Showing posts with label sports. Show all posts
Showing posts with label sports. Show all posts

Wednesday, May 5, 2021

चित्रपट: साईना

चार वर्षांपूर्वी जेव्हा साईना नेहवालच्या जीवनावर चित्रपट बनण्याची घोषणा झाली होती, तेव्हापासूनच या चित्रपटाबद्दल उत्सुकता तर होतीच. अखेरीस मागील वर्षी प्रदर्शित होणारा हा चित्रपट लॉकडाऊनमुळे अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाला. मागील काही वर्षांमध्ये भारतातल्या मोठ्या क्रीडापटुंवर चित्रपट निघाले आहेत. हाही त्याच शृंखलेतील एक चित्रपट होय. कदाचित बॅडमिंटनवर आधारित असलेला हा पहिलाच चित्रपट असावा. भारतामध्ये बॅडमिंटन या खेळाला फारसे वलय नाहीये. त्यातल्या त्यात महिला बॅडमिंटन क्षेत्रात तर काहीच नव्हतं. परंतु मागच्या काही वर्षांपासून साईना नेहवालने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय बॅडमिंटनला विशेषत: महिला बॅडमिंटनला उच्च स्थानावर नेऊन ठेवलं होतं. तिचीच ही कहाणी होय.
प्रकाश पदुकोण आणि पुलेला गोपीचंद यांच्या व्यतिरिक्त भारतात बॅडमिंटन खेळाडू फारसे नावाजलेले नव्हते. परंतु आज आपण अनेक खेळाडूंची नावे ऐकत असतो. याला काही अर्थाने साईना नेहवाल कारणीभूत होती, असं म्हणावं लागेल. हरियाणाच्या एका निमशहरी भागातून हैदराबादमध्ये आलेली ही मुलगी होय. तिचे आईवडील दोघेही बॅडमिंटन खेळाडू होते. परंतु विशेषतः आईच्या प्रयत्नांनी ती या क्षेत्रात दाखल झाली. हळूहळू घरातला इतरांचीही तिला साथ लाभत गेली. हैदराबाद मधील लाल बहादूर शास्त्री स्टेडियम मधून सुरू झालेला हा प्रवास जगातील नंबर वन बॅडमिंटन खेळाडू होण्यापर्यंत अविरत चालू होता. या प्रवासामध्ये तिला अनेकांची साथ लाभली. अनेकांचे बहुमुल्य मार्गदर्शन मिळाले. बऱ्याचदा तिचा मार्गही चुकला. ती ठेचाळत होती. पण पुन्हा ती ध्येयाच्या दिशेने चालू लागली. अशी साईनाची कहाणी दिग्दर्शक अमोल गुप्ते यांनी या चित्रपटात चितारलेली आहे. अन्य चित्रपटांप्रमाणेच नाटकीयरित्या काही प्रसंग सादर केले गेले आहेतच. त्यामुळे डॉक्युमेंटरी न पाहता चित्रपट पाहण्याचा फील येतो. परंतु, कधीकधी दिग्दर्शकाचे प्रयत्न कमी पडत आहेत, असंही जाणवतं. बऱ्याचदा चित्रपट संथ गतीने चालला आहेत, असेही वाटू लागतं. साईनाची भूमिका केलेल्या परिणीती चोप्रा हिने चांगली मेहनत घेतली असल्याचे दिसतं. कदाचित याहीपेक्षा चांगली भूमिका ती करू शकली असती, असं वाटून जातं. एकंदरीतच महिला क्रीडापटूंना प्रेरणा देणारा हा प्रवास आहे. किमान एकदा तरी बघायलाच हवा.

 


Wednesday, April 3, 2013

आयपीएल आणि पाणी

आयपीएलच्या सामन्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या पाण्यावरून सध्या युद्ध सुरू झाले आहे. महाराष्ट्रात होणाऱ्या सामन्यांसाठी दर सामन्याला आठ लाख लिटर पाणी लागणार आहे. असे १६ सामने महाराष्ट्रात होतील. म्हणजेच वानखेडे स्टेडियम, मुंबई व एमसीए स्टेडियम, गहुंजे (पुणे) येथील सामन्यांत आयपीएलच्या काळात ऐन उन्हाळ्यात सुमारे पन्नास लाख लिटर पाणी लागेल. एका अर्थाने महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना या लाखो लिटर पाण्याची नासाडी होणार आहे. सामन्यांसाठी वापरले जाणारे पाणी हे सार्वजनिक असल्याने हा पाण्याचा अपव्ययच आहे. त्यावर तातडीने उपाय करण्याची गरज आहे. बीसीसीआयचे राजीव शुक्ला हे महाराष्ट्रातून खासदार म्हणून गेल्याने त्यांनीच या बाबीची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. केवळ आयपीएल मधून पैशाचा वर्षाव होतो म्हणून दुष्काळी परिस्थितित पाण्याचा अपव्यय करू नये. भविष्यातही पाण्याच्या बाबतीत मैदानांनी स्वयंपूर्ण होणे, ही काळाची गरज ठरणार आहे. इंग्लंडच्या कौंटी क्लबमधील मैदाने तसेच ऑस्ट्रेलियातील गाबा स्टेडियम व विंडेजचं किंग्ज्टन ओव्हल ही मैदाने रेनवॉटर हार्वेस्टिंगचे प्रकल्प राबवितात. असे प्रकल्प आपल्या राज्यातही राबविता येतील. पावसाळ्यात मैदानातील व मैदानाच्या छतावरील पाणी साठवून त्याचा वापर मैदानासाठी करता येऊ शकतो. बडोद्याच्या मैदानात अशा प्रकारची योजना राबवली जाते. पुढील काळात आपल्यालाही त्याची गरज भासणार, हे निश्चित!

Friday, April 6, 2012

आयपीएल मध्ये खेळणारे महाराष्ट्रीय खेळाडू


एकेकाळी भारतीय क्रिकेटवर महाराष्ट्राचे व विशेषत: मुंबईच्या खेळाडूंचे वर्चस्व होते. परंतु, कालांतराने क्रिकेटज्वर संपूर्ण भारतभर पसरल्यावर पूर्ण देशातून गुणवान खेळाडू तयार होऊ लागले आहेत. सध्या चालू झालेल्या आयपीएल मध्येही अनेक महाराष्ट्रीय खेळाडू आपली गुणवत्ता दाखवण्यासाठी सज्ज झालेले आहेत. आयपीएलच्या नऊ टीम्स मध्ये असणाऱ्या महाराष्ट्रीय खेळाडूंचा घेतलेला हा आढावा. तुमचा संघ कुठलाही असू द्या पण ह्या खेळाडूंना पाठिंबा द्यायला विसरू नका.

१.      मुंबई इंडियन्स (७)
-    सचिन तेंडुलकर
-    रोहित शर्मा
-    धवल कुलकर्णी
-    सुशांत मराठे
-    आदित्य तारे
-    सुजित नायक
-    अपूर्व वानखेडे

२.      पुणे वॉरियर्स इंडिया (फक्त ४)
-    धीरज जाधव
-    हर्षद खडीवाले
-    श्रीकांत वाघ
-    कृष्णकांत उपाध्ये

३.      राजस्थान रॉयल्स (५)
-    अजिंक्य रहाणे
-    अमित पौनीकर
-    अभिषेक राऊत
-    अंकित चव्हाण
-    अदित्य डोळे

 
४.      दिल्ली डॆयर डेव्हिल्स (४)
-    अजित आगरकर
-    उमेश यादव
-    अविष्कार साळवी
-    प्रशांत नाईक



५.      रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोर (२)
-    झहीर खान
-    विजय झोल


६.      कोलकाता नाईट रायडर्स (०)
-    एकही नाही
७.      चेन्नई सुपर किंग्ज (०)
-    एकही नाही
८.      किंग्ज इलेव्हन पंजाब (३)
-    रमेश पोवार
-    अभिषेक नायर
-    सिद्धार्थ चिटणीस

९.      डेक्कन चार्जर्स (०)
-    एकही नाही