Friday, November 24, 2023

बोनस

एखादा उद्योगपती जेव्हा नवा उद्योग सुरू करतो त्यामागे त्याचा काहीतरी सामाजिक उद्देश देखील असतो. कामगारांच्या बळावर तो प्रगती करत जातो. आणि यशाची शिखरे गाठतो. हे यशाचे शिखर गाठण्यासाठी त्याला अनेक कामगारांनी हातभार लावलेला असतो. म्हणूनच त्यांच्याविषयी त्याच्या मनात कृतज्ञता असते. मागील अनेक वर्षांपासून अनेक कंपन्यांमध्ये ही कृतज्ञता दिवाळीच्या बोनसद्वारे दाखवली जाते. अनेक कंपन्यांमधील कामगार वर्ग दिवाळीमध्ये मिळणाऱ्या बोनसवरच दिवाळी साजरी करत असतो. परंतु जेव्हा उद्योजकाची नवी पिढी कारभार हातात घ्यायला लागते तेव्हा केवळ अधिकाधिक नफा मिळवायचा म्हणून फालतू वाटणारे खर्च कमी करायला सुरुवात होते. त्यातच कामगारांना बोनस नको, हा विचार पुढे येतो. परंतु ज्यांनी ही कंपनी चालू केली त्यांचा बोनस बंद करायला ठाम विरोध असतो. परंतु नवीन पिढीला समजावून सांगायचे कसे हा प्रश्न त्यांना पडतो. त्यातून ते नव्या पिढीला अर्थात आपल्या नातवाला कामगारांच्या पगारामध्ये मोठ्या शहरात केवळ एक महिना रहायला सांगतात. अर्थात हे एक आव्हान असते. लहानपणापासून ऐशोआरामाच्या जीवनात वाढलेल्या त्याला सर्वसामान्य कामगारांचे जीवन कसं असतं, याचा अनुभव यावा म्हणूनच त्याच्या आजोबांनी हे आव्हान दिलेले असते. वरकरणी त्याला हे आव्हान क्षुल्लक वाटते. परंतु जेव्हा प्रत्यक्ष तो ते स्वीकारतो आणि नव्या जीवनाचा केवळ एक महिन्यासाठी आरंभ करतो तेव्हा नवी आव्हाने समोर उभी राहतात. अनेक अडचणींचा त्याला सामना करावा लागतो.. तळागाळात काम करणाऱ्या लोकांचे जीवन त्याला अनुभवता येते. त्यांच्या समस्या देखील समजतात. कदाचित यामुळेच त्याचे मतपरिवर्तन घडते. हा सारांश आहे "बोनस" या चित्रपटाचा. एका वेगळ्या कथेचा हा चित्रपट म्हणजे श्रीमंतांना गरिबांच्या जीवनाचे दर्शन घडविणारा असा आहे. वेगळी कथा आणि छान मांडणी हे याचे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल.


No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com