Showing posts with label matkari. Show all posts
Showing posts with label matkari. Show all posts

Tuesday, January 9, 2024

गहिरे पाणी

आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अनेक घटनांचा गूढतेच्या दृष्टिकोनातून विचार केला की गुढकथा तयार होते. रत्नाकर मतकरी यांच्या कथेमध्ये गुढकथेचा हा सारासार विचार अतिशय प्रकर्षाने समोर येतो. निरनिराळे विषय घेऊन त्यातील घटनांमध्ये रहस्यमयता तयार करण्याची शैली केवळ मतकरींच्या लेखनामध्ये आहे, असे दिसते. “गहिरे पाणी” हा कथासंग्रह देखील रत्नाकर मतकरींच्या या शैलीची वाट जोपासणारा दिसतो. सुमारे वीस-बावीस वर्षांपूर्वी अल्फा मराठी या पहिल्या खाजगी मराठी वाहिनीवर प्रदर्शित झालेल्या “गहिरे पाणी” या चित्रमालिकेच्या कथांचा हा संग्रह होय. यातून लेखकाच्या कल्पनाशक्तीचा अद्वितीय अविष्कार आपल्याला पाहायला मिळतो. प्रत्येक कथा एका वेगळ्या विषयाशी जोडलेली आहे. ती वाचायला सुरुवात केल्यानंतर शेवट केल्याशिवाय थांबवत नाही. मतकरींच्या कथांचे हे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणता येईल. जवळपास प्रत्येक कथा ‘वाचनीय’ या प्रकारामध्ये मोडते. विशेष म्हणजे या कथांची चित्रमालिका देखील युट्युबवर उपलब्ध आहे. अशा सर्व कथांचा या संग्रहामध्ये समावेश नाही. परंतु या कथा वाचताना त्यातील चित्र हुबेहूब डोळ्यासमोर उभे राहते. काही कथा मतकरींच्या अन्य कथासंग्रहामध्ये देखील आहेत. तरीदेखील त्या वाचताना पुन्हा नव्याने काहीतरी वाचण्याचा आनंद देऊन जातात.

#BookReview #Book2024 #RatnakarMatkari 

Tuesday, November 14, 2023

निर्मनुष्य - रत्नाकर मतकरी

गूढकथा वाचकांसाठी वेगवेगळ्या विषयांची मेजवानी नेहमीच रत्नाकर मतकरींच्या कथासंग्रहातून मिळत असते. 'निर्मनुष्य'या कथासंग्रहामध्ये देखील वेगवेगळ्या धाटणीच्या आणि निरनिराळ्या विषयांवर भाष्य केलेल्या विविध गूढकथा वाचायला मिळतात. यातूनच मतकरी यांची कल्पनाशक्ती किती विलक्षण आहे, याचा देखील अंदाज येतो. दैनंदिन जीवनातील घटनांमध्ये तयार होणारे गूढ आणि त्यातून उलगडत जाणारी रहस्ये ही मतकरींच्या या कथासंग्रहातील कथांची वैशिष्ट्ये आहेत. मनोविज्ञान हे अनेकदा गूढकथांचे उगमस्थान असते. या मानसशास्त्राचा उपयोग मतकरी आपल्या कथांमध्ये अतिशय उत्तमपणे करताना दिसतात.
'निर्मनुष्य' या कथेमध्ये पत्रकाराचं दिवंगत जीवन आपल्या कल्पनाविष्काराने त्यांनी उत्कृष्टरित्या फुलवलेलं आहे. 'व्हायरस' या कथेमध्ये राजकारण्यांना खरं बोलायला लावणारा व्हायरस किती भयंकर असू शकतो, याची आपण निव्वळ कल्पनाच करू शकतो असं दिसतं! 'भूमिका' ही कथा एका चतुरस्त्र नाटकाच्या नायकाची आहे, जो वर्षानुवर्षे त्याच्या भूमिकेशी समरस झालेला दिसतो. 'गर्भ' या कथेद्वारे पृथ्वीवर कधीही जन्म न झालेल्या गर्भाचा मृत्यू कशा पद्धतीने होतो, याचे वर्णन मतकरी करतात. प्रार्थनेने एखाद्याला मारता येते का? या विलक्षण विषयावर 'प्रार्थना' ही कथा आधारलेली आहे! 'पर्यायी' या कथेद्वारे एखादी घटना घडली नसती तर पर्यायाने काय झाले असते? असा सखोल विचार समोर येतो. मतकरींची विचारशक्ती वाचकाला या सर्व कथांद्वारे निश्चित खिळवून ठेवणारी आहे.


 

Tuesday, January 31, 2023

एक दिवा विझताना: रत्नाकर मतकरी

मतकरींची गूढ कथा ही अतिशय वेगळी आहे. त्यांचे वाचलेले मी हे चौथे-पाचवे पुस्तक असावे. कधी कधी असं वाटतं की, त्यांच्या एका कथेची संपूर्ण कादंबरी होऊ शकेल. परंतु मतकरींनी सदर कथा वेगाने संपवत त्यामध्ये थरार तसेच गूढ शेवटपर्यंत कायम ठेवल्याचे दिसते. त्यांच्या संकल्पना या इतर गूढकथा लेखकांपेक्षा अतिशय वेगळ्या आहेत. त्यातील गूढ मनाला स्पर्शून जाते आणि कथा संपली तरी तिचे वलय आपल्या भोवती सातत्याने फिरत राहते. याच पठडीतील कथा या छोटेखानी कथासंग्रहामध्ये आपल्याला वाचायला मिळतात. काही संकल्पना कल्पनातीत आहेत. म्हणूनच कोणीही सामान्य वाचकाने प्रशंसा कराव्या अशाच भासतात.


 

Sunday, January 1, 2023

"मृत्युंजयी" - रत्नाकर मतकरी

"मृत्युंजयी" हा रत्नाकर मतकरी यांचा गूढ-कथासंग्रह आहे. खरंतर मतकरींच्या गूढकथा म्हणजे वाचकांसाठी मेजवानीच असते. प्रत्येक कथा वेगवेगळ्या प्रकारचं गूढ उलगडून दाखवत असते. हे पुस्तक देखील याच प्रकारातील आहे. कथांमधील संकल्पना साध्या असल्या तरी अतिशय मनोवेधक व रंजक अशाच आहेत. एखादी कथा खूप चांगली किंवा एखादी फारशी नाही, असं आपण या बाबतीत तुलना करू शकत नाहीत. आपल्या साध्या आणि सरळ भाषेमध्ये मतकरी मराठी वाचकांना विविध कथांद्वारे खिळवून ठेवतात. त्यामुळे त्यांच्या कथा संपूच नये, असं वाटत राहतं. या पुस्तकाची शीर्षक कथा अर्थात 'मृत्युंजयी' ही कादंबरी देखील होऊ शकली असती. परंतु मतकरींनी सुलभपणे व सोप्या अन मोजक्या शब्दात ही कथा लिहिल्याचे दिसते रहस्य.
गूढकथा वाचकांसाठी मनाचे कंगोरे उलगडणार्‍या कथा म्हणून या पुस्तकाचे वर्णन करता येईल! 



Thursday, June 2, 2022

मध्यरात्रीचे पडघम

रत्नाकर मतकरी यांच्या अकरा गूढकथांचा हा संग्रह आहे. या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्येच मतकरी यांनी गूढकथा या साहित्य प्रकाराचे अतिशय सुंदर विवेचन केलेले आहे. ही कथा म्हणजे केवळ रहस्य कथा व भूत कथा नसते. तिची स्वतःची वैशिष्ट्ये काय आहेत, हे देखील मतकरी यांनी स्पष्ट केलेले आहे. त्यांच्या प्रत्येक कथेमध्ये अपेक्षित गूढपणा जाणवत राहतो. 'मध्यरात्रीचे पडघम' शीर्षककथा ही या कथासंग्रहातील सर्वात शेवटची कथा आहे. 'काळ्या मांजराचं स्वप्न' या कथेतून त्यांनी मांजराच्या भावविश्वाचे चित्रण केले आहे. यातून लेखकाच्या कल्पनासृष्टीची व्याप्ती दिसून येते. अशी वेगळ्या धाटणीतली कथा सर्वात विशेष वाटते. शिवाय 'बाळ अंधार पडला' ही या कथासंग्रहातील सर्वात वेगळी कथा म्हणता येईल. अंतिम परिच्छेदामध्ये रहस्यभेद केल्यानंतर तो अनपेक्षित असतो. पुस्तकातील जवळपास सर्वच कथा या प्रकारामध्ये मोडतात. गुढकथांवर प्रेम करणाऱ्यांनी हा कथासंग्रह वाचलाच पाहिजे असा आहे.

Ⓒ Ⓐ  तुषार भ. कुटे 




Tuesday, June 16, 2020

निवडक र. अ. नेलेकर

धारक व मतकरी यांच्यानंतर वाचलेले र. अ. नेलेकर हे तिसरे भयकथा लेखक! त्यांच्या भयकथांचे केवळ तीन संग्रह प्रसिद्ध आहेत. त्यामुळे मराठी वाचकांना ते फारसे परिचित नसावेत. शिवाय त्यांच्या नावे तीन विनोदी कथासंग्रह देखील आहेत! भय आणि विनोद असे परस्परविरोधी प्रकार हाताळलेले नेलेकर कदाचित एकमेव मराठी लेखक असावेत. त्यांच्याच भयकथांचा हा कथासंग्रह होय- निवडक र. अ. नेलेकर (राजेंद्र प्रकाशन)
प्रत्येक लेखकाची एक वेगळी शैली असते. तशीच नेलेकरांची स्वतःची शैली आहे. फारसं वर्णनात्मक चित्रन न करता साध्या सरळ पद्धतीने परंतु वाचकांना खिळवून ठेवणाऱ्या कथा, हे त्यांचे वैशिष्ट्य मानावे लागेल. धारप व मतकरी वाचल्यानंतर नेलेकरांच्या शैलीत रुळायला थोडा वेळ लागतो. पण नंतर ती आपल्या मनाची पकड घ्यायला सुरवात करते व एक अद्भुत विश्वाची सफर घडवून आणते. त्यांच्या या पुस्तकात एकूण सोळा कथा आहेत. त्यातील अखेरची 'कणक राऊळ' ही केवळ साहस कथा आहे. बाकीच्या भयकथांमध्ये कुठली सर्वात चांगली? असे निश्चित सांगता येणार नाही. कारण प्रत्येक कथा ही पूर्णतः वेगळ्या धाटणीची आहे. त्यांच्यात तोचतोचपणा जाणवत नाही. त्यामुळे कुठलीही कथा वाचली तरी आपल्याला निराळ्याच विश्वात घेऊन जाते, हे विशेष.
संग्रहातील काही कथांना विविध स्पर्धांमध्ये पारितोषिके मिळाली आहेत. त्यामुळे अशा दर्जेदार कथांचा संग्रह निश्चितच वाचनीय असाच आहे.