Tuesday, May 17, 2011

’मराठी’ लेखक

मराठी भाषेमध्ये लिहिणारे अनेक मराठी व अमराठी लेखक आजवर अनेक होऊन गेले. प्रत्येक भाषेला स्वत:चे साहित्य असते. व साहित्य समृद्धीमुळेच भाषेची ओळख अधिक भक्कम होत असते. तंत्रज्ञानाचा विचार केला तर भारतीय भाषांमध्ये खूप कमी प्रमाणात लेखन केले गेले आहेत. कारण, आपल्या इथे इंग्रजी हीच तंत्रज्ञानाची अर्थात ज्ञानभाषा मानली जाते. तंत्रज्ञान विषयांवर इंग्रजी भाषेत लिहिणारे अनेक नामवंत भारतीय लेखक आहेत. शिवाय ’मॅक्ग्रा हील’, ’प्रेंण्टाईस हॉल’, ’विले’, स्प्रिंगर’, यासारख्या आंतरराष्ट्रीय नामांकित प्रकाशकांकडून अनेक भारतीय लेखकांची पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. भारतीय लेखकांच्या लिखानाचे वैशिष्ट्य म्हणजे भारतीय वाचकांना त्यांची भाषा व संकल्पना समजण्यास अवघड जात नाहीत व त्यांची भाषा ही सर्वसामान्य विद्यार्थ्यांस सोपीच वाटते.

अभियांत्रिकी शिक्षणामध्ये विविध विषयांची पुस्तके वाचताना मला अनेक मराठी लेखकांचीही पुस्तके वाचनात मिळाली. विशेष म्हणजे ही पुस्तके त्या विषयांसाठी ’टॉप प्रेफरन्स बुक्स’ म्हणून ओळखली जातात. यात मी सर्वप्रथम यशवंत कानेटकर यांचे नाव घेईन. भारतात जिथेजिथे ’सी प्रोग्रामिंग’ शिकविले जाते तिथे यशवंत कानेटकरांचे ’लेट अस सी’ वाचले जाते. ’सी प्रोग्रामिंग’ लॅंग्वेज शिकण्यासाठी ’बीपीबी’ प्रकाशनाने कानेटकरांचे हे पुस्तक प्रकाशित केले होते. या विषयावर भारतात सर्वात लोकप्रिय पुस्तक म्हणून या पुस्तकाने मान्यता मिळविली आहे. नुकतीच त्याची दहावी आवृत्ती प्रकाशित करण्यात आली. मी डिप्लोमाला शिकत असताना त्याची केवळ दुसरी आवृत्ती बाजारात आली होती. कालांतराने त्यात अनेक सुधारणा घडवून आणण्यात आल्या. माझ्यासारख्या अनेक जणांनी त्यांच्या ’सी प्रोग्रामिंग’ची बाराखडी या पुस्तकानेच सुरू केली आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे यशवंत कानेटकरांची ’सी प्रोग्रामिंग’ विषयावर सुमारे वीस पुस्तके प्रसिद्ध आहेत. एकाच विषयावरील विविध संकल्पनांवर इतकी पुस्तके लिहिणारे कानेटकर हे पहिलेच लेखक असतील. शिवाय सी++ विषयावरही त्यांची पुस्तके प्रकाशित आहेत. ’ऑब्जेक्ट ओरियन्टेड प्रोग्रामिंग’, ’डेटा स्ट्रक्चर्स’, ’कॉम्प्युटर ग्राफिक्स’, ’मायक्रोप्रोसेसर प्रोग्रामिंग’, ’विंडोज प्रोग्रामिंग’ ’सिस्टीम प्रोग्रामिंग’ या विषयांसाठी कानेटकरांची पुस्तके रेफरन्स बुक म्हणून वाचली जातात. गूगलच्या ’http://books.google.com या साईटवर त्यांची पुस्तके ऑनलाईन वाचता येतील.

“मायक्रोप्रोसेसर” हा विषय जेव्हा भारतीय विद्यापीठांच्या तसेच विविध तंत्रशिक्षण मंडळांच्या अभ्यासक्रमांत शिकवला जायला लागला तेव्हा 8085 ह्या प्रोसेसरचा अभ्यास ’मायक्रोप्रोसेसर’ विषयांत ठेवण्यात आला होता. ह्याच मायक्रोप्रोसेसरवर लिहिलेल्या सर्वात लोकप्रिय पुस्तकाचे लेखक आहेत रमेश गांवकर व त्या पुस्तकाचे नाव आहे ’मायक्रोप्रोसेसर आर्किटेक्चर प्रोग्रामिंग ऍण्ड अप्लिकेशन्स विथ 8085’. मायक्रोप्रोसेसर शिकण्यासाठी सर्वोत्तम पुस्तकांपैकीच हे एक पुस्तक. याशिवाय प्रा. गांवकर यांनी मायक्रोप्रोसेसर एम्बेडेड सिस्टिम्स व झेड 80 मायक्रोप्रोसेसर या विषयांवरही पुस्तके लिहिली आहेत. मायक्रोप्रोसेसरवर पुस्तके लिहिणारे अतुल गोडसे हेही उत्तम लेखकांपैकी एक. इंजिनियरिंगला दुसऱ्या वर्षाला शिकत असताना ’मायक्रोप्रोसेसर टेक्निक्स’ व तिसऱ्या वर्षाला ’मायक्रोप्रोसेसर बेस्ड सिस्टीम्स’ या विषयांसाठी त्यांची पुस्तके वाचण्याचा योग आला. 8086 80386 हे मायक्रोप्रोसेसर त्यांनी आपल्या पुस्तकांत अतिशय छान पद्धतीने समजावले आहेत. त्यांनी लिहिलेली पुस्तके आंतरराष्ट्रीय प्रकाशकांनी प्रकाशित नसली तरी ती मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांकडून वाचली जातात. त्यांची भाषाही सर्वसामान्य वाचकांना समजेल अशीच आहे. उगाच फार टेक्निकल न लिहिता गर्भित ज्ञान त्यांनी या पुस्तकांतून दिले आहे. याव्यतिरिक्त ’कॉम्प्युटर ऑर्गनायझेशन’ व ’कॉम्युटर ग्राफिक्स’ या विषयांवरही त्यांनी पुस्तके लिहिली आहेत. ही पुस्तके ’टेक्निकल पब्लिकेशन’ने प्रकाशित केली आहेत.

अच्युत गोडबोले हे मराठीतील आणखी एक उत्कृष्ट लेखक होय. सर्वसामान्य मराठी वाचकाला अच्युत गोडबोले हे पहिल्यापासूनच परिचित आहेत. इंग्रजी भाषेतील ज्ञान मराठी भाषेत सादर करण्याचे काम अच्युत गोडबोले यांनी केले आहे. शिवाय त्यांनी ’टाटा मॅग्रा हील’ कडून पुस्तकेही प्रकाशित झालेली आहेत. स्वत: संगणक अभियंता नसतानाही त्यांनी लिहिलेली संगणक अभियांत्रिकीमधील पुस्तके ही विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय आहेत. ’ऑपरेटिंग सिस्टीम’ हे त्यांनी लिहिलेले माझे एक आवडते पुस्तक होय. संगणक प्रणाली अर्थात ’ऑपरेटिंग सिस्टीम’ समजवून घेण्यासाठी हे एक उत्तम पुस्तक आहे. आजही हा विषय शिकवण्यासाठी गोडबोलेंचे पुस्तक टॉप प्रेफरन्स लिस्ट मध्ये येते. भारतीय लेखकाने फारशी किचकट भाषा न वापरता भारतीय पद्धतीने ’ऑपरेटिंग सिस्टीम’ समजावून सांगितली आहे. या पुस्तकाबरोबरच त्यांचे ’डेटा कम्युनिकेशन’ हे पुस्तकही ’टाटा मॅग्रा हील’ने प्रकाशित केले आहे. हे पुस्तक ’इलेक्ट्रॉनिक्स’ अभियांत्रिकी शाखांसाठी रेफरन्स बुक म्हणून वापरले जाते. गोडबोलेंच्या मराठी वाचनाबद्दल तर मराठी वाचकांना यापूर्वीच माहिती आहे.

अंतिम वर्ष संगणक व माहिती तंत्रज्ञान या अभियांत्रिकी शाखांना असलेल्या ’ऑब्जेक्ट ओरियन्टेड मॉडेलिंग ऍण्ड डिझाईन’ या विषयासाठी मी वाचलेले सर्वोत्तम पुस्तक हे अतूल कहाते यांनी लिहिलेले आहे. एक मराठी लेखक म्हणून मी त्यांनी नेहमी वृत्तपत्रांतून वाचत आलो आहे. परंतु, त्यांनी टेक्निकल पुस्तक प्रथमच वाचण्यास मिळाले. या पुस्तकाचे नाव आहे- ’ऑब्जेक्ट ओरियन्टेड ऍनालिसिस ऍण्ड डिजाईन’. याशिवाय कहाते यांनी अनेक टेक्निकल रेफरन्स बुक्स लिहिलेली आहेत. तसेच अच्युत गोडबोले यांच्या सोबत मराठी मध्येही त्यांचे लिखाण चालूच आहे.

’मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम’ हा विषय जेव्हा मी शिकवायला घेतला तेव्हा त्यासंबंधी मला विशेष माहिती नव्हती. अभ्यासक्रमानुसार जेम्स ओब्रायन या लेखकाचे पुस्तक रेफरन्स बुक म्हणून देण्यात आले होते. नेहमीप्रमाणे “फॉरेन ऑथर” असल्याने अर्थातच त्याची भाषा समजायला थोडी अबघडच होती. परंतु, वामन जावडेकर यांचे ’मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम- डिजिटल फर्म पर्स्पेक्टीव्ह’ हे पुस्तक जेव्हा वाचायला मिळाले तेव्हा या विषयाचा पाया मला समजला, तसेच केवळ थियरी विषय असूनही त्यात खऱ्या अर्थाने गोडी निर्माण झाली. त्यांनी लिहिलेले व टाटा मॅग्रा हीलने प्रकाशित केलेले हे पुस्तक उत्कृष्ट पुस्तकांपैकीच एक आहे. माहिती तंत्रज्ञान अभियंत्यांना ’मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम’ म्हणजे नेमके काय? याची माहिती हे पुस्तक देते. आणि अर्थातच भाषा ही समजायला अत्यंत सोपी आहे.

’मराठी लेखकांनी संगणक अभियांत्रिकी क्षेत्रात केवळ एवढीच पुस्तके लिहिलेली नाहीत. मी फक्त स्वत: वाचलेल्या पुस्तकांची माहिती इथे सादर केली. वाचकांना अधिक माहिती असल्यास त्यांनी इथे लिहावे...

2 comments:

 1. Sir mala ajun ek nav add karayach ahe yat ani te asha prakare

  Book:Core java ..a practical Approach(Coming soon)
  Auther: Tushar B. Kute

  (Sir tumi hi marathi ahe visaru naka ).

  ReplyDelete
 2. I am Marathi too. But, still don't have ability to stand in this row...

  ReplyDelete

to: tushar.kute@gmail.com