Tuesday, August 30, 2022

एक अनपेक्षित भेट

श्री. रमेश खरमाळे म्हणजे जुन्नर आणि परिसरातील प्रत्येकाला माहित असणारे व आपलेसे वाटणारे व्यक्तिमत्व होय. मागील अनेक वर्षांपासून जुन्नरमधील निसर्ग-संपदा व पर्यटन वृद्धीचे महान कार्य खरमाळे सर करत आहेत. मागील आठवड्यामध्ये जुन्नरमध्ये असताना योगायोगाने त्यांची भेट झाली.
तसं पाहिलं तर आम्ही अनेक वर्षांपासून समाज माध्यमांद्वारे एकमेकांना ओळखत होतो. पण त्यादिवशीची भेट ही पहिलीच प्रत्यक्ष भेट होती! एका उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे दर्शन झाल्यामुळे आम्ही दोघेही अर्थात मी आणि आमच्या सौ. भारावून गेलो. त्यांच्या कामाची पावती म्हणून मिळालेली स्मृतिचिन्हे आणि सन्मानपत्रे पाहून आम्हाला त्यांच्या एकूण कार्याची निश्चितच प्रचिती आली.
खरमाळे सरांनी स्वतः लिहिलेले ‘जगेन मायभू तुझ्यासाठी’ हे पुस्तक त्यांनी आम्हाला भेट म्हणून दिले. मागील काही दिवसांमध्ये वेळ मिळेल तसे पुस्तक वाचत होतो. त्यातून खरमाळे सरांच्या एकंदरीत व्यक्तिमत्त्वाची ओळख होत गेली. जुन्नर परिसरातील अडचणीच्या प्रसंगी जीव वाचवण्यासाठी त्यांनी केलेल्या मदतीची हकीकत तसेच जुन्नरमधील अनेक अपरिचित ट्रेकच्या गोष्टी त्यांनी या पुस्तकामध्ये शब्दबद्ध केलेल्या आहेत. आपल्या दैनंदिन जीवनातील कार्य करत असताना आपण समाजाचे देखील देणे लागतो, याची जाणीव विविध प्रसंगांमधून खरमाळे यांनी ठेवल्याचे दिसते. त्यांचे या पुस्तकातील अनुभव निश्चितच प्रेरणादायी असेच आहेत. नव्या पिढीतील तरुणांनी यातून बऱ्याच गोष्टी बोध घेण्यासारख्या आणि शिकण्यासारख्या आहेत.
त्यांच्या या पुस्तकामध्ये वर्णन केलेल्या अनेक ट्रेकच्या वाटा मी देखील अजून सर केलेल्या नाहीत! त्यांचे वर्णन ऐकून या परिसरामध्ये निसर्गामध्ये मुक्तपणे स्वैर करण्याची ऊर्जा निश्चितच प्राप्त होते. 1 comment:

to: tushar.kute@gmail.com