Saturday, May 11, 2013

कॉमेडी एक्सप्रेसची लोकप्रिय पात्रे

मराठीमध्ये सध्या सुरू असलेल्या सिरियल्सपैकी ई टीव्ही मराठी वरील ’कॉमेडी एक्सप्रेस’ ही सर्वात विनोदी मालिका होय . तीच्या लोकप्रियतेमुळे ती आज ५०० व्या भागाकडे कूच करित आहे. प्रशांत लोके व आशिष पाथरे या लेखकांच्या लेखनीतून ’कॉमेडी एक्सप्रेस’ मध्ये अनेक पात्रे जन्माला आली. शिवाय ती खूप लोकप्रिय झाली. या मालिकेत दर्जेदार विनोदांचा भरणा असल्याने तीची लोकप्रियता आजही ओसरलेली नाही. याचे श्रेय लेखक व या पात्रांना द्यायला हवे. या पात्रांचा घेतलेला हा छोटासा वेध.

मिस्टर ’ह’
आशिष पवार साकारत असलेले हे पात्र होय. प्रत्येक शब्दाची सुरूवात ’ह’ ने करणारे हे पात्र खूप लोकप्रिय झाले होते. कदाचित, तोच तोच पणा येत असल्याने सध्या त्याचे प्रयोग बंद असावेत.

चमडी बाबा
भूषण कडू साकारत असलेला हा ढोंगी बाबा होय. ’चंद्रकांत महादेव डिकोस्टा’ असे त्याचे पूर्ण नाव! या चमडी बाबाची कृत्ये आजवर अनेकांनी उघडकिस आणली आहेत.

प्रद्युम्न मराठे
मराठी भाषेचा हा प्रकांड पंडित आशिष पवार साकारतो. या पात्रासाठी लिहिलेला ऍक्ट लेखकाची कसोटी घेणारा ठरतो, हे मात्र नक्की.

कॉमन मॅन
अष्टपैलू आशिष पवार साकारत असलेले हे आणखी एक पात्र. सामान्य माणसाच्या नजरेतून विविध घटनांची मीमांसा करणारे हे पात्रही लेखकाची कसोटी घेणारे ठरते!

अमरजित हिरवे
 


वयाच्या ८० च्या वर्षी तरूण मुलींवर लाईन मारणारा हा म्हतारा आशिष पवार साकारतो!

मी-मो
मी-मो अर्थात मीरा मोडक होय. सदान कदा याला त्याला बोअर करणारी मी-मो कॉमेडी एक्सप्रेसमध्ये बरीच कुप्रसिद्ध आहे!

डॉ. भगेंद्र
कॉमेडी एक्सप्रेसमधील सर्वांचे लाडके अरूण कदम हे पात्र साकारतात. भगेंद्र हा एक बोगस डॉक्टर आहे!

डॉ. महिपाल
 
हा ज्युनियर भगेंद्र होय! ही भूमिका समीर चौघुले साकारतात. हाही एक पेशंट न मिळत असलेला बोगस डॉक्टर होय!

मिश्किल बगळे

एका वृत्तवाहिनीवरील पत्रकाराची भूमिका वठविणारे सागर कारंडे अर्थात मिश्किल बगळे होय. वृत्तवाहिनीवर एखाद्याला बोलावून त्याची इज्जत घ्यायची कला यांना चांगलीच अवगत आहे!

इन्स्पेक्टर कवी
 
 

अर्थात कमलाकर सातपुते होय. डिपार्टमेंट मुळे कविता न करता येण्याची खंत हा कवी सतत दाखवित असतो. त्याचा कविता संग्रहही प्रसिद्ध झालाय... एके दिवशी काय जाहले...!!!

महाप्रश्ने
 

किशोर चौघुले साकारत असलेले हे पात्र होय. आपल्या प्रश्नांच्या भडिमाराने समोरच्याला बेजार करून टाकणारा हा असा महाप्रश्ने आहे!

का. न. केसे
 

विकास समुद्रेच्या लेखणीतून अवतरलेला व तो स्वत: साकारत असलेली ही भुमिका होय. पूर्ण कानांवर केस असलेला हा म्हतारा त्याच्या बोलण्याच्या वेगळ्या शैलीने परिचित आहे.

बंडू आणि मास्तर


कॉमेडी एक्सप्रेसमधील सर्वात लोकप्रिय जोडी. मास्तरांशी वाद घालणारा व त्रास देणारा बंडू या ऍक्टमध्ये दिसतो. सर्वाधिक प्रयोग यांचे झाले असावेत. बंडू आशिष पवार तर मास्तर अभिजित चव्हाण साकारतात.

मोरू आणि मास्तर
 
 


शास्त्रज्ञ मोरू अर्थात भूषण कडू व मास्तर अर्थात अभिजित चव्हाण यांचा हा ऍक्ट आहे. दरवेळी नवा शोध लावण्याचा दावा करणारा मोरू मास्तरांकडून पकडला जातो.

पार्थ आणि त्याचे बाबा
 

विचित्र कल्पक विचारांचा पार्थ अभिजित चव्हाण तर त्याचे बाबा भूषण कडू साकारतो.

ऍडव्होकेट चढ्ढा आणि मनोज
 

अभिजित चव्हाण व भूषण कडू यांचा हा तिसरा सुप्रसिद्ध ऍक्ट होय. निरनिराळ्या खटल्यांत साक्षीदार म्हणून बोलाविलेल्या मनोजला दरवेळेस चढ्ढा हाकलून लावतात!

चिमण आणि चतुर
 

कमलाकर सातपुते व समीर चौघुले यांचा पुणेरी मित्रांची ही पात्रे होय. जुन्या मराठी सिनेमातील पात्रांप्रमाणे चोपुन-चापून मराठी बोलतात!

चिमण आणि चंद्रिका


कमलाकर सातपुते व शैला काणेकर यांचा हा ऍक्ट. दोघेही जुन्या मराठी चित्रपटांतील नवरा-बायको दाखविले जातात.

याशिवाय अनेक नवनवे प्रयोग कॉमेडी एक्सप्रेसमध्ये केले जातात. एक वेळ नक्की पाहा. त्यांचे सर्व व्हिडिओ युट्युबवर उपलब्ध आहेत.

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com