Friday, August 4, 2023

प्रशिक्षणाची भाषा

काही महिन्यांपूर्वी भारतातील एका प्रसिद्ध मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये माझे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे प्रशिक्षण आयोजित केले होते. पुणे जिल्ह्यामधील विविध एमआयडीसीमध्ये या कंपनीच्या अनेक शाखा आहेत. दर दिवशी एका शाखेमध्ये समान पद्धतीचेच प्रशिक्षण द्यायचे होते. विविध शाखांमध्ये विविध भाषिक लोक असल्यामुळे बहुतांश वेळा प्रशिक्षण इंग्रजीतूनच होत होते. काही ठिकाणी अमराठी लोक देखील मराठी समजून घेत. अशा ठिकाणी दोनही भाषांचा मी वापर केला. एका शाखेमध्ये सर्वच लोक मराठी भाषिक होते. तिथे पूर्ण वेळ मराठीतून प्रशिक्षण घेतले. सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सलग प्रशिक्षण चालू होते. परंतु प्रशिक्षणार्थींचा उत्साह काही कमी झाला नव्हता. याउलट त्यांची उत्सुकता जागृत झाली आणि त्या दिवशीचे प्रशिक्षण अतिशय उत्तमरीत्या पार पडले. लोकांना आपल्या भाषेमध्ये तंत्रज्ञान समजून घ्यायचे होते आणि ते त्यांना समजले देखील. याचा मला देखील आनंद झाला होता. अनेकांनी नंतर देखील माझ्याशी संपर्क साधून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला.
या उलट अन्य एका शाखेमध्ये दक्षिण भारतीय लोकांची संख्या जास्त असल्यामुळे तिथे पूर्णपणे इंग्रजीतून प्रशिक्षण घ्यावे लागले. अर्थात प्रशिक्षणातील मुद्दे समान होते. त्यात काहीच फरक नव्हता. फक्त भाषा वेगळी होती. त्यामुळे इथला प्रतिसाद आधीच्या शाखेइतका प्रभावी वाटला नाही. खरंतर इंग्रजी कितीही अनौपचारिक करण्याचा प्रयत्न केला तरी ती आपल्यासाठी परकीय भाषाच असते. आणि औपचारिक सोपस्कार पूर्ण करण्यासाठीच वापरण्यात येते. कदाचित याच कारणामुळे आधीच्या प्रशिक्षणाइतका जोरदार प्रतिसाद इथे मिळाला नाही. काहीजण तर एखादं जबरदस्तीने ऐकावं लागणार लेक्चर ऐकतोय, अशा स्थितीमध्ये बसले होते. सर्वांना प्रशिक्षणातील मुद्दे तर समजले. पण जो प्रतिसाद अपेक्षित होता तसा मिळाला नाही.
दोन्ही ठिकाणी प्रशिक्षणातील मुद्दे समान होते, प्रशिक्षक देखील तोच होता, फक्त भाषा वेगळी होती. गेल्या अनेक वर्षांपासून केवळ इंग्रजीतून शिकवत असल्याने त्याची खूप सवय झाली आहे. मराठीतून बोलताना देखील अनेक तांत्रिक शब्द तोंडात येतात. पण मराठीमधून आपण समोरच्या माणसांशी जोडले जातो. कोणत्याही प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये जेव्हा वक्ता आणि श्रोते एकमेकांशी भाषेने जोडले जातात तेव्हा त्याची परिणामकारकता अतिशय उच्च असते. याची प्रचिती त्यादिवशी मला आली.


- तुषार भ. कुटे

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com