धुळ्याच्या श्री विलेपार्ले केळवणी मंडळाच्या तंत्रशिक्षण संस्थेमध्ये अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने आयोजित केलेल्या ब्लॉगचेन या तंत्रज्ञानावर आधारित कार्यशाळेसाठी शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मला जायचे होते. तसं पाहिलं तर माझे येथील व्याख्यान केवळ अडीच ते तीन तासांचे होते. शिवाय सध्याच्या व्यग्र वेळापत्रकामधून पुण्यापासून इतक्या दूरवर व्याख्यान देण्यासाठी जायचे म्हणजे जिकीरीचे काम होते.
अखेरीस रस्त्यानेच स्वतःच्या गाडीने प्रवास करत जायचे आम्ही ठरवले. माझी गाडी इलेक्ट्रिक अर्थात टाटाची नेक्सॉन ईव्ही. आणि पुण्यापासून धुळ्यापर्यंतचा अंतर होतं सव्वातीनशे किलोमीटर पेक्षा अधिक! एका दिवसामध्ये जाऊन परत येणं तसं अवघड वाटत होतं. परंतु दुसऱ्या दिवशी पुन्हा ऑफिसमध्ये नेहमीच्या प्रशिक्षणासाठी यायचं होतं. त्या दृष्टीने धुळ्याच्या या एका दिवसाच्या प्रवासाची आम्ही योजना आखली.
पहाटेच पुणे-नाशिक महामार्गाने धुळ्याच्या दिशेने रवाना झालो. आदल्या दिवशी विजांच्या गडगटाटासह पावसाने धुमाकूळ घातला होता. त्यामुळे या प्रवासातही मुसळधार आणि जोरदार पावसाची शक्यता होती. परंतु प्रत्यक्ष जसे काहीही झाले नाही. सकाळी निघालो त्यावेळेस आकाशातले ढग बऱ्यापैकी निघून गेले होते. संगमनेरचा टोलनाका पार झाल्यानंतर लगेचच गाडी चार्जिंगला लावली. अर्थात एवढ्या ऊर्जेमध्ये आम्ही धुळ्यापर्यंत निश्चित पोहोचू शकत होतो.
नारायणगावपासून सिन्नर पर्यंतचा पुणे-नाशिक महामार्गाचा टप्पा भयावह स्थितीमध्ये आलेला आहे. बऱ्याच ठिकाणी अजूनही वाहनचालकांना गाडी चालवण्यासाठी कसरत करावी लागते. अर्थात यामध्ये आम्ही देखील सामील होतो. राष्ट्रीय महामार्गांवर इलेक्ट्रिक वाहनांना ५०% टोलमाफीची घोषणा झाली, परंतु अजूनही कोणत्याच टोलनाक्यावर या सूचनेची अंमलबजावणी केली जात नाही. याचाही अनुभव आला!
सिन्नरपाशी महामार्ग सोडला आणि निफाडकडे जाणाऱ्या रस्त्याने मार्गक्रमण चालू केले. तेव्हा वातावरण पूर्णपणे निरभ्र झालेले होते. आजूबाजूला जिथवर नजर जाईल तिथपर्यंत हिरवीगर्द झाडी आणि त्यांच्या मधून काळा कुळकुळीत डांबरी रस्ता दिसत होता. महामार्ग सोडल्याने आता रस्त्यावरची गर्दी बऱ्यापैकी कमी झालेली होती. थोड्याच वेळात नांदूर-मध्यमेश्वरच्या पक्षी अभयारण्यापाशी पोहोचलो. त्या निसर्गरम्य परिसराचा आस्वाद घेत तसेच नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर आणि निफाड तालुक्यातील समृद्ध गावांच्या परिसरातून प्रवास करत आम्ही नाशिक-संभाजीनगर महामार्गाला लागलो. या रस्त्याची ही परिस्थिती भयावह अशीच होती. येथून निफाड पर्यंतचा तीन किलोमीटरचा रस्ता पार करायला जवळपास १५ मिनिटे लागली! निफाडनंतर चांदवडच्या दिशेने निघालो. थोड्याच वेळात दूरवर चांदवड तालुक्यातील सातमाळ्याच्या रांगा दृष्टीस पडू लागल्या. पावसाचे अजूनही नामोनिशान नव्हते. थोड्याच वेळात चांदवड शहरात पोहोचलो. जवळपास दशकभरानंतर या शहराचे दर्शन घेतले होते. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग लागला आणि पुन्हा तीच गर्दी रस्त्यावर दिसू लागली. चांदवडहून मालेगाव आणि मग लवकरच धुळे शहरामध्ये पोहोचलो. मागच्या तीन-चार तासांमध्ये जाणवत असलेल्या वातावरणातील गारवा नष्ट झाला होता. खरोखर उन्हाळा ऋतू चालू आहे की काय, असं वाटू लागलं होतं. अर्थात महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणांमधील वातावरणातला तसेच तापमानातील हा फरक स्पष्टपणे जाणवत होता. यावेळेस देखील आम्ही गुगल मॅपला पाऊण ते एक तासाने हरवले होते!
बरोबर दोन वाजता महाविद्यालयात पोहोचलो आणि पाच वाजता व्याख्यान संपल्यानंतर पुन्हा परतीच्या मार्गाने लागलो. नियोजनात थोडीशी गडबड झाल्यामुळे धुळे शहर सोडायला साडेसहा वाजले. संध्याकाळीची महामार्गावरील गर्दी आणि अधूनमधून कोसळणारा पाऊस यातून मार्ग काढत मुंबई-आग्रा महामार्गाने प्रवास करू लागलो. बहुतांश ठिकाणी रस्त्याची कामे चाललेली होती. त्यामुळे भयंकर रहदारीचा सामना करत आणि भल्या मोठ्या मालवाहू कंटेनर आणि ट्रकच्यामधून मार्ग काढत आम्ही पुढे सरकत होतो. मालेगाव बाह्यमार्ग सोडल्यानंतर रस्ता बऱ्यापैकी रिकामा झाला. तोपर्यंत हा प्रवास कष्टप्रद असाच वाटत होता. चांदवडमध्ये पोहोचायला जवळपास दोन तास लागले.
चांदवड ते सिन्नर हा जवळपास ८० किलोमीटरचा रस्ता आहे. यामध्ये निफाड वगळता अन्य कोणतेही मोठे गाव लागत नाही. साडेआठ ते साडेनऊच्या सुमारास आम्ही इथल्या अंतर्गत सामसूम झालेल्या रस्त्यांवरून वेगाने प्रवास करत होतो. रस्त्यातली सर्व गावे जवळपास शांत झालेली होती. वर्दळदेखील अतिशय कमी झालेली होती. शांत आणि सातत्यपूर्ण वेगाने आमचा प्रवास या मार्गावरून पूर्ण झाला. पावणेदहा वाजता पुन्हा पुणे-नाशिक महामार्गाला लागलो. समृद्धी महामार्गाच्या जवळ जेवण केले, गाडी चार्ज केली आणि थेट पुण्याच्या दिशेने परतीच्या मार्गाला लागलो.
हा प्रवास थकवणारा नव्हता... एक रोमांचकारी अनुभव होता आणि सुयोग्य नियोजनाचे धडे देणारा होता. प्रत्येक वेळी गुगल मॅपला आम्ही अर्धा ते पाऊण तासाने हरवले. कदाचित ही आमच्या गाडीची किमया होती. एकंदर प्रवासामध्ये सहाशे नव्वद किलोमीटरचे अंतर पार झाले. यापूर्वीचा पुणे ते हैदराबाद हा पावणे सहाशे किलोमीटरचा विक्रम मोडीत निघाला.
इंद्रायणी, भामा, भीमा, घोड, मीना, कुकडी, मुळा, प्रवरा, गोदावरी आणि मोसम अशा तब्बल दहा नद्या आणि चार महामार्ग या एकंदरीत प्रवासात पार झाले!
Sunday, September 21, 2025
पुणे -> धुळे -> पुणे = ६९१ किमी
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com