Wednesday, May 25, 2011

टोपण नावे

किवी, कांगारू ही नावे ऐकलियेत का कधी? अर्थातच ऐकली असणार..... न्युझीलंड व ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना मीडियावाले तसेच क्रिकेट समालोचक याच नावाने संबोधतात. अर्थात, यामागेही कारण आहेच. न्युझीलंडर्स किंवा ऑस्ट्रेलियन अशी मोठी नावे घेण्यापेक्षा किवी व कांगारू सोपे वाटते. केवळ याच दोन देशांच्या बाबतीत नाही तर अजुनही काही देशांच्या खेळाडूंना विविध नावाने संबोधले जाते.

किवी हा न्युझीलंडचा राष्ट्रीय पक्षी आहे. जगातील सर्वात छोटा व उडता न येणारा पक्षी म्हणजे किवी होय. हा केवळ न्युझीलंडमध्येच आढळतो. शिवाय शेजारच्या ऑस्ट्रेलियातही त्याचे वास्तव्य नाही. इतक्या दुर्मिळ पक्ष्याबद्दल न्युझीलंडर्सला अभिमान असणारच. त्यामुळेच त्यांना स्वत:ला किवी म्हणून घेण्यास अभिमान वाटतो. पहिल्या महायुद्धातील ऑस्ट्रेलिया व न्युझीलंड यांच्या एकत्रित सैन्यातील न्युझीलंडचे सैन्य संबोधण्यासाठी सर्वप्रथम किवी या नावाचा प्रयोग करण्यात आला. त्यानंतर हीच संज्ञा न्युझीलंडच्या नागरिकांना लागू पडली. १९१८ मध्ये प्रथमच ऑक्सफर्ड शब्दकोशात ’किवी’ म्हणजे ’न्युझीलंडचा नागरिक’ ही संज्ञा समाविष्ट करण्यात आली. पण, यात थोडासा फरक होता. kiwi” म्हणजे ’किवी पक्षी’ तर “Kiwi” म्हणजे ’न्युझीलंडचा नागरिक’ होय. इथे दोन्ही शब्दातला k वेगळा आहे. न्युझीलंडच्या राष्ट्रीय चिन्हात आपल्याला किवी पक्षी दिसून येतो.

ऑस्ट्रेलियाचा विचार केल्यास कांगारू हे ऑस्ट्रेलियन अस्मितेचे व संस्कृतीचे प्रतिक मानले जाते. हाही प्राणी केवळ ऑस्ट्रेलियातच आढळून येतो. कांगारू म्हटले की केवळ ऑस्ट्रेलियाच डोळ्यासमोर येते. इतके हे नाते घट्ट आहे. कांगारूंची एक प्रजात ही न्यु गिनियामध्येही आढळून येते. परंतू, ऑस्ट्रेलियाच त्यांचे घर मानले जाते. ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय चिन्हात तसेच त्यांच्या चलनी नाणे व नोटांवरही कांगारूने आपले स्थान मिळावले आहे. या नात्यामुळेच सर्वच खेळातील ऑस्ट्रेलियन खेळाडूंना ’कांगारू’ म्हणून संबोधतात.

दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना ’प्रोटिया’ या नावाने संबोधले जाते. याची महिती कदाचित खूप कमी जणांना असेल. इंग्रजी वृत्तपत्रे व इंग्रजी माध्यमे या शब्दाचा बहुतांश वेळा प्रयोग करतात. शिवाय काही समालोचकही याच शब्दाचा वापर दक्षिण आफ्रिकन खेळाडूंना संबोधण्यासाठी करतात. प्रत्यक्षात ’प्रोटिया’ हे या देशाचे राष्ट्रीय फूल होय. अतिशय मोहक व सुंदर असे हे फूल आहे. प्रोटियाच्या प्रजातींपैकी ९२ टक्के फुले ही दक्षिण आफ्रिकेत आढळून येतात. शिवाय मादागास्कर व गोंडवानालॅण्ड भागातही ही फुले दिसून आली आहेत. सन १७३५ मध्ये कार्ल लिन्युस याने या फुलाला प्रोटिया हे नाव दिले होते. ग्रीक देवता “प्रोटियस” वरून हे नाव दिले गेले आहे.

वेस्ट इंडियन खेळाडूंबाबत थोडी वेगळी परिस्थिती आहे. वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना विंडिज असेही म्हटले जाते. तसं पाहिलं तर वेस्ट इंडिज नावाचा कोणता सार्वभौम देश जगात अस्तित्वात नाही. क्रिकेट टीम तयार करण्यासाठी कॅरेबियन बेटांवरील काही देशांनी तयार केलेली ती एक फेडरेशन आहे. विशेष म्हणजे या फेडरेशनमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय वंशाचे खेळाडू खेळताना दिसतात. वेस्ट इंडिज मध्ये समाविष्ट असणाऱ्या ऍण्टिग्वा व बर्बुडा, बार्बाडोस, डोमिनिका, ग्रेनडा, गयाना, जमैका, सेंट किट्स व नेव्हिस, सेंट ल्युसिया, सेंट व्हिंसेंट, त्रिनिदाद व टोबॅगो या सर्वच देशांचा राष्ट्रीय खेळ हा क्रिकेट आहे. ब्रिटिशांनी क्रिकेट या कॅरेबियन बेटांवर नेल्यानंतर हा खेळ तिथे रूजला होता.

इटलीच्या खेळाडूंना व विशेषत: फुटबॉलपटूंना “आझ्झुरी” म्हणून संबोधले जाते. अझ्युयर (वा अझ्युरो) या शब्दावरून आझ्झुरी तयार झाला आहे. अझ्युयरचा अर्थ फिकट निळा अर्थात आकाशी रंग असा होतो. भारताप्रमाणेच इटलीचे सर्व संघ याच रंगाचा गणवेश परिधान करतात. यात फुटबॉल सोबतच रग्बी व आईस हॉकीचाही संघ शामील आहे. सन १९४६ पर्यंत इटलीवर राज्य करणाऱ्या सॅव्होईया साम्राज्याचा “आकाशी” हा अधिकृत रंग होता. याच कारणास्तव सर्वच खेळातील इटालियन संघ हे फिकट निळ्या रंगाचे गणवेश परिशान करतात व त्यांना “आझ्झुरी” म्हणूनच ओळखले जाते...!

आशियायी उपखंडातील भारतीय व बांग्लादेशी खेळाडू हे टायगर्स या नावानेही ओळखले जातात. परंतू, ही संज्ञा तितकिशी वापरली जात नाही. खराखुरा वाघ म्हणून जाणला जाणारा ’रॉयल बेंगाल टायगर’ हा भारत व बांग्लादेश या दोन्ही देशांचा राष्ट्रीय प्राणी असल्याने दोन्ही खेळाडूंना टायगर्स म्हटले जाते. हीच मात्रा श्रीलंकन लायन्सच्या बाबतीतहीलागू पडते. शिवाय लंकेच्या राष्ट्रीय झेंड्यातही या सिंहाने स्थान मिळवले आहे.

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com