Friday, January 5, 2024

आपली भाषा

रविवारचा दिवस. सकाळी बऱ्याच दिवसांनी बाहेर नाश्ता करण्यासाठी आम्ही जवळच्या एका हॉटेलमध्ये आलो. गर्दी फारशी नव्हती. आमची ऑर्डर दिली आणि वाट पाहू लागलो. शेजारच्या टेबलावर एक मराठी जोडपे येऊन बसले. अर्थात त्यांच्या बोलण्यावरून ते मराठी आहेत, हे आम्हाला समजले. त्यांनी लागोलाग हॉटेलच्या वेटरला बोलावले. अर्थात याकरिता त्यांनी बहुतांश मराठी लोक गुलाम असलेल्या हिंदी भाषेचा वापर केला, हे वेगळे सांगायला नको! हॉटेलचे नाव मराठी, मालक मराठी आणि सर्व कर्मचारी देखील मराठीतच बोलत होते. तरी देखील मराठी लोकांना मुघली भाषेचा वापर का करावा वाटतो, हा मोठा प्रश्नच आहे.
त्या दोघांनी ऑर्डर दिल्यानंतर लगेचच माझ्या पत्नीने मला एक गोष्ट सांगितली,
“आपल्या इथल्या मराठी लोकांना सतत हिंदीची गुलामी करायची सवय झालेली आहे. कुठेही गेलं की, लगेच हिंदीत सुरू होतात. अशा लोकांचा मला भयंकर राग येतो!”
अर्थात हे सर्व त्यांना ऐकू जाईल अशा भाषेमध्ये ती बोलली. याचा परिणाम सकारात्मक दिसून आला. पुढच्या वेळेस जेव्हा शेजारच्या टेबलावरील ‘त्या’ने वेटरला हाक मारली त्यानंतर तो त्याच्याशी मराठीतच संवाद साधत होता. अगदी बिल देईपर्यंत!
कधी कधी मुघली भाषेची गुलामी करत असणाऱ्या मराठी लोकांना अशाच पद्धतीने टोमणे मारावेत, असं वाटतं. त्याशिवाय ते सुधारणार नाहीत. आणि आपली भाषा देखील अभिमानाने वापरणार नाहीत!

- तुषार भ. कुटे


No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com