मागच्या आठवड्यात एके ठिकाणी पुस्तक प्रदर्शनाला जाणे झाले. वाचनसंस्कृतीची आपल्या इथे काय स्थिती आहे, हे आपल्याला माहीतच आहे. त्याप्रमाणेच सदर प्रदर्शनाला अगदी तुरळक गर्दी दिसून आली. माझी पुस्तके घेऊन झाल्यानंतर मी ती काउंटरवर घेऊन आलो. तिथे पैसे घेण्यासाठी बसलेला युवक आपल्या मोबाईल मधल्या व्हाट्सअपवर विविध मिम्सचे व्हिडिओ पाहत गुंग झाला होता. मागच्या अर्ध्या तासापासून त्याची नजर जराही मोबाईल मधून बाहेर आलेली नव्हती. माझे बिल करण्यासाठी त्याने काही सेकंद मोबाईल बाजूला ठेवला व परत आपल्या इच्छुक कार्यात गुंग होऊन गेला.
प्रदर्शनातून बाहेर आल्यावर मी विचार केला, अशा मोठ्या पुस्तक प्रदर्शनाच्या काउंटरवर जर मी बसलो असतो तर कदाचित मी दिवसभर फक्त तिथली पुस्तकेच वाचत बसलो असतो! किंबहुना कोणत्याही पुस्तक प्रेमीने हेच केलं असतं. पुस्तके वाचायची सोडून मोबाईल मधले व्हिडिओ पाहण्यात हे लोक किती वेळ वाया घालवतात? त्यांना नक्की त्यातून कोणते ज्ञान मिळतं? हा टाईमपास नाही का?
पण थोड्याच वेळात मला माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली. विचार केल्यानंतर समजले की, तो वाचत नाहीये.. कदाचित त्याला वाचनाची आवड नाहीये. म्हणून तो आज या ठिकाणी फक्त गल्ल्यावर पैसे गोळा करण्याची कामं करतोय. त्याचा त्याच्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असता तर कदाचित त्यालाही त्याच्या प्रगतीचा मार्ग सापडला असता. अर्थात तुमचा दृष्टीकोनच तुमचा भविष्य ठरवत असतं, हे पुनश्च एकदा त्या दिवशी समजलं.
© तुषार कुटे
Correct ... Absulately. .. correct
ReplyDeleteThanks...
DeleteVachal tar vachal 👍🏼
ReplyDelete