--- तुषार भ. कुटे
Thursday, October 3, 2024
मी साउथ इंडियन?
Tuesday, January 9, 2024
एक दृष्टिकोन
पुण्यातील एका राष्ट्रीय शिक्षण संस्थेमधील माझे काम आटोपून मी निघालो
होतो. तळमजल्यावर कुणीच नव्हते. समोरून दोन विद्यार्थी काहीतरी शोधात
येताना दिसले. त्यांनी मला हाक दिली आणि विचारले, “सर टॉयलेट कुठे आहे?”
त्यांच्या बोलण्यावरून ते मराठी भाषिक वाटत नव्हते. पण तरीदेखील त्यांनी
मराठी भाषेतून हा प्रश्न विचारला, याचे मला आश्चर्य वाटले. त्यामुळे मी
तात्काळ त्यांना स्वच्छतागृहाचा रस्ता दाखवला. जाता जाता त्यांच्यातील
संभाषण माझ्या कानी पडले.
दोघेही उत्तर भारतातील वेगवेगळ्या राज्यातून
पुण्यात शिकायला आले होते. ज्या विद्यार्थ्याने मला विचारले तो इथे
येण्याआधी पुणे शहराचा आणि इथल्या भाषेचा देखील अभ्यास करून आलेला होता!
शिवाय मराठी भाषेत जुजबी प्रश्न विचारण्याचा सराव देखील त्याने केला होता.
त्याचे मला विशेष कौतुक वाटले. कारण आजवर आपण पाहिलेच आहे की, उत्तरेतून
आलेले लोक मराठी लोकांना गृहीत धरतात. आमची भाषा मराठी लोकांना येतच असेल,
शिवाय तेच आमच्याशी आमच्या भाषेमध्ये बोलतील हे देखील त्यांना माहीत असतं.
म्हणून महाराष्ट्र भूमीची मराठी भाषा शिकण्याची तसदी कोणी घेत नाही. परंतु
या विद्यार्थ्याप्रमाणे दृष्टिकोन असेल तर त्यांच्याविषयी मराठी लोकांना
देखील आपुलकी वाटेल. गरज कोणाला आहे हा प्रश्न नाही तर बाहेरून आलेले लोक
इथल्या राज्याचा आणि भाषेचा किती सन्मान करतात? हे जास्त महत्त्वाचे.
- तुषार भ. कुटे
Friday, January 5, 2024
आपली भाषा
रविवारचा दिवस. सकाळी बऱ्याच दिवसांनी बाहेर नाश्ता करण्यासाठी आम्ही
जवळच्या एका हॉटेलमध्ये आलो. गर्दी फारशी नव्हती. आमची ऑर्डर दिली आणि वाट
पाहू लागलो. शेजारच्या टेबलावर एक मराठी जोडपे येऊन बसले. अर्थात त्यांच्या
बोलण्यावरून ते मराठी आहेत, हे आम्हाला समजले. त्यांनी लागोलाग हॉटेलच्या
वेटरला बोलावले. अर्थात याकरिता त्यांनी बहुतांश मराठी लोक गुलाम असलेल्या
हिंदी भाषेचा वापर केला, हे वेगळे सांगायला नको! हॉटेलचे नाव मराठी, मालक
मराठी आणि सर्व कर्मचारी देखील मराठीतच बोलत होते. तरी देखील मराठी लोकांना
मुघली भाषेचा वापर का करावा वाटतो, हा मोठा प्रश्नच आहे.
त्या दोघांनी ऑर्डर दिल्यानंतर लगेचच माझ्या पत्नीने मला एक गोष्ट सांगितली,
“आपल्या
इथल्या मराठी लोकांना सतत हिंदीची गुलामी करायची सवय झालेली आहे. कुठेही
गेलं की, लगेच हिंदीत सुरू होतात. अशा लोकांचा मला भयंकर राग येतो!”
अर्थात
हे सर्व त्यांना ऐकू जाईल अशा भाषेमध्ये ती बोलली. याचा परिणाम सकारात्मक
दिसून आला. पुढच्या वेळेस जेव्हा शेजारच्या टेबलावरील ‘त्या’ने वेटरला हाक
मारली त्यानंतर तो त्याच्याशी मराठीतच संवाद साधत होता. अगदी बिल
देईपर्यंत!
कधी कधी मुघली भाषेची गुलामी करत असणाऱ्या मराठी लोकांना
अशाच पद्धतीने टोमणे मारावेत, असं वाटतं. त्याशिवाय ते सुधारणार नाहीत. आणि
आपली भाषा देखील अभिमानाने वापरणार नाहीत!
- तुषार भ. कुटे
Thursday, October 6, 2022
महाराष्ट्रात या आणि हिंदी शिका
ग्रामीण भागातील एका 'एमआयडीसी'मधील कंपनीत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे माझे दिवसभराचे सत्र होते. संध्याकाळी ते संपले त्यानंतर सहभागी कर्मचाऱ्यांपैकी एक जण मला भेटायला आला. तो केरळमधून अडीच वर्षांपूर्वी कामाच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये आला होता. शिवाय मी त्याच्याशी पूर्णपणे इंग्रजीत बोलत असलो तरी त्याचे माझ्याशी बऱ्यापैकी संभाषण हिंदी भाषेतून चालू होते. याचे मला आश्चर्य वाटले. म्हणून उत्सुकता म्हणून मी त्याला विचारले,
"Generally, Tamil and Malayalam people don't study and understand Hindi language. How can you speak Hindi so well?"
तर तो म्हणाला, "मेरे को केरला मे ढाई साल पहले हिंदी नही आती थी. यहा महाराष्ट्र मे आके हिंदी सीखी है!"
यावर मी त्याला विचारले, "So people around you are North Indians?"
माझा प्रश्न ऐकून तो किंचितसा हसला आणि बोलू लागला, "यहा के सभी लोग मराठी ही है लेकिन वो मुझसे हिंदी मे ही बोलते है. इस वजह से मुझे हिंदी आती है."
त्याचे बोलणे माझ्यासाठी धक्कादायक होते. पुणे जिल्ह्यातल्या एका ग्रामीण भागामध्ये राहणारा दक्षिण भारतीय माणूस अडीच वर्षांमध्ये उत्तम हिंदी बोलू शकतो. परंतु मराठीचा त्याला गंध देखील नव्हता. त्याच्याशी आजूबाजूचे सर्व मराठी लोक हिंदीमध्ये संभाषण साधायचे. ज्या भाषेला मल्याळम लोक काडीचीही किंमत देत नाही, ती भाषा मराठी लोकांनी या व्यक्तीला शिकवली होती.
खरंतर आपल्याच भाषेला तुच्छ समजणाऱ्या मराठी लोकांसाठी हा एक धडा आहे. समोरच्याला मराठी समजत नसेल तर थेट हिंदीत संभाषण करून आपलेच लोक आपल्या भाषेला दुय्यम दर्जा देताना दिसतात. पूर्वी मुंबई शहरामध्ये असणारे मराठीच्या अनासक्तीचे लोन आता हळूहळू महाराष्ट्रात इतरत्र देखील पसरताना दिसत आहे. महाराष्ट्राच्या राजेभाषेच्या भविष्यासाठी ही सर्वात मोठी धोक्याची घंटा आहे.
मराठी लोकांनो वेळीच सावध व्हा आपली भाषा आपल्याच राज्यात मरत आहे. त्याला जबाबदार पण आपणच आहोत.
Thursday, November 7, 2019
बोलतो 'ना' मराठी!
मराठी भाषिक सहजपणे इतर भाषिकांशी मराठीत बोलत नाहीत याची अनेक कारणे आहेत-
पहिले कारण: जाज्वल्य अभिमान
मराठी लोकांना आपल्या भाषेचा प्रचंड अभिमान आहे. त्यामुळे ती भाषा फक्त आपणच बोलावी, असे त्यांना वाटत असते. आपण जर परभाषिकाशी मराठीत बोललो तर त्यालाही आपली भाषा येऊ लागेल व लवकरच तो तिच्यावर प्रभुत्व प्राप्त करेल. असं कोणीही येऊन आपली भाषा बोलावी, हे मराठी भाषिक कसं खपवून घेऊ शकेल? आमच्या भाषेवर फक्त आमचाच अधिकार आहे, यावर मराठ्यांची नितांत श्रद्धा आहे. त्यामुळे ते सहसा मराठी लोकांशी मराठीत बोलण्याचे टाळतात. मुंबईत तर त्याचा कधी कधी कहरच होतो. तिथे मराठी लोकही मराठीत बोलत नाहीत. इतका जाज्वल्य अभिमान फक्त आणि फक्त मराठी लोकच दाखवू शकतात!
दुसरे कारण: भाषाप्रभुत्व
इतिहासावर व वर्तमानावरही नजर टाकली तर देशाला सर्वाधिक बुद्धिमान व तेजस्वी माणसे महाराष्ट्राने दिली आहेत, असे दिसेल. त्याचे कारणही मराठी लोकांना माहित आहे. आम्ही लोक बहुभाषिक आहोत. आमच्या राज्यात कमीत-कमी ऐंशी टक्के लोकांना किमान तीन भाषा तरी सहज देतात ( अर्थात समजतात). भाषा तज्ञांच्या म्हणण्यानुसार ज्याला अधिक भाषा येतात त्याचा मेंदू तितका तल्लख असतो. तीन-तीन भाषांच्या ज्ञानप्राप्तीमुळे मराठी माणसाचा मेंदू तल्लख झालाय. त्यामुळे तो आपली भाषा समोरच्याला शिकू देत नाही. पण, समोरच्याची भाषा बोलून तिच्यावरही प्रभुत्व मिळवण्याचा प्रयत्न करतो. अमराठी लोकांचं बोलणं त्यांच्याच भाषेत ऐकतो व त्याच भाषेत उत्तर देतो. त्यामुळे मराठी लोकांना नव्या भाषेवर प्रभुत्व मिळवणं सोपं जातं. मग समोरच्याला वाटतं, याला तर आपली भाषा येतीये, मग कशाला याच्याशी मराठीत बोला? यामुळे दोन गोष्टी साध्य होतात अमराठी लोकांना आपली भाषा येत नाही व ते वा दोन भाषांतच अडकून पडतात आणि मराठी लोकांची बहुभाषिकत्वामुळे मात्र बौद्धिक पातळी वाढत राहते.
तिसरे कारण: दुसऱ्याच्या भाषेची वाट लावणे
एखादा अमराठी भाषिक तोडकी-मोडकी मराठी बोलत असेल तर मराठ्यांना हा आपल्या भाषेचा हा अपमान वाटतो. म्हणून ते दुसऱ्या भाषेत मुद्दाम चुकीचे शब्द भरवतात. जसे ते हिंदीत बोलताना मुद्दाम तेरेकू, मेरेको, इसकू, उसकू टाइप टपोरी शब्दांचा वापर करतात व त्या भाषेचे सौंदर्य बिघडवतात. यामुळे त्यांना सिद्ध करता येते की, मराठी भाषा ही किती सुंदर व शुद्ध आहे.
चौथे कारण: आपले शब्द घुसडवणे
वरच्याच कारणाला जोडून हेही एक कारण आपण सांगू शकतो. समोरच्याची भाषा अशुद्ध करण्यासाठी मराठी भाषिक आपल्या भाषेतले शब्द त्यात घुसडवतात. उदाहरणार्थ कांदा, बटाटा, नक्की वगैरे शब्द हिंदी नसून मराठी आहेत, हे महाराष्ट्रातल्या अनेक परप्रांतीयांना माहीतच नाहीये! अशाप्रकारे समोरच्याच्या भाषेत भेसळ करून तिचे सौंदर्य बिघडवले जाते व मराठी भाषा कशी श्रेष्ठ आहे, हे मराठी लोक अप्रत्यक्षपणे दाखवून देतात.
अशाप्रकारे मराठी लोकांना माहित आहे की, आम्हाला मराठी येतंय म्हणून आम्हाला मराठी राज्यात किंमत आहे जर कोणीही ऐरागैरा येऊन मराठीत बोलू लागला तर आमची किंमत काय राहणार? या प्रश्नाच्या उत्तरापायी मराठी लोकांची ही सारी खटपट चालू आहे.
बरोबर ना?

