Showing posts with label dandekar. Show all posts
Showing posts with label dandekar. Show all posts

Monday, March 7, 2022

पवनाकाठचा धोंडी

गो. नी. दांडेकर म्हटलं की, साहित्यात सह्याद्रीच्या डोंगररांगांत वसलेल्या दुर्गांचे दर्शन होतं. गोनीदांचे साहित्य म्हणजे याच सह्याद्रीच्या रांगड्या परिसरात रमलेलं मराठी ग्रामीण साहित्य आहे. 'माचीवरला बुधा' या कादंबरीमध्ये पहिल्यांदा ते अनुभवायला मिळालं. त्यांचीच 'पवनाकाठचा धोंडी' ही अशाच बाजाची कादंबरी आहे. पवन मावळामधील पवना नदीच्या काठावर वसलेला 'तुंग' दुर्ग आहे. याच दुर्गाचा हवालदार धोंडी याची ही गोष्ट.
शिवाजी महाराजांच्या काळापासून तुंगीच्या देखरेखीची जबाबदारी धोंडीच्या घराण्याने पार पाडलेली आहे. आज तो या घराण्याची परंपरा पुढे नेतो आहे. त्याचा त्याला सार्थ अभिमान आहे. शिवाय याच कारणामुळे पंचक्रोशीमध्ये त्याला मान मिळतो आहे. त्याने हवालदार म्हणून आपली कामगिरी चोख बजावलेली आहे. कधीही कोणाशी दुजाभाव केलेला नाही. तो इमानी आहे आणि आपल्या तत्त्वांशी बांधील आहे. परंतु त्याचा भाऊ कोंडी मात्र त्याच्यापेक्षा वेगळ्या विचारांचा आहे. तो काहीसा बंडखोर जाणवतो. याच कारणामुळे पवनाकाठी राहणाऱ्या या धोंडीच्या आयुष्यात निरनिराळ्या घटना घडतात. मात्र तो आपली तत्वे सोडत नाही.
अशी पार्श्वभूमी असणारी ही कादंबरी म्हणजे 'पवनाकाठचा धोंडी'. सुरुवातीला कथेला रंग चढायला थोडासा वेळ लागतो. नंतर ती हळूहळू वाचकाच्या मनाचा पकड घ्यायला लागते व आपण त्याच्यामध्ये गुंतत जातो. पवनाकाठच्या धोंडीचे व्यक्तिमत्व गोनीदांनी अतिशय उत्तमरीत्या रेखाटलेले आहे. विशेष म्हणजे कोंडी आणि सारजा तसेच सरू आणि धोंडी या दीर-भावजयाचं नातं अतिशय उत्तमरित्या या पुस्तकांमधून रंगवलेले आहे. शेवटी शेवटी कादंबरी भावनात्मक करून सोडते. म्हणजेच तोवर आपण कादंबरीमध्ये पूर्णपणे गुंतत गेलो असतो. हीच तर गोनीदांच्या लेखणीची जादू आहे. या कादंबरीवर आधारित चित्रपटाची निर्मिती देखील झालेली आहे. परंतु सध्या हा चित्रपट इंटरनेटवर कुठेही उपलब्ध नाही.



Monday, May 24, 2021

रुमाली रहस्य: गो. नी. दांडेकर

गोपाळ नीलकंठ दांडेकर यांच्या लेखणीतून उतरलेली ही ऐतिहासिक रहस्यकथा होय. या कादंबरीला पेशवेकालीन पार्श्वभूमी आहे. घाशीराम कोतवाल यातून एका वेगळ्या रूपामध्ये आपल्याला अनुभवायला मिळतात. याशिवाय नाना फडणवीस व रामशास्त्री प्रभुणे देखील या कथेतून आपल्याला भेटतात. कादंबरीची सुरुवात होते सर्जेराव घारे नावाच्या मराठा सरदाराच्या खुनापासून आणि थोड्याच वेळामध्ये आणखी एका खुनाची वार्ता घाशीराम कोतवाल यांच्या कानावर येते. लगेचच शोध पथके आपल्या कामाला लागतात. अंदाज बांधले जातात, तर्कवितर्क करून खुन्याच्या मार्गावर मराठी सरदार पाठवले जातात. उत्तरेकडून आलेले व बैराग्याचा वेश घेतलेले दोन जण वेगाने दक्षिणेकडे कूच करत असतात. मराठी सरदार त्यांचा निजामाच्या सीमेपर्यंत पाठलाग करतात. परंतु त्यांना यश येत नाही. तरीही प्रयत्नांची पराकाष्ठा करत वेगळ्या मार्गाने खुन्यापर्यंत पोहोचण्याचा विचार केला जातो. घाशीराम कोतवाल यांची दृष्टी व मराठा सरदारांचे साहस यातून या खुनाची उकल होते. परंतु ज्या गोष्टीसाठी हा खून झालेला असतो ती मात्र खोटी असते. मग खरी गोष्ट नक्की कुठे आहे? त्याची उकल शेवटच्या प्रकरणामध्ये करण्यात आलेली आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली ही कादंबरी अनेक रेखाचित्रांनी सजलेली आहे. त्यामुळे आपल्या डोळ्यासमोर प्रसंग उभे करण्यात ती निश्चितच यशस्वी होते. शिवाय गो. नी. दांडेकर यांचा रहस्यमय साहित्याचा हा प्रयोगही उत्कंठावर्धक शेवटाने संपतो. 



Thursday, February 4, 2021

माचीवरला बुधा - गो. नी. दांडेकर

शहरीकरणाचा वेग वाढला. प्रत्येकालाच शहराची ओढ वाटते. त्यामुळे जीवन धकाधकीचं होत चालले आहे. अशातच आपण गावाकडचं जीवन विसरत चाललोय. पण या धावपळीच्या जगामध्ये प्रत्येकाला कधीतरी विश्रांती हवी असतेच. शहरातलं सातत्याने धावत जाणारे जीवन अनेकदा नकोसं वाटतं. अशावेळी आपण गावाकडे रमून जातो. मनाला शांतता हवी असते. सुख, समाधान आणि शांती यांचा संगम ग्रामीण जीवनामध्ये अनुभवता येतो. या सर्वांची अनुभूती देणारा प्रतिनिधी म्हणजे बुधा होय. याचीच गोष्ट गो. नी. दांडेकरांनी "माचीवरला बुधा" या कादंबरीमध्ये रेखाटली आहे. बुधाचे जीवन अनेक वर्षे मुंबईमध्ये गेले. मजुरीची कामे करून मुंबईच्या वेगवान जीवनामध्ये त्याने अनेक वर्षे काढली आहेत. एक दिवस तो आपल्या मूळ गावी अर्थात राजमाचीला परत येतो. त्याच्या जुन्या आठवणी ताज्या होतात. इथला परिसर त्याला मन:शांती मिळवून देतो. माणसांपासून दूर राहावं, असं त्याला वाटत राहतं. मग तो निसर्गाला तसेच इथल्या प्राणी आणि पक्षांना आपले मित्र बनवतो. त्यांच्याशी संवाद साधत राहतो. अनेकदा हा संवाद दुतर्फा तर कधीतरी तो एकतर्फी असतो. पृथ्वीवरचा प्रत्येक सजीव आपला मित्र आहे, असं त्याला वाटत राहतं. घरातल्या कुत्र्याला जितका जीव लावतो तितकाच जीव तो झाडावरच्या खारिला देखील लावतो. मनोभावे शेती करत असतो. त्यात रममाण झालेला असतो. जीवन त्याला सुखाने जगायचं असतं. त्यातही पुन्हा तोचतोचपणा येतो. अशा सर्वार्थाने "माचीवरला बुधा" या कादंबरीमध्ये आपल्याला भेटतो. त्याचं जीवन जवळून अनुभवता येतं. त्याच्या मनातली घालमेल समजते. मुंबईतलं दैनंदिन जीवन संपून तो नव्याने ग्रामीण जीवन अनुभवत असतो. तो एकटाच असतो. पण आजूबाजूचे प्राणी पक्षी आणि झाडेही त्याला आपलंसं करतात. तो त्यांनाच मित्र बनवतो. कित्येक दिवस त्याचा माणसांशी संवाद होत नाही. कधीतरी गावाजवळच्या दरीत सैनिकांचा तळ पडलेला असतो. त्यांच्याशी तो अतिशय दुरून एकाकी संवाद साधत राहतो. मुंबईहून त्याचा मुलगा त्याला न्यायला येतो. पण बुधाची पावले मुंबईच्या दिशेने पडता-पडता परत मागे फिरतात. त्याने पाळलेला कुत्रा त्याला शेवटपर्यंत साथ देतो. बकऱ्यांना ही तो जीव लावतो. परंतु अखेरीस आयुष्याशी छोटीसी झुंज देऊन तो जगाचा निरोप घेतो. अशी साधी आणि सरळ कथा गोनीदांनी या कादंबरीमध्ये मांडलेली आहे. शहरात जीवन व्यतीत करणाऱ्यांना ती निश्चितच पुढे प्रेरणा देणारी ठरेल, अशी दिसते. जीवनात सतत काबाडकष्ट करायचे का की त्याचा पुरेपूर आनंद घ्यायचा? या प्रश्नाचे उत्तर थोड्या प्रमाणात का होईना ही कादंबरी आपल्याला देते.



Wednesday, October 21, 2020

दांडेकरांची हरिश्चन्द्रवारी

तीन जिल्ह्यांच्या सीमेवरील घनदाट अरण्यात सर्वोच्च कोकणकड्यासह विराजमान असलेला दुर्गम दुर्ग म्हणजे हरिश्चन्द्रगड होय. ज्येष्ठ लेखक व दुर्गअभ्यासक गो. नि. दांडेकर जेव्हा या दुर्गावर पहिल्यांदा गेले होते तेव्हा तेही वाट चुकले होते. नगर जिल्ह्यातून ते थेट पुणे जिल्ह्यात पोहोचले होते! त्यांची ती अद्भुत सफर त्यांची 'दुर्गदर्शन' या पुस्तकात वर्णन केली आहे. त्यातलाच हा एक उतारा.