Showing posts with label iot. Show all posts
Showing posts with label iot. Show all posts

Thursday, June 24, 2021

तंत्रज्ञानाच्या दारातील युरोप

संगणक तंत्रज्ञान म्हणजे अमेरिका, असा सर्वसाधारण आपला समज असतो. परंतु, युरोपातील अनेक देशांमध्ये विविध प्रकारचे अत्याधुनिक तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात विकसित केले जाते. शिवाय या तंत्रज्ञानाधारित वस्तूंचा उपयोग जगभरातील अनेक देश करत आहेत. अशाच काही देशातील महत्त्वाच्या उत्पादनांचा घेतलेला हा आढावा.

झेक रिपब्लिक: थ्रीडी प्रिंटिंग

२०२० पर्यंत थ्रीडी प्रिंटिंग तंत्रज्ञानामध्ये झेक प्रजासत्ताक या देशाने मोठी आघाडी घेतलेली आहे. विविध प्रकारच्या उत्पादनांचा मार्ग या तंत्रज्ञानामुळे सुकर झाल्याचे दिसते. जगातील थ्रीडी प्रिंटिंगचे तंत्रज्ञान व त्यातील नवनव्या सुविधा या झेकच्या प्राग या राजधानीमध्ये तयार झालेल्या आहेत. प्राग शहरातील प्रुसा रीसर्च ही कंपनी आधुनिक काळातील वेगाने विकसित होणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. दर महिन्याला हजारो थ्रीडी प्रिंटिंग मशीन बनविण्याचे उद्योग या कंपनीद्वारे केले जातात. विशेष म्हणजे थ्रीडी प्रिंटिंग मशीन स्वतः दुसऱ्या थ्रीडी प्रिंटिंग मशीनची निर्मिती करते. विशेष म्हणजे हे तंत्रज्ञान ओपन सोर्स आहे. अर्थात तुम्हाला जरी स्वतःचे थ्रीडी प्रिंटींग हार्डवेअर व सॉफ्टवेअर बनवायचे असल्यास, त्याचा स्त्रोत इंटरनेटवर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. आगामी काळात अशा प्रकारच्या थ्रीडी प्रिंटिंग मशीनचा वापर वेगाने होणार आहे.


इस्टोनिया: डिजिटल प्रशासन

डिजिटल प्रशासन कशा पद्धतीचे असावे, याचा आदर्श वस्तूपाठ युरोपातील इस्टोनिया या देशाने घालवून दिलेला आहे. अनेक देशांमध्ये जी कामे करण्यासाठी शासकीय कार्यालयांमध्ये तासन् तास रांगा लावाव्या लागतात, ती कामे अगदी काही क्लीकवर इस्टोनिया देशामध्ये आपल्या नागरिकांसाठी केली जातात. एकंदरीतच या देशातील ९९ टक्के प्रशासकीय कामे ही ऑनलाईन पद्धतीनेच होतात. मुलाचा जन्म झाल्यापासूनच त्याच्या सर्व नोंदी ऑनलाइन पद्धतीने करण्यात आलेल्या आहेत. बाळाच्या जन्मानंतर हॉस्पिटलद्वारेच त्याच्या जन्माचे प्रमाणपत्र इ-पद्धतीने तयार केले जाते. त्याबरोबरच आरोग्य विमा आणि बाळासाठी असणारे अन्य शासकीय फायदे लगेचच त्याला मिळायला सुरुवात होते. यात पालकांचा कोणताही थेट सहभाग राहत नाही. म्हणूनच बाल्टिक प्रदेशात येणाऱ्या या देशाला ई-इस्टोनिया असेही म्हटले जाते. मागील अनेक वर्षांपासून ई-प्रशासन करण्याचे कार्य इस्टोनिया मध्ये वेगाने सुरू होते. शिवाय त्यांची लोकसंख्येची घनता देखील कमी असल्यामुळे डिजिटल प्रशासन करण्यामध्ये फारशा अडचणी आल्या नाहीत. आज सुमारे तीन हजारपेक्षा अधिक सेवा या ऑनलाईन पद्धतीने नागरिकांना दिल्या जातात. त्यांचा फायदा घेण्यासाठी त्यांना केवळ स्वतःचे राष्ट्रीय ओळखपत्र वापरावे लागते. विशेष म्हणजे हेच ओळखपत्र ते ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरोग्य विम्यासाठी वापरू शकतात. त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ओळखपत्राचा वापर करून ऑनलाइन मतदान देखील करता येते. इस्टोनियन नागरिकांना केवळ तीन गोष्टींसाठी प्रत्यक्ष शासकीय कार्यालयात जावे लागते. पहिले लग्नाची नोंदणी करण्यासाठी, दुसरे घटस्फोट घेण्यासाठी आणि तिसरे कोणती मालमत्ता विकत घ्यायची असल्यास.

जर्मनी: स्मार्ट फॅक्टरी

या शतकाच्या सुरुवातीलाच आपण औद्योगीकरणाच्या चौथ्या पिढीमध्ये प्रवेश केला. यास तंत्रज्ञानातील भाषेत इंडस्ट्री फोर पॉईंट झिरो (Industry 4.0) असे म्हटले जाते. या पिढीमध्ये औद्योगिक क्षेत्राचे स्वयंचलन करण्यावर भर देण्यात आलेला आहे. ज्याद्वारे कमीत कमी मनुष्यबळ वापरून अधिकाधिक उत्पादन केले जाते. कारखान्यांमधील जवळपास सर्वच यंत्रसामग्री ही स्वयंचलित आहे. त्यावर लक्ष ठेवण्यासाठी अतिशय कमी मनुष्यबळाचा वापर केला जातो. याशिवाय कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून देखील अनेक निर्णय घेतले जातात. यास "स्मार्ट फॅक्टरी" असे म्हटले जाते. मागील दशकांमध्ये औद्योगिक प्रगतीत जर्मनीचा खूप मोठा वाटा होता. ऑटोमोबाईल क्षेत्रांमध्ये केलेली जर्मनीची प्रगती वाखाणण्याजोगी होती. परंतु दुसऱ्या महायुद्धानंतर हा वेग काहीसा मंदावला. परंतु, हळूहळू त्याने पूर्ण वेग घेतला. आज जर्मनीत कारखान्यामध्ये वापरले जाणारे तंत्रज्ञान अतिशय अद्ययावत प्रकारचे आहे. कॅमेरा तसेच सेन्सर्सचा वापर करून उत्पादन तंत्रज्ञानावर लक्ष ठेवले जाते. शिवाय रोबोटिक तंत्रज्ञानाद्वारे अनेक कार्ये सहज व सुलभ पार केली जातात. याशिवाय ड्रोनद्वारे संपूर्ण कारखान्यावर व कच्च्या मालाच्या वितरणावर लक्ष ठेवण्यात येते. एखाद्या ठिकाणी कच्चा माल संपला असेल किंवा संपत आला असेल तर सॉफ्टवेअरद्वारे आपोआप ऑर्डर दिल्या जातात. कंपनीतील सर्व कामगारांवर लक्षही ठेवले जाते. जर्मनीतील अनेक कंपन्यांमध्ये अशा प्रकारची यंत्रणा कार्यरत आहे. उच्च वेगाच्या इंटरनेटद्वारे मशीन, सॉफ्टवेअर आणि रोबोट एकमेकांना जोडलेले आहेत. अनेक ठिकाणी आरएफआयडी चिप बसवून माहितीची देवाण-घेवाण, नियंत्रण व विश्लेषण केले जाते. इंडस्ट्री ४.० मध्ये स्वयंचलन व स्वायत्तता या दोन गोष्टींना विशेष महत्त्व आहे. त्यादृष्टीनेच ग्राहकांची गरज भागवण्यासाठी स्मार्ट फॅक्टरीची रचना करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी ग्राहकांचा थेट कंपनीशी संवाद होत असतो. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स व चॅटबोट सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून कंपन्या ग्राहकांची मते व माहिती जाणून घेतात. त्यानुसारच उत्पादन प्रक्रिया राबवली जाते. या कारणास्तव अनेक कंपन्यांकडे ग्राहक आकर्षित झाले आहेत. अतिशय वेगाने होणारी कंपन्यांची प्रगती संगणक तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यामुळेच होत असताना दिसते. "इंटरनेट ऑफ थिंग्स" या तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे कंपनीच्या मालकांना कंपनीशी संबंधित प्रत्येकाशी थेट संवाद व नियंत्रण साधने सहज शक्य झाले आहे. त्यामुळे वेळेची, ऊर्जेची व मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणात बचत होताना दिसत आहे. भविष्यकाळाचा विचार केल्यास लवकरच संपूर्ण स्वयंचलित स्मार्ट फॅक्टरी तयार झाल्यास आश्चर्य वाटायला नको!

लक्झेंबर्ग: वेगवान इंटरनेट

युरोपातील सर्वात वेगवान इंटरनेट लक्झेंबर्ग या देशामध्ये उपलब्ध आहे. जागतिक आकडेवारीचा विचार केल्यास सिंगापूरनंतर इंटरनेटच्या वेगामध्ये लक्झेंबर्गचा दुसरा क्रमांक लागतो. शिवाय याच कारणामुळे स्टार्ट-अप कंपन्यांसाठी सर्वोत्तम जागा म्हणून या देशाचे नाव युरोप मध्ये अग्रणी आहे. लक्झेंबर्गने डिजिटल प्रणाली विकसित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा गुंतविला आहे. त्यातच वेगवान इंटरनेट या देशात उपलब्ध झालेले आहे. इंटरनेटच्या एकूण व्याप्तीचा विचार केल्यास या देशामध्ये ९६ टक्के जागेवर इंटरनेट उपलब्ध आहे. एकूण युरोपमध्ये हाच आकडा ७४ टक्के इतका येतो. लक्झेंबर्गमध्ये सर्व प्रमुख ठिकाणी शासनाद्वारे वायफाय इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ज्याद्वारे नागरिकांना आपल्या मोबाईलवर थेट इंटरनेट वापरता येते. याच कारणास्तव खाजगी इंटरनेट सुविधा देणाऱ्या कंपन्या या देशामध्ये अतिशय अल्प प्रमाणात आहेत.

फिनलँड: ई-हेल्थ

कोणत्याही देशाच्या दृष्टीने आपल्या नागरिकांचे आरोग्य हे सर्वोच्च स्थानी असते. याचा प्रत्यय आपण गेल्या एक वर्षापासून येतच आहे. देशाची आरोग्य यंत्रणा पूर्णपणे डिजिटाइज्ड करण्याचे काम फिनलँड या देशाने केलेले आहे. जगातील सर्वात अत्याधुनिक आरोग्य सुविधा या देशामध्ये उपलब्ध आहेत. याशिवाय या प्रकारची यंत्रणा व सॉफ्टवेअर निर्यात करणाऱ्या अनेक कंपन्या फिनलंड देशांमध्ये स्थित आहेत. मागील काही वर्षांपासून मोबाईलचा, ऑनलाईन बँकिंगचा व गव्हर्नन्सचा वाढता वापर पाहता फिनलँडने या तंत्रज्ञानाचा व सुविधांचा वापर आरोग्याच्या दृष्टीने करण्यासाठी यंत्रणा विकसित केली. डॉक्टरद्वारे दिले जाणारे प्रिस्क्रिप्शन देखील डिजिटली दिले जाते. २०१० पासून नागरिकांचा सर्व आरोग्यविषयक डेटा आज त्यांच्या आरोग्य यंत्रणेकडे उपलब्ध आहे. या माहितीचा उपयोग देशातील कोणताही डॉक्टर सदर रुग्णाची व शासनाची अनुमती घेऊन वापरू शकतो. त्याद्वारे नागरिकांच्या आरोग्याचा पूर्ण इतिहास डॉक्टरांना पाहता येतो. याशिवाय मागील वीस वर्षांची माहिती साठवण्याची सुविधा देखील या यंत्रणेमध्ये आहे. यामुळे देशात कुठेही नागरिक आरोग्य सुविधेचा वापर करून घेऊ शकतात. तसेच अन्य शहरात असलेल्या डॉक्टरांशी संवाद करण्याची प्रणाली देखील फिनलँडमध्ये तयार करण्यात आलेली आहे. ऑनलाइन अपॉइंटमेंट व मार्गदर्शन करण्याची सुविधा या यंत्रणेत उपलब्ध आहे. फिन-जेन नावाच्या प्रकल्पाअंतर्गत नागरिकांच्या आरोग्याविषयीचे अनेक प्रकल्प या देशात राबवले जात आहेत. विशेष म्हणजे दहा टक्के नागरिकांच्या गुणसूत्रांची माहितीसुद्धा सरकारकडे उपलब्ध आहे. ज्याद्वारे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून भविष्यात होणाऱ्या रोगांचे निदान आधीच करून घेणे शक्य होणार आहे!

अशा विविध तंत्रज्ञानाचा वापर भारतासारख्या विकसनशील देशात देखील शक्य आहे. आपल्याकडे तंत्रज्ञांची कमतरता नाही. पण राजकीय इच्छाशक्ती, डिजिटल सुविधांचा अभाव आणि संगणक साक्षरता या मुख्य अडथळ्यांकडे प्रामुख्याने लक्ष देण्याची नितांत आवश्यकता भासते.

- तुषार भ. कुटे, पुणे