Saturday, July 16, 2011

एकाच संघाला त्रास देणारे खेळाडू


शिवनारायण चंद्रपालमुळे भारताविरूद्धची शेवटची कसोटी वेस्ट इंडिजने अनिर्णित राखली. त्याच्या शानदार नाबाद शतकाने भारताला वेस्ट इंडिजला लवकर गुंडाळता आले नाही. परिणामी विंडिजचा डाव लांबला. चंद्रपालने यापूर्वीही भारताला अनेकदा अशाच प्रकारे त्रास दिला आहे. विशेषत: भारताविरूद्ध त्याची बॅट तळपली नाही तर नवलच. केवळ चंद्रपालच नव्हे तर जगातील अनेक डावखुरे फलंदाज भारतीय गोलंदाजांची भंबेरी उडविताना मागील दोन शतकांत मी पाहिलेले आहेत. त्यात ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यु हेडन, दक्षिण आफ्रिकेचा गॅरी कर्स्टन, श्रीलंकेचा सनथ जयसुर्या, पाकिस्तानचा सईद अन्वर, झिम्बाब्वेचा अण्डी फ्लॉवर यांचा समावेश होतो. ’कठिण समय येता’ या खेळाडूंनी भारताविरूद्ध नेहमीच आपला सर्व खेळ पणाला लावला होता. त्यांचे व भारतीय गोलंदाजांचे जणू अतुट नातेच तयार झाले होते. कधीकधी आपल्या संघाच्या निम्म्या धावा ह्या हेच खेळाडू करुन टाकत असत. अन्वरने चेन्नईतील एकदिवशीय सामन्यात केलेल्या १९४ धावा व जयसुर्याने कोलंबो कसोटीत केलेल्या ३४० धावा कदाचित भारतीय गोलंदाज विसरू शकणार नाहीत. आपल्या गोलंदाजांना जेरीस आणणारे असे हे फलंदाज होते. अशेस मालिकेचा विचार केल्यास इंग्लंडच्या फलंदाजांना नेहमीच त्रास देणारा ऑस्ट्रेलियन गोलंदाज म्हणजे ग्लेन मॅकग्रा होय. या व्यतिरिक्त गोलंदाज कधीही एखाद्या विशिष्ट संघाला त्रास देताना मात्र दिसले नाहीत.
या यादित भारताच्या दोन फलंदाजांचे नाव मी नक्कीच समाविष्ट करीन. व्ही. व्ही. एस. लक्ष्मण व विरेंद्र सेहवाग. लक्ष्मण-ऑस्ट्रेलिया व सेहवाग-पाकिस्तान यांचे असेच ’अतुट’ नाते आहे. लक्ष्मण व ऑस्ट्रेलिया यांच्या नात्याबद्दल विशेष सांगायलाच नको. आजही हा संघ सचिन-द्रविड पेक्षा लक्ष्मणची जास्त धास्ती घेतो. कदाचित त्यामुळेच त्याच्यासमोर कांगारू गोलंदाज नांगी टाकत असावेत. लक्ष्मणने आजवर केलेल्या सोळा कसोटी शतकांपैकी सहा तर सहा एकदिवशीय शतकांपैकी पाच शतके ही ऑस्ट्रेलिया विरूद्ध केलेली आहेत. केवळ शतकेच नाही तर त्याने अनेक सामने जिंकुन दिलेले आहेत व वाचविलेलेही आहेत. अशाच प्रकारे सेहवागची बॅट नेहमी पाकिस्तानविरूद्ध धावांची बरसात करत असते. त्याचे मुलतानी शतक आजही पाकिस्तानी गोलंदाज विसरणार नाहीत. सचिन-द्रविड सारखे फलंदाज मात्र केवळ एकाच संघाविरूद्ध चालत नाहीत. प्रतिस्पर्धी कोणताही असो, त्यांची बॅट ही सारखीच तळपत राहते.

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com