Tuesday, March 7, 2023

पिंपळ

वयाच्या मावळतीकडे झुकलेल्या एका वृद्ध 'युवका'ची ही गोष्ट आहे. हे गृहस्थ रिटायरमेंटनंतर आपले आयुष्य एकांतामध्ये घालवत आहेत. त्यांची पत्नी अनेक वर्षांपूर्वी त्यांना सोडून गेली आहे आणि सर्व मुले आता अमेरिकेमध्ये स्थायिक झालेली आहेत. त्यांचा आणि त्यांच्या नातवांचा संवाद केवळ व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होतो आहे. त्यातच ते समाधान मानत आपले दैनंदिन आयुष्य सुखाने आणि आनंदाने जगत आहेत. परंतु त्यातही आपले सगळे सोयरे जवळ नसल्याची सल आहेच.
त्यांची काळजी घेणारी भारतातील एक डॉक्टर युवती आहे. ती त्यांची सख्खी मैत्रीण देखील आहे. शिवाय सोबतीला त्यांचा स्वयंपाकी व मदतनीस तुकाराम देखील आहे. आजोबा दररोज रात्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपल्या नातवांशी आणि मुलांशी गप्पा मारत असतात. परंतु प्रत्यक्ष स्पर्शामध्ये असणारा ओलावा या इ-संवादामध्ये दिसून येत नाही. एके दिवशी घडलेल्या एका प्रसंगामुळे सर्वजण त्यांना अमेरिकेमध्ये येण्याची विनंती करतात. परंतु त्यांची इच्छा नसते. याच मातीमध्ये आपण विलीन व्हावे, असे त्यांना वाटत असते. पण मुलांच्या आणि नातवांच्या हट्ट पुढे त्यांचे काही चालत नाही आणि ते निर्णय घेतात. तो चित्रपटामध्ये पाहण्यासारखा आहे.
गजेंद्र अहिरे दिग्दर्शित या चित्रपटात आजोबांची मध्यवर्ती भूमिका दिलीप प्रभावळकर यांनी केली आहे. तसेच सोबतीला प्रिया बापट आणि किशोर कदम देखील दिसून येतात. चित्रपटाची मांडणी तशी फारच उत्तम. शिवाय भावभावनांचे चित्रण देखील उत्तम जमून आले आहे. चित्रपटाच्या अखेरीस कित्येक वर्षे उभा असलेला हा 'पिंपळ' नेमका कोणत्या दिशेने जातो हे पाहणे औत्सुक्याचे ठरते.No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com