Tuesday, February 28, 2023

महाद्वीपीय विस्थापन

या विश्वामध्ये कोणतीही गोष्ट स्थिर नाही. प्रत्येकाला गति प्राप्त आहे. जसे चंद्र पृथ्वीभोवती फिरतो, पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि सूर्यही स्वतःभोवती फिरतो. सूर्यमालेतील प्रत्येक ग्रह सूर्याभोवती फिरतच असतो. आकाशातल्या प्रत्येक ग्रहाला, ताऱ्यांना गती आहे. असंच काहीसं पृथ्वीच्या पृष्ठभागाचे आहे. पृथ्वीवरील जमिनीचे भाग अर्थात खंड हेही स्थिर नाहीत. ते एकमेकांपासून दूर जात आहेत. हा सिद्धांत काहीसा पटणारा वाटत नाही. परंतु तो खरा आहे.
सोळाव्या शतकामध्ये सर्वप्रथम अब्राहम ऑर्टेलियस यांनी हा सिद्धांत पहिल्यांदा मांडला होता. परंतु त्यांना भक्कम पुरावे देता आले नाहीत. पृथ्वीवरील सर्व खंड हे आपली जागा सातत्याने बदलत आहेत. किंबहुना ते एकमेकांपासून दूर किंवा जवळ जात आहेत. असं १८८० मध्ये सर्वप्रथम जर्मन शास्त्रज्ञ अल्फ्रेड वेगनर याने जगासमोर मांडले. अन्य बऱ्याच वैज्ञानिक शोधांप्रमाणेच याही शोधाला अथवा सिद्धांताला जागतिक मान्यता मिळाली नाही. त्यामुळे वॅगनरने हा सिद्धांत सिद्ध करण्यासाठी पुरावे गोळा करायला सुरुवात केली. १९१५ मध्ये त्यांनी या विषयावर एक परिपूर्ण पुस्तक लिहिले. या पुस्तकामध्ये त्यांचा महाद्वीपीय विस्थापन (कॉन्टिनेन्टल ड्रिफ्ट) हा सिद्धांत व्यवस्थित मांडण्यात आला होता. या सिद्धांतानुसार करोडो वर्षांपूर्वी पृथ्वीवरील आज अस्तित्वात असणारे सर्व सातही खंड एकमेकांना जोडलेले होते. दक्षिण अमेरिकेची पूर्व किनारपट्टी आणि आफ्रिका खंडाची पश्चिम किनारपट्टी जर एकमेकांना जोडून पाहिली तर असे लक्षात येते की हे भूभाग एकेकाळी एकमेकांना जोडलेले असावेत. आज या दोन्ही किनारपट्ट्यांमध्ये अटलांटिक महासागर पसरलेला आहे. याशिवाय वेगनर यांनी असे हे सिद्ध केले की, करोडो वर्षांपूर्वी सापडलेल्या जीवाश्मांचे नमुने जगाच्या विविध ठिकाणी सापडलेल्या नमुन्यांशी मिळतेजुळते होते. जसे ब्राझीलमधील जीवाश्म व पश्चिम आफ्रिकेतील जीवाश्म हे सारखेच आढळून आले. तसेच पूर्व आफ्रिकेतील जीवाश्म व भारतातील जीवाश्म हेही मिळतेजुळते दिसून येत होते. हीच मात्रा करोडो वर्षांपूर्वी नामशेष झालेल्या वनस्पतींनाही लागू पडत होती. काही ठिकाणच्या वातावरणाचा अभ्यास करून तेथील वातावरण एकेकाळी सारखेच असावे, हेही त्यांनी पटवून दिले. यावरून पृथ्वीवरील सर्व खंड एकमेकांना जोडलेले होते हे वेगनर यांनी पुराव्यांच्या आधारे सिद्ध केले. तरीही अनेकांना हे फारसे पटले नाही.
१९५० ते १९६० या दरम्यान नवीन तंत्रज्ञान आधारित चुंबकीय सर्वेक्षण करण्यात आले. त्यात असे सिद्ध होते की, सर्व खंड एकेकाळी एकमेकांना निश्चितच जोडलेले असावेत. या सर्वेक्षणातून "प्लेट टेक्टॉनिक" नावाचा नवा सिद्धांत जन्माला आला. ज्यात असे मांडण्यात आले की, पृथ्वीचे भूभाग अर्थात प्लेट नैसर्गिकरित्या सरकत आहेत. सर्वात वरच्या प्लेटला लिथोस्पियर तर त्याखालील ज्वालामुखीच्या प्लेटला आस्थेनोस्पियर असे म्हटले जाते. ज्वालामुखीच्या सातत्याने होणाऱ्या हालचालीमुळे पृथ्वीच्या भूभागावरील प्लेट सरकत आहेत.
एकेकाळी हे सर्व खंड सलग भूभागावर होते. त्यास पॅन्जिया असे म्हणतात. ही तीस कोटी वर्षांपूर्वीची स्थिती होती. सतरा कोटी वर्षांपूर्वी त्याचे लॉरेशिया व गोंडवानालँड असे दोन भाग व्हायला सुरुवात झाली. आशिया, युरोप व उत्तर अमेरिका हे उत्तरेकडील लॉरेशियामध्ये तर दक्षिण अमेरिका, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका आणि भारतीय उपखंड हे गोंडवानालँड भागांमध्ये होते. पाच करोड वर्षांपूर्वी भारतीय उपखंडाची प्लेट आशिया खंडाला जोडली गेली. ज्यामुळे आज हिमालयाची निर्मिती झाल्याचे दिसते. आजही भारतीय उपखंड सातत्याने आशिया खंडावर दाब देत आहे त्यामुळे हिमालयाची उंची काही इंचांनी वाढत चालली आहे. विशेष म्हणजे शास्त्रज्ञांनी हेही सिद्ध केले आहे की, अमेरिका व आफ्रिका खंडांतील अंतर दरवर्षी अडीच सेंटिमीटरने वाढत चालले आहे! आणखी काही लाख वर्षांमध्ये पृथ्वीचा आजचा नकाशा आणि त्यावेळेसचा नकाशा हा पूर्णपणे वेगळा असेल, हे मात्र निश्चित.


 

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com