Tuesday, January 9, 2024

एक दृष्टिकोन

पुण्यातील एका राष्ट्रीय शिक्षण संस्थेमधील माझे काम आटोपून मी निघालो होतो. तळमजल्यावर कुणीच नव्हते. समोरून दोन विद्यार्थी काहीतरी शोधात येताना दिसले. त्यांनी मला हाक दिली आणि विचारले, “सर टॉयलेट कुठे आहे?” त्यांच्या बोलण्यावरून ते मराठी भाषिक वाटत नव्हते. पण तरीदेखील त्यांनी मराठी भाषेतून हा प्रश्न विचारला, याचे मला आश्चर्य वाटले. त्यामुळे मी तात्काळ त्यांना स्वच्छतागृहाचा रस्ता दाखवला. जाता जाता त्यांच्यातील संभाषण माझ्या कानी पडले.
दोघेही उत्तर भारतातील वेगवेगळ्या राज्यातून पुण्यात शिकायला आले होते. ज्या विद्यार्थ्याने मला विचारले तो इथे येण्याआधी पुणे शहराचा आणि इथल्या भाषेचा देखील अभ्यास करून आलेला होता! शिवाय मराठी भाषेत जुजबी प्रश्न विचारण्याचा सराव देखील त्याने केला होता. त्याचे मला विशेष कौतुक वाटले. कारण आजवर आपण पाहिलेच आहे की, उत्तरेतून आलेले लोक मराठी लोकांना गृहीत धरतात. आमची भाषा मराठी लोकांना येतच असेल, शिवाय तेच आमच्याशी आमच्या भाषेमध्ये बोलतील हे देखील त्यांना माहीत असतं. म्हणून महाराष्ट्र भूमीची मराठी भाषा शिकण्याची तसदी कोणी घेत नाही. परंतु या विद्यार्थ्याप्रमाणे दृष्टिकोन असेल तर त्यांच्याविषयी मराठी लोकांना देखील आपुलकी वाटेल. गरज कोणाला आहे हा प्रश्न नाही तर बाहेरून आलेले लोक इथल्या राज्याचा आणि भाषेचा किती सन्मान करतात? हे जास्त महत्त्वाचे. 


- तुषार भ. कुटेNo comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com