे निर्माण झाल्यानंतर राष्ट्रवादी प्रवृत्ती वाढत गेल्या. धर्माने मानवी जीवनात कट्टरता आणली. आणि स्थलांतरांमुळे स्थानिकांमध्ये असुरक्षितता निर्माण झाली. अर्थात या गोष्टी पुढे बदलत जाणार आहेत. त्या दृष्टीने सावध पावले कशी टाकावीत, याचे उत्तर देखील हरारी देतात.

दहशतवाद, युद्ध यावर त्यांनी परखड मते मांडलेली आहेत. दोन्हीही हिंसक गोष्टी तंत्रज्ञानाच्या तालावर जगात वेगाने पसरताना दिसतात. मानवी प्रगतीतील तो सर्वात मोठा अडथळा आहे. त्याच्या इतिहासातून बोध घेऊन आपल्याला कोणती पावले टाकता येतील, याचे उत्तरही देखील या पुस्तकातून मिळते.

पुस्तकाच्या चौथ्या भागात अर्थात ‘सत्य’मध्ये हरारी यांनी अज्ञान, न्याय, सत्योत्तर काळ आणि विज्ञानकथा या विषयांवर आपल्याशी चर्चा केल्याचे दिसते. मागच्या शेकडो वर्षांपासून यामध्ये सातत्याने बदल झालेला आहे. मागच्या शतकातील ज्ञान, न्याय, विज्ञान हे पूर्ण वेगळं होतं आणि एकविसाव्या शतकामध्ये ते अजून निराळे आहे. हा बदल कसा स्वीकारावा, याची चर्चा हरारी या पुस्तकामध्ये करतात.

अंतिम भागामध्ये अर्थात ‘लवचिकता’ या प्रभागात शिक्षण, आयुष्याचा अर्थ आणि ध्यानधारणा या तीन गोष्टींवर हरारी विश्लेषण करतात. जीवनाचा एक  मुख्य भाग म्हणून याकडे पाहता येईल. ज्याची प्रत्येक मनुष्यप्राण्याला नितांत आवश्यकता आहे. तात्विकदृष्ट्या महत्त्वाच्या गोष्टी आपण आपल्या जीवनात कशा पद्धतीने जमवून घ्यायला हव्यात अशा विविध प्रश्नांची उत्तरे हरारी या पुस्तकातून देतात. 

याही पुस्तकामध्ये असे अनेक विचार आहेत ते सुविचार म्हणून लिहून ठेवता येतील. परंतु पुस्तक वाचण्याच्या प्रवाहामध्ये त्याची परिणामकारकता अधिक जाणवते, हेही तितकेच खरे.



Tuesday, July 25, 2023

ह्यूमन काइंड: मानवजातीचा आशावादी इतिहास

मानव आणि मानवता यावर भाष्य करणारे अनेक विचारवंत होऊन गेले. शिवाय या विषयावर आजवर अनेक पुस्तके देखील लिहिली गेली होती. जसजसा मानव प्रगत होत गेला तस तशी मानवता लयास गेली, असा इतिहास सांगतो. मानवी इतिहास हा युद्धांचा, लढायांचा, कत्तलिंचा आणि मानवतेला काळीमा फासणाऱ्या अशा अनेक गोष्टींचा आहे.
आपण इतिहास वाचतो तेव्हा आपल्याला सकारात्मकतेपेक्षा नकारात्मक गोष्टीच अधिक प्रमाणात दिसून येतात. मानवता या शब्दाची व्याख्या अजूनही कोणीही परिपूर्ण केलेले नाही. पण मानवाकडे उपजत बुद्धी असल्यामुळे त्याने सर्वांशी प्रेमाने दयाळू भावाने आणि सहकार्याने वागायला हवे, याची शिकवण मानवता देते. हा सर्वसामान्य सिद्धांत आहे. परंतु या सिद्धांताला मानवानेच अनेकदा पायदळी तुडवले. म्हणूनच आजच्या काळामध्ये मानवता हा मानवाचा सर्वोत्तम गुणधर्म आहे, असे म्हणता येते.
नकारात्मक इतिहासाला बाजूला सारून 'ह्युमनकाईंड' या पुस्तकातून लेखकाने आशावादी इतिहास आपल्यासमोर ठेवल्याचे दिसते. इतिहासामध्ये अनेक अशा घटना घडून गेल्या होत्या जिथे मानवतेला काळीमा फासला गेला. पण तरीदेखील मानवता अजूनही जागृत आहे, असं दाखवणारा आशेचा किरण देखील त्या घटनांमध्ये दिसला होता. अनेक मानसशास्त्रज्ञांनी यापूर्वी बरेच प्रयोग केले, ज्यातून मनुष्य  कशाप्रकारे वागतो याचा अभ्यास केला गेला. अनेकदा त्यातून आलेले निष्कर्ष हे मानवतेला धरून होते म्हणजेच सकारात्मकता दर्शवणारे होते. आपल्याला देखील काही घटनांमधून आश्चर्य वाटून जाते. अजूनही मानवता टिकू शकते आणि आजचा मानव त्या टिकवू शकतो असा आशावादी दृष्टिकोन यातून आपल्याला मिळतो. इतिहासातील नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे जाणारा हा प्रवास या पुस्तकामुळे आपल्याला अनुभवायला मिळतो. अनेकदा मनुष्य वरवर जरी दाखवत असला तरीही त्याचा मूळ मानवतावादी स्वभाव बदलत नाही, ही शिकवण देखील या पुस्तकातून मिळते.
खरं सांगायचं तर मानवतेकडे आशावादीदृष्ट्या बघायला हवं. ती जागृत ठेवायला हवी. मनुष्य या सृष्टीचा सर्वात बुद्धिमान प्राणी म्हणून पालनकर्ता आहे. त्यानेच मानवतावाद तयार केला आणि इथून पुढे देखील तो टिकवण्याची जबाबदारी देखील त्याची आहे, हे मात्र या पुस्तकातून शिकायला मिळतं.

- तुषार भ. कुटे


 

Monday, July 17, 2023

होमो डेअस: मानवजातीच्या भविष्याचा रोमांचक वेध

होमो सेपियन्स अर्थात आपण अर्थात आजचा सर्वात प्रगत मानव. होमो सेपियन्सने मागच्या लाखो वर्षांपासून या जगावर राज्य केलं. परंतु त्याची आजवरची प्रगती पाहता यापुढे होमो सेपिअन्स कशा पद्धतीने वागतील? याचा नेम नाही. होमो सेपियन्स ज्या वेगाने प्रगती करत आहेत तो वेग कदाचित अन्य कोणत्याही  प्राण्याला आजवर गाठता आलेला नाही. यासाठी त्याने विकसित केलेले तंत्रज्ञान कारणीभूत आहे. आजवरची प्रगती पाहता भविष्यात होमो सेपियन्स हे होमो डेअस अर्थात भविष्यातील मानवाकडे कशा पद्धतीने प्रवास करतील, याची माहिती सांगणारे पुस्तक म्हणजे युवाल नोवा हरारी लिखित "होमो डेअस" होय.
हरारी यांचे सेपियन्स हे पुस्तक वाचल्यानंतरच मी त्यांचा मोठा चाहता झालो होतो. भूतकाळामध्ये इतिहासात होऊन गेलेल्या अनेक विचारवंतांबद्दल ऐकलं होतं. त्यांची पुस्तके देखील वाचली. पण आजच्या काळातील खराखुरा विचारवंत कसा असतो, याची माहिती किंबहुना प्रचिती सेपियन्स वाचल्यानंतर आली. सेपियन्स हे मानव जातीच्या इतिहासाचे पुस्तक होते. त्याचाच पुढचा खंड हरारी यांनी होमो डेअस या पुस्तकाद्वारे आणला आहे. हे पुस्तक म्हणजे आधुनिक विश्वाची सांगड घालणारं एक तत्त्वज्ञानाचे पुस्तक आहे. मला तर यातील वाक्यनवाक्य हे आधुनिक सुविचारांशी मिळतं जुळतं आहे, असं वाटलं. बरीच वाक्ये मी अजूनही बाजूला काढून ठेवलेली आहेत. त्यांचे विचार पटतात किंबहुना जुळतात म्हणून हे पुस्तक अधिक भावलं.
मानवी प्रगतीचा वेग पाहता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि जेनेटिक इंजीनियरिंग या तंत्रज्ञानाद्वारे मानवाची भविष्यातील वाटचाल चालू राहणार आहे, असं हरारी म्हणतात. या तंत्रज्ञानाद्वारे कदाचित प्रत्यक्ष अस्तित्वात नसणारा देवही घडविण्याची ताकत मानवात आहे. सेपियन्समध्ये त्यांनी मानवानं देव, पैसा, समानता आणि स्वातंत्र्य यासारख्या काल्पनिक पण सर्वमान्य संकल्पनांवर विश्वास ठेवून सारं जग काबीज केलेले आहे, असं म्हटलं होतं. आणि या पुस्तकामध्ये इथून पुढचे जग मनुष्य कशा पद्धतीने काबीज करेल, याची माहिती दिलेली आहे. भूतकाळाची भविष्याशी घातलेली सांगड हा या पुस्तकातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा वाटतो. आज आपण तंत्रज्ञानाने घेरलेले आहोत. हे तंत्रज्ञान आपल्याला कुठवर येईल याची निश्चित माहिती सांगता येणार नाही. पण सद्य परिस्थिती पाहता इथून पुढे तंत्रज्ञानच मानवी आयुष्यावर नियंत्रण करू शकेल, हे मात्र निश्चित.
आज आपण स्वतःला पृथ्वीवरच्या देवांच्या रूपात घडवत असलो तर नेमके कोणते कार्यक्रम हाती घेतले पाहिजेत? हे हरारी सांगतात. आपला ग्रह आजच्या मानवी करामती पाहता लवकरच मरणाच्या दिशेने प्रवास करताना दिसतो. आपणच आपल्या कबरी नकळतपणे खोदत चाललो आहोत. एकविसावे शतक तंत्रज्ञानाचे असलं तरी त्यातील विनाशकारी तोटे आपल्यावर वर्चस्व गाजवू शकतात. मग यातून बाहेर कसं  पडायचं? या मायाजालातून बाहेर पडणं खरोखर सोपं आहे का? याकरता कोणत्या विचारधारेची किंवा नवसंकल्पनेची आवश्यकता आहे? अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं या पुस्तकातून हरारी आपल्याला देतात. कादंबरी किंवा कथा नसली तरी वाचकाला खिळवून ठेवण्याची ताकत लेखकाच्या लेखणीमध्ये आहे.
एकविसाव्या शतकाला आकार देत असताना होऊ शकणारा मानवी प्रवास हा अंधारमय आणि प्रकाशमय अशा दोन्ही वाटा दाखवतो. त्यातली कोणती वाट निवडायची हे मानवानेच ठरवायचे आहे. पुढचं शतक पाहताना मानवी प्रगती कुठपर्यंत वाटचाल करेल? याचा अंदाज हरारी यांना आलेलाच आहे. कदाचित त्यांनी आपल्याला सावध करण्यासाठी या पुस्तकाचा मार्ग अवलंबला असावा.

- तुषार भ. कुटे




Tuesday, June 21, 2022

अदृश्य माणूस

विज्ञान कथांचं जग मनोरंजक आणि तितकच अद्भुत देखील असतं. त्यात अनेकदा अतिशयोक्ती असली तरी 'हे असं घडू शकतं' असंही वाटत राहतं. मराठी साहित्याला विज्ञान कथांचा प्रदीर्घ इतिहास नसला तरी पाश्चिमात्य साहित्यामध्ये मात्र शेकडो वर्षांपासून विज्ञानकथा लिहिल्या जात आहेत.
विज्ञान कथांचे जनक म्हणले जाणारे एच. जी. वेल्स यांची 'अदृश्य माणूस' ही अतिशय रंजक अशी विज्ञान कादंबरी होय. 'इनव्हीजीबल मॅन' या मूळ कादंबरीचा प्रणव सखदेव यांनी मराठी अनुवाद केलेला आहे. ही कादंबरी सन १८९७ मध्ये म्हणजे सव्वाशे वर्षांपूर्वी वेल्स यांनी लिहिली होती. विज्ञान कथा याच काळामध्ये पहिल्यांदा तयार व्हायला लागल्या. त्यात 'इनव्हीजीबल मॅन' ही कादंबरी मोठ्या प्रमाणात गाजली. आज ती वाचत असताना इतकी जुनी असेल असे जराही वाटत नाही. अदृश्य माणूस ह्याच मध्यवर्ती संकल्पनेवर ती आधारित असली तरी त्या भोवती फिरणारा थरार हा लेखकाने अतिशय उत्कृष्टरित्या रंगविलेला आहे. सुरुवातीला पार्श्वभूमी तयार करत असलेला काळ थोडासा कंटाळवाणा वाटतो. कदाचित भाषांतरित कादंबरी असल्याने इंग्रजी माणसांची नावे जुळवून घेण्यास थोडासा वेळ लागत असावा. परंतु अदृश्य माणसाचे जसे जसे रहस्य समोर यायला लागते तसतसा घटनांचा वेग वाढत जातो आणि कादंबरीचा थरार देखील वाढतो. अनेकदा अदृश्य माणसाची कीव देखील येते. कादंबरी वेगाने पुढे सरकत असताना लेखकाने अनेक छोट्या छोट्या गोष्टींचा विचार केलेला आहे. यावरूनच लेखकाचे सूक्ष्म निरीक्षण देखील लगेच ध्यानात येते. हे सूक्ष्म निरीक्षणच या कादंबरी लेखकाचे यश मानावे लागेल. विशेष म्हणजे सुरुवातीची काही पाने सोडली तर ती कुठेही कंटाळवाणी जाणवत नाही. साहस कथा आणि रहस्यकथा तसेच विज्ञानकथा वाचकांसाठी ही मेजवानीच आहे असे म्हणता येईल!


 

Tuesday, March 8, 2022

ब्रीफ आन्सर्स टू दि बिग क्वेश्चन्स

#पुस्तक_परीक्षण
📖 ब्रीफ आन्सर्स टू दि बिग क्वेश्चन्स
✍️ स्टीफन हॉकिंग (अनुवाद प्रणव सखदेव)
📚 मंजुल पब्लिशिंग हाऊस

वर्षानुवर्षे असणाऱ्या विज्ञानाविषयीच्या अज्ञानातून अनेक अंधश्रद्धा तयार झाल्या. निसर्गातील अनेक गोष्टी या मनुष्याला अचंबित करणाऱ्या व अनुत्तरीत अशा वाटत होत्या. त्यातूनच मानवी मनातून नवनव्या संकल्पना पुढे आल्या. आपण अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरे कुणावर तरी सोपवून दिली. परंतु जसजशी विज्ञानाची प्रगती होत गेली तसतसं निरनिराळी रहस्य मानवासमोर उलगडू लागली. परंतु आजही अनेक रहस्यांचा भेद झालेला नाही. बरेच प्रश्न आजही अनुत्तरीत आहेत. विज्ञानाद्वारे या प्रश्नांचा व त्यांच्या उत्तरांचा शोध घेण्याची प्रक्रिया अजूनही चालू आहे. कदाचित ती यापुढेही अव्याहतपणे चालू राहील. अशाच अनेक प्रश्नांची थोर शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी वैज्ञानिक दृष्ट्या दिलेली उत्तरे म्हणजे हे पुस्तक होय.
महान खगोल वैज्ञानिक स्टीफन हॉकिंग यांचं हे शेवटचं पुस्तक आहे. त्यामुळे या पुस्तकाविषयी उत्सुकता तर होतीच. त्यांनी या पुस्तकामध्ये खालील प्रश्नांची सविस्तरपणे विवेचनासह वैज्ञानिकदृष्ट्या उत्तरे दिलेली आहेत.
- देव खरच आहे का?
- हे सगळं कसं सुरू झालं?
- भविष्यात काय घडेल, याचं पूर्वानुमान लावू शकतो का?
- कृष्णविवराच्या आत काय असतं?
- विश्वात इतरत्र कुठे बौद्धिक जीवसृष्टी आहे का?
- आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आपल्याला मागे टाकेल का?
- आपल्या भविष्याला आकार कसा द्यायचा?
- आपण पृथ्वीवर तगून राहू का?
- अंतराळात आपण वसाहती केल्या पाहिजेत का?
- काळ प्रवास शक्य आहे का?
खरं तर हे सर्वच प्रश्न अतिशय उत्सुकतेने भरलेली आहेत. प्रत्येकालाच या विषयी जाणून घ्यायचं आहे. या उत्सुकतेची पूर्तता करणारे पुस्तक स्टीफन हॉकिंग सारख्या उच्च बुद्धिमत्ता असणाऱ्या वैज्ञानिकाकडून आपल्याला मिळतं. एखाद्या शास्त्रज्ञाची बौद्धिक पातळी किती उच्च असते, याचं उत्तम उदाहरण म्हणजे हॉकिंग होय. विशेष म्हणजे पुस्तक वाचताना मागील शतकातील महान वैज्ञानिक अल्बर्ट आईन्स्टाईन यांच्याबद्दल अनेकदा उल्लेख येतो. हॉकिंग यांना आईन्स्टाईन बद्दल असणारी आपुलकी व आदर पदोपदी जाणवत राहतो. विश्वाच्या दृष्टीने आपण क्षुल्लक बाब आहोत, याची देखील जाणीव करून हे पुस्तक देतं. या पुस्तकाद्वारे विश्वरचनाशास्त्र नावाच्या भौतिकशास्त्राच्या नव्या शाखेची माहिती मिळाली. शिवाय हॉकिंग यांनी बऱ्याच ठिकाणी आपल्या आजाराबद्दल लिहिलेले आहे. त्यामुळे त्यांची त्याकाळची पार्श्वभूमी देखील लक्षात आली. शरीराने अपंग असलेल्या एक व्यक्ती किती उच्च पातळीवर विचार करू शकतो, याची प्रचिती पुस्तक वाचताना निश्चितच येते. विज्ञानावर प्रेम करणाऱ्या, पृथ्वीच्या पर्यावरणाविषयी आपुलकी असणाऱ्या व वैज्ञानिक विचारसरणी अनुसरण करणाऱ्या प्रत्येकासाठी हे पुस्तक वाचनीय असंच आहे.

Ⓒ तुषार भ. कुटे




Friday, March 4, 2022

द बुक ऑफ राम

#पुस्तक_परीक्षण
📖 दि बुक ऑफ राम
✍️ देवदत्त पटनायक (अनुवाद- चेतन कोळी)
📚 पेंग्विन रँडम हाऊस इंडिया, मंजुल पब्लिशिंग हाउस

देवदत्त पटनायक यांच्याविषयी यापूर्वी बरंच ऐकलेलं होतं. म्हणूनच त्यांच्या पुस्तकाविषयी उत्सुकता तर होतीच. तेव्हा त्यांचे 'द बुक ऑफ राम' हे पुस्तक हाती आले. अर्थातच नावावरून रामकथेवर अर्थात रामायणावर लिहिलेले हे पुस्तक आहे, हे लक्षात येईल. रामायण भारतीय लोकांसाठी काही वेगळा विषय नाही. राम हा भारतीयांच्या श्रद्धेचा विषय आहे. शिवाय अनेकांसाठी तो अस्मितेचा देखील आहे. यापूर्वी अनेकांनी रामकथेवर पुस्तके लिहिलेली आहेत. परंतु प्रत्येक लेखकाचा दृष्टीकोन वेगवेगळा दिसून येतो. देवदत्त पटनायक यांनी देखील रामायण याचे विस्तृत विवेचन या पुस्तकाद्वारे केलेले आहे. रामायणात घडलेल्या विविध घटनांची पार्श्वभूमी सहजपणे पुस्तकात लेखकाने मांडलेली आहे. दूरदर्शनवर पाहिलेल्या रामायणामुळे रामकथा चांगलीच लक्षात राहिली होती. त्यामुळे पुस्तक वाचून नवी काय अनुभवणार, हा देखील प्रश्न होता. परंतु या पुस्तकाद्वारे लेखकाच्या दृष्टिकोनातून रामायणाचे विविध पैलू लक्षात आले. एखादी घटना का घडली, किंबहुना ती घडल्यामुळे काय परिणाम झाले? अशा प्रश्नांची उत्तरे पटनायक यांनी या पुस्तकातून दिलेली आहेत.
विशेष म्हणजे मागच्या हजारो वर्षांमध्ये विविध प्रकारची रामायणे लिहिली गेली. प्रत्येक रामायणाचा गाभा वेगवेगळ्या असला तरी कथेमध्ये काहीसे बदल होतातच, याची देखील माहिती या पुस्तकामध्ये दिलेली आहे. रामायणातील विविध पात्रांचे दृष्टीकोण, विसंगती तसेच विचार करण्याची पद्धती देखील आपल्याला अनुभवता येते. राम हा कथेचा नायक असल्याने त्याच्या विविध पैलूंचा अभ्यास नव्याने करता येतो. पौराणिक कथांचा देखील संशोधनात्मक अभ्यास कसा करायचा, हे या पुस्तकातून निश्चितच समजते. शिवाय रामकथेतून अनेक गोष्टींची शिकवण देखील मिळते. कदाचित याचमुळे आज देखील भारतामध्ये रामकथा सातत्याने वाचल्या व ऐकल्या जातात.
सर्वात विशेष शिकवण अशी की, जेव्हा रामाचा बाण लागून रावण खाली कोसळतो तेव्हा त्याने म्हटलेली वाक्ये देवदत्त पटनायक यांनी खूप सुंदररित्या लिहिलेली आहेत. तो म्हणतो, 'रामा तू खऱ्या अर्थानं अतिशय योग्य असा विरोधक आणि पृथ्वीतलावर ची सर्वात शक्तिमान व्यक्ती आहेस. जिला स्वतःच्याच भावनांपासून अलिप्त राहता येऊ शकते. मी तुला नमस्कार करतो. माझ्याकडे अतिशय थोडा वेळ आहे कारण मी लवकरच मृत्युमुखी पडणार आहे. मात्र माझ्या आयुष्यात मी जे शिकलो त्याच्यापैकी सर्वात महत्त्वाची गोष्ट मी तुला शिकवणार आहे. ज्या गोष्टींपासून नुकसान होईल अशा गोष्टींचा मोह वाटणं किंवा या गोष्टी टाळणं हिताचं आहे. अशाच गोष्टींचं आकर्षण वाटणं, हे अज्ञानी मनाचे लक्षण आहे. हे सदैव ध्यानात ठेव. ज्या गोष्टींबद्दल आपल्याला प्रचंड आकर्षण वाटतं त्याच गोष्टींमुळे तुमचं नुकसान होतं, हे समजण्याची गरज आहे. ज्या गोष्टींपासून आपण दूर पळतो, ज्या गोष्टींबद्दल आपण दिरंगाई करतो अशाच गोष्टी स्वतःचा विकास करण्यासाठी फायदेशीर ठरतात'. ही अतिशय महत्त्वाची शिकवण रावणाने रामाला दिली. विशेष म्हणजे आजही मनुष्य जातीसाठी ती आदर्श अशी शिकवणच आहे.
पुस्तकाच्या सर्वात शेवटच्या परिच्छेदांमध्ये लेखकाने जे लिहिले आहे ती रामायणातील खरी शिकवण म्हणून सांगता येऊ शकते.
आता आपल्याला सीतेची (मनाची) बंधनांतून सुटका करायची आहे. आपल्या बुद्धिरूपी हनुमानात दडलेल्या सर्व क्षमतांचा विकास करायचा आहे. जीवनरूपी सागर तरून जायचा आहे आणि रावणाच्या लंकेवर (अहंकाराच्या साम्राज्यावर) विजय मिळवायचा आहे, त्याची सोन्याची लंका जाळून तिचं रामाशी पुनर्मीलन घडवून आणायचं आहे ... कारण राम आपल्या अंतर्यामीच आहे, तो आपल्यातल्या 'स्व'त्वापर्यंत पोहोचण्याची वाट पाहतोय.
या रामाला आपण केवळ एका काव्यामध्ये किंवा एका स्थानापुरतं मर्यादित ठेवू शकत नाही. तो तर स्थळकाळाच्या मर्यादेपलीकडे आहे. तो सर्वव्यापी आहे. तो म्हणजे दुसरातिसरा कुणी नसून आपलाच आत्मा, परमचैतन्य आहे. तोच आपलं खरं अस्तित्व आहे. तोच आपल्यामध्ये प्राण ओततो आणि आपलं साक्षिभावानं निरीक्षण करतो.
आपण जेव्हा या रामाची प्रचिती घेऊ, तेव्हा राजकीय विजयाची आपल्या मनातली इच्छा लोप पावते. आणि तेव्हा आपलं मन प्रेमानं, समजेनं आणि सर्वांप्रतिच्या भूतदयेनं भरून जातं. त्या वेळी धर्म अधिराज्य गाजवतो, आणि रामराज्याची स्थापना होते ... आपल्या अंतर्यामीसुद्धा आणि सभोवतीसुद्धा!

© तुषार भ. कुटे  



Thursday, February 10, 2022

इंडिका

विश्वामध्ये असणारी एकमेव आणि सर्वोच्च ताकद म्हणजे निसर्ग होय. तो अद्भुत आहे, विशाल आहे, सर्वशक्तिमान आहे आणि त्याला हवे तसेच तो करतो. म्हणूनच निसर्ग विज्ञान या विषयासारखा अभ्यास करण्यासाठी दुसरा रंजक विषय नाही. याच विषयाला वाहिलेले प्रणय लाल लिखित 'इंडिका' हे पुस्तक होय. भारतीय उपखंडाचा सखोल नैसर्गिक इतिहास, असे जरी या पुस्तकावर लिहिलेले असले तरी बहुतांशी पृथ्वीचा नैसर्गिक इतिहास या पुस्तकामध्ये मांडलेला आहे. त्याचे विवेचन करण्यापूर्वी पुस्तकातील लेखकाने दिलेला सर्वात शेवटचा परिच्छेद आधी सांगतो...
"आपल्या ४६ वर्षी श्रीमती पृथ्वीच्या आयुष्यात सेपियन्स चारेक तासांपूर्वी उपजला. श्रीमती पृथ्वीचे आयुष्य आपल्याला सांगते की कोणत्याही जीवजातीचे अस्तित्व, फार कशाला, जीवाचेही अस्तित्व अनेक अशक्यप्राय घटनासंचांमुळे घडते; ज्यातून शेवटी आपण घडलो आहोत. उत्क्रांतीच्या इतिहासात कोणत्याही जीवप्रकाराच्या उत्क्रांतीला ना दिशा असते, ना कोणते लक्ष्य असते. जवळपास सर्व जीवजाती नष्ट होणे अपरिहार्य आहे. प्रभावी जीवजात म्हणून होमो सेपियन्स उत्क्रांतीच्या नाट्यातले शेवटी रंगमंचावर आलेले पात्र आहे. जर घटना घडल्या तशा घडल्या नसत्या, आपले स्पर्धक व भक्षक विशिष्ट वेळी नष्ट झाले नसते, तर आपण आज अस्तित्वातच नसतो, ना कपींचे पूर्वज, ना त्यांचे सरीसृप सस्तन पूर्वज, एका संध्याकाळी एका उथळ डबक्यात ३.५ अब्ज वर्षांपूर्वी जीव घडला ... जर कधी नसता, तर ही चित्रफीत पुन्हा 'वाजवून' आपण घडलो असतो याची कोणतीच खात्री देता येत नाही. जर असा प्रयोग करता आलाच तर आजच्या प्राण्यांच्या वनस्पतींच्या ऐवजी पूर्णपणे वेगळे जीव घडतील. आज अस्पर्श राहिलेली गरम झऱ्यांची तळी फक्त एक आशा पुरवतात, की जर जीवसृष्टी नष्ट झाली तर ती नव्याने घडेल. पण जीव नव्याने घडेल याची खात्री आहे. का? जास्त महत्त्वाचे म्हणजे, तसे होण्या-न-होण्यावर जुगार खेळायला आपण तयार आहोत का? आणि जिंकणारे कोणते जीव असतील?"
खरं तर याच परिच्छेदांमध्ये संपूर्ण पुस्तकाचा सारांश दिलेला आहे. ४६० कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीची निर्मिती झाली, तेव्हापासूनच घडलेल्या सर्व घडामोडी भूगर्भशास्त्राद्वारे, जीवशास्त्राद्वारे, भौतिकशास्त्राद्वारे आणि मानववंशशास्त्राद्वारे संशोधन रूपाने या पुस्तकात लेखकाने अतिशय विस्तृतरित्या मांडलेल्या आहेत. हे पुस्तक म्हणजे पृथ्वीचा साडेचारशे कोटी वर्षांचा संक्षिप्त इतिहास होय. विज्ञानाच्या दृष्टिकोनातून घडलेल्या घटनांची शास्त्रशुद्ध माहिती लेखकाने अतिशय सुटसुटीतरित्या या पुस्तकात दिलेली आहे. ज्या निसर्गामध्ये आपण वावरतो तो आजच्या घडीला येण्यासाठी पृथ्वीची कोट्यावधी वर्षांची मेहनत आहे. यात आपले अर्थात मानवाचे योगदान काही लाख वर्षांचे देखील नाही. तरीही आपण विश्वाचे राजे म्हणून वावरताना दिसतो. पृथ्वीचे सर्वेसर्वा म्हणून घेताना दिसतो. पण प्रत्येकाला पृथ्वीचा हा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर 'इंडिका' वाचायलाच हवे.
एकूण पंधरा प्रकरणांमध्ये या पुस्तकाची विभागणी करण्यात आलेली आहे. यातून पृथ्वीच्या निर्मितीपासून मानवाच्या आजच्या प्रगती पर्यंतचा सखोल इतिहास आपल्याला वाचायला मिळतो. आज भारतीय उपखंड ज्या ठिकाणी आहे तिथे तो कोट्यवधी वर्षांपूर्वी नव्हताच. इतक्या वर्षांमध्ये हजारो किलोमीटरचा प्रवास करून आपण इथवर पोहोचलेलो आहोत. भारत, मादागास्कर, अंटार्क्टिका आणि ऑस्ट्रेलिया हे सर्व प्रदेश एकमेकांना जोडलेले होते ही कल्पनाच किती रोमांचकारी आहे! मागच्या चार पाच कोटी वर्षांमध्ये आपण हजारो किलोमीटरचा प्रवास करत आशिया खंडाला धडकले आहोत. या कालखंडामध्ये प्राण्यांच्या लाखो जाती तयार झाल्या आणि नष्टही झाल्या. अनेक प्राण्यांनी पृथ्वीवर राज्य केले. परंतु निसर्गाच्या पुढे कोणीही टिकू शकले नाही. पुस्तकाच्या पंधरा प्रकरणांपैकी फक्त तीन प्रकरणांमध्ये मानवी वाटचाल दिलेली आहे. यातूनच पृथ्वीच्या दृष्टीने मानवाचे अस्तित्व कितपत असावे, याचा अंदाज बांधता येईल. आपल्या पूर्वी पंधरा कोटी वर्षे डायनोसॉर नावाच्या प्राण्याने पृथ्वीवर अधिराज्य गाजवले. त्याचे अवशेष व जीवाश्म आजही विविध देशांमध्ये आढळून येतात. केवळ डायनासोरस नाही तर अनेक विविध प्रकारचे प्राणी पृथ्वीवर वावरत होते. परंतु विविध कारणांमुळे ते नष्ट झाले. डार्विनच्या थियरीनुसार जो तग धरून राहतो तोच टिकतो. हे आजवर सिद्ध झालेले आहे.
निसर्गामध्ये सजीव म्हणता येणारे करोडो प्राणी आणि वृक्ष आहेत. त्यांची उत्क्रांती नक्की कशी झाली, याचा देखील इतिहास या पुस्तकांमध्ये सखोलरीत्या लिहिलेला आहे. लेखकाने भूगर्भशास्त्राचा अतिशय विस्तृत अभ्यास केलेला दिसतो. शिवाय भारतीय उपखंडामध्ये त्यांचा प्रवास देखील प्रचंड झालेला आहे. पर्वतरांगांचा, डोंगरांचा, नद्यांचा, सरोवरांचा, खडकांचा, मातीचा सखोल अभ्यास करून वैज्ञानिक निष्कर्ष काढून पृथ्वीचा इतिहास लिहिल्याचे दिसते. एक ट्रेकर म्हणून मी देखील सह्याद्रीतल्या अनेक खडकांचा इतके बारकाईने निरीक्षण केले नव्हते. पण या पुस्तकाने मला देखील नवी दृष्टी निश्चितच प्राप्त करून दिली. विज्ञान हे अमर्याद आहे. कदाचित त्याचा अभ्यास करणे आपल्याला एका जन्मात देखील शक्य नाही, याची प्रचिती या पुस्तकातून निश्चितच येते.
पुस्तकाचे सर्वात महत्त्वाची वैशिष्ट्ये सांगायची म्हटलं तर यातील सर्वच चित्रे ही रंगीत आहेत! त्यामुळे इतिहास जिवंत उभा राहतो. शिवाय लेखकाने अनेक स्थळांचे निश्चित स्थान अक्षांश व रेखांशद्वारे दिलेले आहे. म्हणूनच ते गुगल मॅपमध्ये देखील शोधायला सोपे जाते. अनेक वैज्ञानिक बारकावे लेखकाच्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेची साक्ष देतात. होमो सेपियन्स जगभर कसे पसरले याचा नकाशा आणि चाळीस लक्ष वर्षांचा फॅमिली फोटो ही या पुस्तकातील सर्वोत्तम चित्रे होत! पुस्तक वाचताना वाटत होते की हा इतिहास कधीच संपू नये. अधिक जाणून घेण्याची जिज्ञासा अधिक तीव्र होत होती. हेच या पुस्तकाचे यश होय.
प्रणय लाल यांनी हे पुस्तक इंग्रजीत लिहिलेले असले तरी नंदा खरे यांनी त्याचा मराठीत अनुवाद केलेला आहे. नंदा खरे यांच्या यापूर्वी वाचलेल्या स्वलिखित पुस्तकातील भाषा मला अधिक क्लिष्ट वाटली होती. परंतु या पुस्तकाचा अनुवाद मात्र उत्तमच केलेला दिसतो.
शेवटी काय विज्ञानाकडे बघण्याची किंबहुना निसर्गाकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी देऊन जाणारे हे पुस्तक होय. विज्ञानावर नितांत प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने हे वाचायलाच हवे. 



Sunday, May 16, 2021

द अल्केमिस्ट

प्रेरणादायी पुस्तकांच्या यादी मधलं हे एक नाव... "द अल्केमिस्ट". ही कथा आहे एका मेंढपाळाची, जो खजिन्याच्या शोधार्थ फिरतो आहे. एका खंडातून दुसऱ्या खंडात गेलेला आहे. तिथून वाळवंटाद्वारे तो पिरॅमिडच्या प्रदेशात अर्थात इजिप्तपर्यंत पोहोचतो. या त्याच्या प्रवासामध्ये अनेक अडथळे येतात. त्याला काही संकटांचा सामना करावा लागतो. पण त्यातूनच त्याला अनुभव मिळत जातो. बाहेरचं जग कसा आहे, हे समजत जातं. नव्या गोष्टी तो शिकत चालतो. त्याच्या या प्रवासाने शिकवलेले अनुभव त्याला बरेच काही देऊन जातात. आपल्यामध्ये क्षमता किती आहेत? याची अनेकांना जाणीव नसते. अर्थात खजिना नक्की कुठे आहे? हेच आपण आयुष्यभर शोधत राहतो. परंतु या खजिन्याची दिशा व मार्ग आपल्याला प्रयत्नाने कधी ना कधीतरी सापडतोच, अशी कथा आहे... अल्केमिस्ट या पोर्तुगीज कादंबरीची. एका मेंढपाळाच्या प्रवासाभोवती फिरणारी ही कथा बरंच काही शिकवून जाते. एकाग्रतेने व सलगतेने वाचल्यास तिचा प्रभाव मात्र अनेक काळ आपल्या मनावर टिकून राहतो.



Thursday, April 22, 2021

दोन जगप्रसिद्ध साहसकथा: रॉबिन हूड आणि रॉबिन्सन क्रुसो

रॉबिन हूड हे नाव तसं लहानपणी मी पहिल्यांदा ऐकलं होतं. दूरदर्शनवर रॉबिन हूड चे कार्टून दाखवले जायचे त्यावेळेस त्याची कथा फारशी कळली नव्हती. मधल्या काळात हे नाव विस्मरणात गेले. परंतु या पुस्तकाने रॉबिन हूडची नव्याने पूर्ण ओळख करून दिली, असेच म्हणता येईल. जंगलात राहणारा हा एक वनवासी आहे. तो बंडखोर आहे. त्याच्याकडे बंडखोरांची भली मोठी फौज आहे. अन्याय करणाऱ्यांविरुद्ध तो थेट युद्ध पुकारतो आणि सामान्य माणसाला मात्र काहीच त्रास देत नाही. कदाचित याचमुळे अशा वृत्तीच्या लोकांना आजच्या काळातील रॉबिन हूड म्हटले जात असावे! या पुस्तकाचा अर्धा भाग रॉबिन हूडच्या कथांवर आधारित आहे; तर उरलेला रॉबिन्सन क्रुसो याच्या कथांवर. डॅनियल डफो यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद भा. म. गोरे यांनी केलेला आहे. रॉबिन्सन क्रुसो म्हणजे निर्जन बेटाचा राजा होय. साहसी सागरी प्रवासाची आवड असलेला हा एक युवक होता. पहिल्याच सागरी प्रवासात त्याची हौस फिटली होती. परंतु त्यातून तो बाहेर पडू शकला नाही. एका सागरी वादळामध्ये त्याचे जहाज निर्जन बेटावर अडकले. शिवाय पूर्ण जहाजातील वाचलेला तो एकमेव व्यक्ती होता! त्याच्या नशिबाने जहाजावरील बरीच साधनसामग्री त्याला वापरायला मिळाली. ज्या बेटावर तो आला होता, तिथे काहीच मानववस्ती नव्हती. अशा ठिकाणी तो कित्येक वर्षे एकटाच राहिला. अठरा वर्षानंतर त्याला नशिबाने एक मनुष्य सोबतीला मिळाला. त्याचा हा पूर्ण जीवनप्रवास या पुस्तकामध्ये कथारूपाने दिलेला आहे. एखाद्या निर्जन ठिकाणी मनुष्य कशा प्रकारे जीवन व्यतीत करू शकतो? त्याची ही मूर्तिमंत कहाणी होय. तब्बल २७ वर्षे रॉबिन्सन क्रुसो त्या निर्जन बेटावर राहिला. त्याचे अनेक अनुभव या पुस्तकात चितारलेले आहेत. लेखकाची शैली पाहता आपण क्रुसोच्या भूमिकेत त्या निर्जन बेटांवर वावरत राहतो. शालेय विद्यार्थ्यांना वाचण्याजोगे व भेट देण्याजोगे ही हे पुस्तक निश्चित आहे. 



Wednesday, August 19, 2020

खलील जिब्रानच्या उत्कृष्ट कथा

साधारणतः वीसेक वर्षांपूर्वी एका मराठी वृत्तपत्रामध्ये खलील जिब्रानच्या लघु बोधकथा प्रकाशित व्हायच्या. या बोधकथांमधून कमीत कमी घटनांद्वारे सर्वोत्तम संदेश लेखक देत असे. त्यामुळे त्या कथा मनाला भावत असत. खलील जिब्रान हे नाव तेव्हा मी पहिल्यांदाच ऐकले. आपल्या अवतीभवती घडणाऱ्या विविध घटनांना बांधेसूदपणे शब्दात मांडून त्याची बोधकथा तयार करण्याचे कौशल्य खलिल जिब्रान यांच्याकडे होते. त्यामुळे दररोज प्रसिद्ध होणाऱ्या या बोधकथा मी नियमित वाचत असे. आज वीस वर्षांनी खलील जिब्रानच्या कथा वाचण्याची पुन:श्च संधी मिळाली.
अनेकांना हे नाव कदाचित परिचित नसावे. खलील जिब्रान हे इंग्रजी आणि अरेबिक साहित्यातील एक प्रसिद्ध लेखक व चित्रकार होते. त्यांनी एकूण पंचवीस पुस्तके लिहिलेली आहेत. शिवाय त्यांच्या कथांचा जगातील २० पेक्षा अधिक भाषांमध्ये अनुवादही झालेला आहे. त्यांच्या या साहित्यातील सर्वोत्कृष्ट कथांचा स्मिता लिमये यांनी केलेला हा अनुवाद होय. 


खलील यांचा जन्म लेबेनॉन सारख्या सतत अराजकतेमध्ये वावरणाऱ्या देशामध्ये झाला होता. तरीही अशा वातावरणात त्यांची निर्मल विचारधारा साहित्य रुपाने बाहेर आली, हे विशेष! कमीत कमी शब्दांमध्ये कथा सादर करून त्याचे तात्पर्य वाचकांसमोर मांडण्याचे कौशल्य त्यांच्याकडे आहे. या पुस्तकाचे प्रामुख्याने तीन भाग आहेत. यातल्या पहिल्या भागामध्ये लेखकाचे विचार सुविचार रूपामध्ये मांडलेले आहेत. दुसऱ्या भागात लघु-बोधकथा वाचता येतात. तर तिसऱ्या भागामध्ये दोन दीर्घकथा आहेत. मनाला भावणारे विचार व लघु कथांमधून येणारी त्याची प्रचिती अनुभवायची असल्यास खलील जिब्रान यांचे साहित्य निश्चितच उपयोगी आणि प्रेरणादायी ठरेल असेच आहे.

Thursday, August 13, 2020

मानवजातीची कथा- डॉ. हेन्री थॉमस

डॉ. हेन्री थॉमस यांच्या लेखणीतून अवतरलेल्या 'मानवजातीची कथा' या पुस्तकाचा साने गुरुजींनी मराठीमध्ये अप्रतिम अनुवाद केला आहे. ही कथा आहे मानवजातीची...  खऱ्या अर्थाने मानवांच्या जातींची! या जाती कोणत्या? क्रूरकर्मा हुकूमशहा, धर्मांचे प्रेषित, आपल्याच नागरिकांवर अन्याय करणारे सम्राट, अहिंसेचा मार्ग असणारे संत, या विश्वाला खऱ्या मानवाच्या दृष्टीने बघणारे कवी-लेखक, कष्टकऱ्यांचे कष्ट समजून घेणारे विचारवंत, जगाला शांततेचा संदेश देणारे शांततादूत, अनेक देशांवर राज्य करण्याचे स्वप्न पाहणारे क्रूर राज्यकर्ते आणि जगाला नवे दृष्टिकोन देणारे तत्वज्ञ. अशा विविध मानव जातींचा हा संक्षिप्त इतिहास आहे. मानवी इतिहासामध्ये आजवर अनेक व्यक्ती होऊन गेल्या. त्यांच्या जीवनाचा व कार्याचा सारांश या पुस्तकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. हे मानव विविध प्रकारचे आहेत. मानवी इतिहासावर त्यांचा प्रभावही तितकाच मोठा आहे. त्यांनी जगाचा इतिहास व भूगोल बदलवून टाकलेला आहे. मानवाने कसे असावे व कसे असू नये? या दोहोंचीही अवलोकन करणारा हा इतिहास आहे. 

मागील अडीच ते साडेतीन हजार वर्षांमध्ये ज्या घडामोडी घडल्या व त्या घडामोडींवर ज्यांचा प्रभाव होता, त्यांचं संक्षिप्त चरित्र म्हणून या पुस्तकाकडे पाहता येईल. मानवी संस्कृतीची सुरुवात झाल्यानंतर मागील तीन हजार वर्षांमध्ये आपण खऱ्या अर्थाने प्रगत होत गेलो. याच कालखंडात मानव म्हणून आपल्यातील अनेक प्रवृत्ती दिसून आल्या. त्याच प्रवृत्तींचं प्रतिमा चित्रण म्हणजे 'मानवजातीची कथा' होय. या कथेची सुरुवात होते बंडखोर राजपुत्र मुसा याच्यापासून आणि शेवट झाला आहे दुसऱ्या महायुद्धाच्या मुसोलीनी आणि हिटलरमध्ये. या दरम्यानच्या कालखंडातील अनेक व्यक्ती त्यांची नावे आपण यापूर्वी अनेकदा ऐकली. त्यांचे कार्य ही आपल्याला ज्ञात आहे. परंतु, त्याचा जगाच्या इतिहासावर नक्की कसा प्रभाव पडला याची माहिती मात्र आपल्याला नाही. हा इतिहास प्रामुख्याने युरोप खंडात घडला. ग्रीस, इटली, स्पेन, पोर्तुगाल, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, रशिया, हॉलंड या देशांमध्ये अनेक व्यक्ती होऊन गेल्या. त्यांची व त्यांच्या कार्याची मीमांसा आपल्याला पुस्तकांमधून होते. युरोप व्यतिरिक्त अमेरिकेतील दोन आणि अशियातील तीन व्यक्तींची संक्षिप्त माहिती लेखकाने या पुस्तकात दिली आहे.
ग्रीक व रोमन संस्कृती या जगाच्या इतिहासातील सर्वात जुन्या संस्कृती होत. त्यांच्यामध्ये दोन हजार वर्षांपूर्वी अनेक राजे होऊन गेले. अनेक तत्त्वज्ञ व शास्त्रज्ञही झाले. तो काळ होता जगात धर्म येण्यापूर्वीचा, म्हणजे नरसंहार करण्यासाठी तत्कालीन सम्राटांना धर्माचे कारण नव्हते. यात काळातील अलेक्झांडर, एपिक्यूरस, हॅनिबॉल, केटू, सीझर, चौदावा लुई, नेपोलियन सारखे युरोपियन सम्राट या जगावर केवळ हुकूमत गाजवण्यासाठी व राज्य करण्यासाठीच जन्माला आले होते, असे इतिहास सांगतो. त्यांच्या पूर्वी आशियाची भूमी भगवान गौतम बुद्ध, कन्फ्यूशियस आणि लाओत्से सारख्या महान पुरुषांच्या जन्माने पावन झालेली होती. युरोपात मात्र अशी परिस्थिती दिसून आली नाही. ज्या राजांना आपण इतिहासात स्थान देतो, त्यांनी किती मोठा जागतिक नरसंहार केलेला आहे, याची प्रचिती या पुस्तकातून येते. अलेक्झांडर पासून मागील शतकातल्या हिटलरपर्यंत सर्वांनीच कोणत्या ना कोणत्या कारणास्तव फक्त माणसे मारण्याचे काम केले होते. दोन हजार वर्षांपूर्वी जगात धर्माची निर्मिती झाली आणि पुनश्च नरसंहार करण्यासाठी राज्यकर्त्यांना सम्राटांना आणि हुकूमशहांना कारण मिळाले. साम्राज्यवादी धर्म अनेक मोठ्या लढायांना व धर्म युद्धांना कारणीभूत ठरले आहेत. या धर्माचा प्रसार जगात तर झालाच. परंतु त्याची किंमत मनुष्यहानीने जगाला मोजायला लागली. इतक्या प्रदीर्घ कालखंडानंतर जगात फक्त ज्यू, भारतीय आणि चीनी या तीन संस्कृती आजवर टिकून आहेत. ज्यू लोकांनी आजवर जितकी हानी व अन्याय सहन केला असेल, तितका कदाचित इतर कोणत्याही संस्कृतीमध्ये केला गेला नसावा. आक्रमकांनी आपला धर्म जगभर पोहोचवला. माणसे मारून आमचा धर्म कसा माणुसकीचा धर्म आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. त्यातही वरील तीन संस्कृती अजूनही टिकून आहे हे विशेष!
जगाचा इतिहास तसा फक्त क्रूरकर्मा राजांचा होता असे नाही. या इतिहासात डांटे आणि गटे सारखे महान कवी, शेक्सपियर सारखे नाटककार विचारवंत होऊन गेले. कला-विज्ञान यांची सांगड घालणारा लिओनार्दो द विंची होऊन गेला. जगाने संशोधक वृत्तीचा कोलंबस पाहिला आणि आपल्या पूर्वजांचा परिचय करून देणारा चार्ल्स डार्विनही पाहिला. स्पायनोझा सारखा थोर विचारवंत या जगात जन्मला होता हेही आपले भाग्य होय. लिंकन, टॉल्स्टॉय आणि महात्मा गांधी यांच्यासारखी माणसे व त्यांच्या विचारधारा जगाने पाहिल्या.
एक गोष्ट मात्र येथे हे प्रकर्षाने नमूद करावीशी वाटते की, धर्म या संकल्पनेभोवती, त्याच्या रक्षणासाठी तसेच प्रसारासाठी जितक्या अमानुष हत्या आजवर या जगात झालेल्या त्या इतर कोणत्याही कारणाने झालेल्या नाहीत. कार्ल मार्क्सने म्हटले होते की, धर्म ही अफूसारखी आहे. तिची नशा कधीच उतरत नाही. जगाच्या इतिहासातून एक गोष्ट खूप प्रकर्षाने जाणवते.
प्रत्येक संस्कृतीमध्ये प्रेषित तयार झाले आहेत. प्रथम प्रेषितांना ठार मारायचे आणि मग त्यांची प्रेते पुजायची. ही मानवाची नेहमीचीच युक्ती आहे. अनेक प्रेषितांनी जन्मभर मानवतेचा संदेश दिला. परंतु त्यांच्या अनुयायांना मात्र तो आजही समजलेला नाही, हे दुर्दैव! आपला इतिहास अत्यंत प्रेरणादायक आहे. त्यातून सकारात्मक गोष्टी घेता येतात आणि नकारात्मक बाबी टाकूनही देता येतात. या इतिहासात शिकण्यासारखं बरच काही आहे. इतिहासात होऊन गेलेल्या व्यक्तींकडून अगाध ज्ञान प्राप्ती होते. परंतु त्यातून कोणत्या गोष्टी घ्यायच्या आणि कोणत्या सोडून द्यायच्या? हे ज्याने त्याने ठरवायचं असतं. हाच या पुस्तकाचा सारांश!

पुस्तकातील प्रमुख व्यक्तींचा इतिहास...
- राजपुत्र मूसा इतिहासातील पहिला युद्धविरोधी वीर जेरिमिया
- देवत्व पावलेला नास्तिक बुद्ध
- ख्रिस्ताचा आध्यात्मिक पिता कन्फ्यूशियस
- ज्याने साम्राज्य मिळाले; पण संस्कृतीचा विध्वंस असा सायरस
- अथेन्सचा लोकप्रिय लोकशाही पक्ष-नेता पेरिक्लीस अधिक चांगल्या जगाचे स्वप्न खेळविणारा प्लेटो
- स्वत: व ईश्वर यांत जगाची वाटणी करणारा अलेक्झांडर
- हसरा, दुःखवादी एपिक्यूरस
- द्वेष मूर्ती हैनिबल कार्थेजियन राजपुत्र
- जगातील कपटपटूंचा शिरोमणी कॅटो
- देव होऊ पाहणारा मनुष्य : सीझर
- नाझारेथ बहिष्कृत ज्यू येशू
- मातृहत्यारा सम्राट नीरो
- तत्त्वज्ञानी सम्राट मार्कस ऑरेलियस
- कॉन्स्टंटाइन : जुन्या धर्मवृत्तीचा आत्मा असलेला ख्रिश्चन
- शार्लमन : पोपला वाचवून स्वत: सम्राट होणारा संन्यासी
- पीटर : अमीन्सचा माथेफिरू भिक्षु
- कॅथलिक पंथी बंडखोर : अॅसिसीचा साधू फ्रॅन्सिस
- मुक्या शतकाचा आवाज : डान्टे
- युरोप व आशिया यांमधील दुवा : मार्को पोलो
- नवयुगाचे तीन पुरस्कर्ते : पेट्रार्क, जोहान्स हस, जॉन बॉल
- ऑर्लिन्स येथील कुमारी जोन ऑफ आर्क : फ्रान्सची माता
- टॉर्कीमीडा व पवित्र 'इन्क्विझिशन' न्यायसंस्था
- अमेरिका न शोधणारा कोलंबस
- कला-विज्ञान-वेत्ता लिओनार्डो डी व्हिन्सी
- पोपला धाब्यावर बसविणारा शेतकरी मार्टिन ल्यूथर
- सैतानाचा शिष्य मॅकिऑव्हिली
- नव सृष्टीचा निर्माता शेक्सपिअर
- फ्रेंच राजांपैकी अति प्रसिद्ध राजा चौदावा लुई
- अहिंसक, युद्ध-प्रतिकारी जॉर्ज फॉक्स
- अॅमस्टरडॅम येथील शांतमना स्पायनोझा
- रशियावर सुधारणा लादणारा पीटर दि ग्रेट
- व्हॉल्टेअर
- जग जिंकूनही निर्वासित अवस्थेत मरणारा नेपोलियन
- गटे: हा पाहा खरा मनुष्य
- संयुक्त युरोपचे स्वप्न खेळवणारा इटालियन नेता : मॅझिनी
- समाजवादाचा जनक कार्ल-मार्क्स
- प्रशियाचा प्रतिगामी चॅन्सेलर विस्मार्क
- आपल्या पूर्वजांचा परिचय करून देणारा चार्लस डार्विन
- कृष्णवर्णियांचा त्राता अब्राहम लिंकन
- द्वेषविहीन जगाचे ध्येय देणारा टॉलस्टॉय
- शेवटचा कैसर सम्राट दुसरा वुइल्यम
- मॅकि विलियन पद्धत पत्करणारे हुकूमशाही विरुद्ध लोकशाही : मुसोलिनी, हिटलर, रुझवेल्ट

Thursday, July 23, 2020

१४ स्टोरीज दॅट इस्पायर्ड सत्यजित राय

वाङ्मय ही प्रेरणा असू शकते का? निश्चितच होय... कथा,कविता, कादंबरी अशा साहित्याच्या विविध प्रकारांनी अनेकांना प्रेरणा दिली आहे. विविध कादंबरी व कथांवर आधारित आजवर अनेक चित्रपट विविध भाषांमध्ये तयार झाले. ज्येष्ठ दिग्दर्शक सत्यजीत राय हेही याला अपवाद नाहीत.
सत्यजित राय यांना प्रेरणा देणाऱ्या चौदा विविध लघुकथा या पुस्तकांमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. त्यातला प्रत्येक सिनेमा हा श्रेष्ठ दर्जाचा होता. देवी, जलसा घर आणि शतरंज के खिलाडी हे त्यापैकी काही गाजलेले चित्रपट होय. १४ पैकी १३ कथा या पुस्तकांमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. प्रेमचंद यांची एक कथा वगळता अन्य सर्व कथा ह्या बंगालीतून इंग्रजीमध्ये भाषांतरित झाल्या व इंग्रजीतुन मराठीमध्ये नीता गद्रे यांनी भाषांतरित केलेल्या आहेत.
रवींद्रनाथ टागोर, ताराशंकर बंदोपाध्याय, प्रभात कुमार मुखोपाध्याय, राजशेखर बसू आणि प्रेमचंद यांच्या कथा या कथासंग्रहात समाविष्ट आहेत. शिवाय सत्यजित राय यांनी ही दोन कथा लिहिलेल्या आहेत. अतिथी आणि पिकुची डायरी या कथांमधून त्यांचे लेखन कौशल्यही प्रतीत होते. जीवनातील विविध रस या कथांमधून आपल्याला अनुभवयास मिळतात. कथा लिहिली गेली तरी दिग्दर्शकाने ती ज्या पद्धतीने मांडली आहे, त्या पद्धतीवर ती श्रोत्यांपर्यंत कशाप्रकारे पोहोचते, हे अवलंबून असते. अशाच धाटणीच्या विविध कथा या पुस्तकांमधून वाचकांना वाचायला मिळतील.


Wednesday, October 30, 2019

अवघे जग बदलून टाकणारे महान द्रष्टे

"टॉप व्हिजनरीज हू चेंज्ड द वर्ल्ड" या जॉर्ज इलियन लिखित पुस्तकाचा "अवघे जग बदलून टाकणारे महान द्रष्टे" हा अनुवाद होय. तंत्रज्ञानाच्या विश्वाचे राजे असणारे स्टीव जॉब्स, जॅक मा, बिल गेट्स, एलोन मस्क व मार्क झुकेरबर्ग यांचे हे छोटेखानी प्रेरणादायी चरित्र आहे. कोणतीही संकल्पना मनात येणे, ती प्रत्यक्षात उतरवणे व व्यावसायिकरित्या यशस्वी करून दाखवणे, याची गोष्ट या पुस्तकातून वाचायला मिळते. वरील सर्व तंत्रज्ञ व व्यावसायिकांनी आपली संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी काय काय मेहनत घेतली? अपयशाच्या कोणत्या पायऱ्या पार केल्या? व आज ते इतक्या उंचीवर पोहोचूनही सामाजिक भावनेने कशा प्रकारे कार्य करत आहेत? या सर्व प्रश्नांची उत्तरे या पुस्तकातून मिळतात. शिवाय अन्य देशांची विचारसंस्कृती व भारतीय विचारपद्धती यातील फरकही प्रकर्षाने जाणवतो. म्हणजे सांगायचं असं की, यातील एक जण जरी भारतीय कुटुंबात व भारतात जन्माला आला असता तर कदाचित तो या स्थानी असला नसता. आपल्या देशात अनेक धडपडे तरुण आहेत. परंतु, त्यांना प्रोत्साहन देणारे वातावरण इथे नाहीये. ते कसे असावे? या प्रश्नाचे उत्तर या पुस्तकातून मिळू शकेल. 


स्टीव जॉब्स वगळता इतर चौघे आजही अविरतपणे कार्यरत आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात विविध प्रकारची सकारात्मक व नकारात्मक वळणे आली. त्यांचा योग्य रीतीने सामना केला गेला. त्यांची एक विचारसरणी तयार होत गेली. हेच त्यांच्या यशस्वीतेचे मुख्य कारण आहे. अगदी सारांश सांगायचा तर "थ्री इडियट्स" या हिंदी चित्रपटात फुनसुख वांगडू सांगतात तसं "सक्सेस के पीछे मत भगो, एक्सलन्स का पीछा करो. सक्सेस झक मार के तुम्हारे पिछे आयेगी".