Friday, November 10, 2023

रामचंद्र पुरुषोत्तम जोशी

मराठीमध्ये फॅन्टासी प्रकारातील चित्रपटांची संख्या तशी कमीच आहे. अशाच प्रकारामध्ये मोडणारा चित्रपट म्हणजे "रामचंद्र पुरुषोत्तम जोशी".
रामचंद्र नावाचे हे गृहस्थ एक वर्षांपूर्वी मृत्यू पावलेले आहेत. परंतु अचानक स्वर्गामध्ये त्यांना काही तासांसाठी पृथ्वीवर जाण्याची संधी मिळते. ते पृथ्वीवर येतात देखील.  त्याच दिवशी त्यांचे वर्ष श्राद्ध देखील असते. पृथ्वीवर परतल्यानंतर आपली मुले आणि बायको यांना भेटण्याचा ते प्रयत्न करतात. वर्षश्राद्धाच्या दिवशीच त्यांच्याविषयी त्यांच्या आप्तस्वकीयांच्या मनामध्ये नक्की कोणत्या भावना आहेत, याचे दर्शन त्यांना होते. मागील एक वर्षांमध्ये त्यांच्यानंतर घरातील परिस्थिती खूप बदललेली असते. बायकोच्या मनावर परिणाम झालेला असतो. घरातील जबाबदारी मोठ्या मुलीवर आलेली असते. आणि लहान मुलगा वाया गेलेला असतो. या सर्व गोष्टी ते याची देही याची डोळा पाहतात. परंतु काहीच करू शकत नाही. घरातील एका व्यक्तीबरोबर ते संवाद साधू शकत असतात. त्यातूनच चित्रपटाची गोष्ट पुढे सरकत जाते.
चित्रपटाच्या सुरुवातीला जवळपास वीस-पंचवीस मिनिटे स्वर्गाचे ॲनिमेशन दाखवलेले आहे. त्याच वेळेस हा चित्रपट पूर्णपणे अनिमेटेड आहे की काय अशी शंका आली होती. परंतु तो नंतर वेगळ्या वळणाकडे गेला. मध्यंतरानंतर काहीसा भावुक आणि सामाजिक देखील बनू लागतो. या आगळ्यावेगळ्या कहाणीचे नायक आहेत रामचंद्र पुरुषोत्तम जोशी अर्थात ज्येष्ठ नट दिलीप प्रभावळकर. ही कथा पुढे काय वळण घेते आणि शेवट कसा होतो, हे चित्रपटातच पाहणे योग्य ठरेल.



No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com