Sunday, July 20, 2025

सम्या सम्या मैफिलीत माझ्या

'स्टँडअप कॉमेडी' हा मागच्या काही वर्षांमध्ये वेगाने लोकप्रिय झालेला प्रकार. स्वतःला कॉमेडियन म्हणणारे अनेक जण छोट्या छोट्या सभागृहांमध्ये कार्यक्रम घेतात. आणि फुटकळ, बाष्कळ, पांचट तसेच प्रामुख्याने अश्लील विनोद करून इंस्टाग्राम आणि युट्युबद्वारे वेगाने लोकप्रिय होतात. असा हा प्रकार. हिंदीमधून सुरू झालेल्या या प्रकाराची 'झळ' मराठीविश्वाला देखील बसली. त्यामुळे मराठीमध्ये देखील जेन-झेडच्या पिढीमध्ये असेच अनेक कॉमेडीयन तयार झालेले दिसतात. या सर्व विचित्र प्रकारामध्ये मराठीला पु. ल. देशपांडे तसेच व. पु. काळे यांची असलेली नैसर्गिक, दर्जेदार आणि निखळ विनोदाची परंपरा लयाला गेलेली आहे की काय, अशी मला शंका येऊ लागली होती. परंतु समीर चौघुले यांच्या 'सम्या सम्या मैफिलीत माझ्या' या कार्यक्रमाने ती पूर्णतः फोल ठरवली. आजही पुलं आणि वपु यांचा वारसा सांगण्यासाठी आपल्याकडे समीर चौघुले यांच्यासारखा उत्तम विनोदी लेखक आणि कलाकार आहे, याचीच प्रचिती हा कार्यक्रम बघितल्यानंतर आली!
घरी टीव्ही नसल्यामुळे आम्ही मनोरंजनासाठी केवळ सोनी लिव्हवरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हाच एकमेव कार्यक्रम पाहतो. यातील उत्तम विनोदी प्रहसनांद्वारे या कार्यक्रमातून मनोरंजन होते. शिवाय यातील कलाकार देखील त्याच गुणवत्तेचे आहेत. समीर चौघुले मात्र या सर्वांमध्ये अतिशय विशेष. तो आमच्या नऊ वर्षाच्या ज्ञानेश्वरीचा लाडका कलाकार. 
त्याला पाहण्यासाठीच अगदी योगायोगाने चिंचवडच्या रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहामध्ये त्याचा कार्यक्रम पाहण्याचा 'योग' आला. या कार्यक्रमामध्ये नक्की काय असेल, याची काहीच कल्पना नव्हती. पण समीरदादाच्या अभिनयाची एकंदरीत उंची आम्हाला माहीत होती. त्यामुळे या एकपात्री कार्यक्रमातून देखील तो निश्चितच काहीतरी वेगळं आणि नाविन्यपूर्ण देणार याची खात्री होती. अर्थात झाले ही तसेच. आम्हाला समोरच्या दुसऱ्या क्रमांकाच्या रांगेतील आसन मिळाले होते. त्यामुळे अगदी जवळून आम्ही समीरदादाला पाहत होतो. कार्यक्रमाच्या नावामागचा इतिहास सांगत त्याने आपल्या 'अभिवाचनाचा' श्रीगणेशा केला. आणि तिथूनच नैसर्गिक विनोदांची पेरणी करत हा कार्यक्रम पुढे सरकू लागला. जवळपास प्रत्येक वाक्याला हास्याच्या लकेरी श्रोत्यांच्या चेहऱ्यावर उमटत होत्या. हास्याचे विविध प्रकार या कार्यक्रमात आम्ही अनुभवत होतो. स्मितहास्यापासून अगदी सातमजली हास्यापर्यंतचे सर्व अनुभव आम्ही घेतले. केवळ आम्हीच नाही तर त्या खचाखच भरलेल्या प्रेक्षागृहामध्ये प्रत्येक जण सम्याच्या नैसर्गिक विनोदांचा पुरेपूर आनंद घेत होता. एखाद्याची निरीक्षणक्षमता आणि विनोदबुद्धी किती वरच्या दर्जाची असते, हेच समीर चौघुलेंच्या या कार्यक्रमातून दिसून आले. पोट धरून हसणारी अनेक मंडळी आमच्या आजूबाजूला आम्ही पाहत होतो. शिवाय आमचीही गत काही वेगळी झालेली नव्हती! त्यादिवशी कित्येक वर्षांनी हसून हसून तोंड आणि पोटही दुखायला लागले! बहुतांश प्रेक्षक सातत्याने 'वा दादा वा...' आणि 'वा सम्या वा'(!) म्हणत उस्फूर्त दाद देखील देत होते. विशेष म्हणजे यातील कोणतेच विनोद आजच्या स्टँडअप कॉमेडीयनच्या फुटकळ विनोदासारखे नव्हते. आपल्या अनुभवातून तसेच निरीक्षणक्षमतेतून सम्यादादाने ते प्रेक्षकांसमोर अतिशय सहजपणे आपल्या नैसर्गिक शैलीत सादर केले. 'पैसा वसूल' म्हणतात तशाच प्रकारातला हा एकंदरीत कार्यक्रम होता. असं म्हणतात की प्रेक्षकांना रडवणं सोपं असतं, परंतु हसवणे मात्र महाकठीण! मग सतत दोन-अडीच तास हसवणे किती कर्मकठीण काम असावं, याचा विचार करा. 
कार्यक्रमामध्ये त्याने त्याच्या सुमधुर आवाजामध्ये काही गाणी देखील गायली. व्यावसायिक गायक नसला तरीही अतिशय गोड गळा त्याला लाभला आहे, हेही समजले.
समीरदादाचा हा कार्यक्रम पाहिल्यानंतर एक गोष्ट मात्र समजली की मराठी विनोदाची परंपरा पुढे नेणारा कलाकार आजही महाराष्ट्रामध्ये आहे. तो इंस्टाग्राम अथवा युट्युबद्वारे झटपट लोकप्रिय झालेला नाही. त्यामागे त्याचे अनेक वर्षांपासूनचे परिश्रम आहेत, वाचन आहे, निरीक्षण आहे. याच कारणास्तव तो एकपात्री नाट्यप्रकारात आपले स्थान 'अढळ' करत आहे. अशा कलाकाराला मराठी प्रेक्षकांच्या शंभर टक्के साथीची आवश्यकता आहे. अर्थात मराठी रसिक मायबाप ती देतच आहे, यात शंका नाही. परंतु उत्तरोत्तर वृद्धिंगत झाली तर आणखीही मराठी कलाकार आपल्या भाषेची ही परंपरा पुढे चालू ठेवतील, अशी आशा वाटते. 
बाकी समीरदादा बेस्टच. अजूनही कितीतरी वेळा हा कार्यक्रम पुन:श्च पाहिला तरी कंटाळा येणार नाही, हे मात्र मी निश्चित खात्रीने सांगतो. पुलं आणि वपु यांचे कार्यक्रम आम्ही आज युट्युबवर पाहतो, ऐकतो तेव्हा त्यांना प्रत्यक्ष रंगमंचावर पाहण्याची, ऐकण्याची आणि अनुभवण्याची संधी मिळाली नाही, याचे वाईट वाटते. परंतु आमच्या पिढीला समीर चौघुलेसारख्या कलाकाराचा कार्यक्रम प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळाली हे खरोखरच आमचे भाग्य आहे, असे वाटून गेले.

--- तुषार भ. कुटे


 


 

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com