Wednesday, April 3, 2013

आयपीएल आणि पाणी

आयपीएलच्या सामन्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या पाण्यावरून सध्या युद्ध सुरू झाले आहे. महाराष्ट्रात होणाऱ्या सामन्यांसाठी दर सामन्याला आठ लाख लिटर पाणी लागणार आहे. असे १६ सामने महाराष्ट्रात होतील. म्हणजेच वानखेडे स्टेडियम, मुंबई व एमसीए स्टेडियम, गहुंजे (पुणे) येथील सामन्यांत आयपीएलच्या काळात ऐन उन्हाळ्यात सुमारे पन्नास लाख लिटर पाणी लागेल. एका अर्थाने महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना या लाखो लिटर पाण्याची नासाडी होणार आहे. सामन्यांसाठी वापरले जाणारे पाणी हे सार्वजनिक असल्याने हा पाण्याचा अपव्ययच आहे. त्यावर तातडीने उपाय करण्याची गरज आहे. बीसीसीआयचे राजीव शुक्ला हे महाराष्ट्रातून खासदार म्हणून गेल्याने त्यांनीच या बाबीची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. केवळ आयपीएल मधून पैशाचा वर्षाव होतो म्हणून दुष्काळी परिस्थितित पाण्याचा अपव्यय करू नये. भविष्यातही पाण्याच्या बाबतीत मैदानांनी स्वयंपूर्ण होणे, ही काळाची गरज ठरणार आहे. इंग्लंडच्या कौंटी क्लबमधील मैदाने तसेच ऑस्ट्रेलियातील गाबा स्टेडियम व विंडेजचं किंग्ज्टन ओव्हल ही मैदाने रेनवॉटर हार्वेस्टिंगचे प्रकल्प राबवितात. असे प्रकल्प आपल्या राज्यातही राबविता येतील. पावसाळ्यात मैदानातील व मैदानाच्या छतावरील पाणी साठवून त्याचा वापर मैदानासाठी करता येऊ शकतो. बडोद्याच्या मैदानात अशा प्रकारची योजना राबवली जाते. पुढील काळात आपल्यालाही त्याची गरज भासणार, हे निश्चित!

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com