Showing posts with label book. Show all posts
Showing posts with label book. Show all posts

Friday, November 15, 2024

जुन्नर इनस्क्रीप्शन्स - शोभना गोखले

जुन्नर म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मस्थान असणारा शिवनेरी किल्ला आठवतो. पुणे जिल्ह्याच्या उत्तरेला पुण्यापासून सुमारे ९० किलोमीटर अंतरावर जुन्नर शहर वसलेले आहे. अष्टविनायकांपैकी ओझर आणि लेण्याद्री ही दोन स्थाने देखील याच परिसरात आहेत. आधुनिक जुन्नरची ही ओळख सर्वज्ञात असली तरी या शहराची प्राचीन काळापासून असलेली ओळख ही या परिसरातील बौद्ध लेण्यांमुळे होते.

भारतामध्ये सर्वात अधिक मानवनिर्मित लेणी ही महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात अधिक लेणी ही जुन्नर परिसरामध्ये आहेत. सातवाहनांच्या काळात दोन ते सव्वा दोन हजार वर्षांपूर्वी वसलेले हे शहर. तत्कालीन राज व्यवस्थेत राजधानी ही प्रतिष्ठान अर्थात पैठण येथे असली तरी जुन्नर हे व्यापाराच्या दृष्टीने सर्वात मोठे ठाणे होते. कल्याण आणि सोपारा बंदरांमध्ये समुद्रामार्गे आलेला माल जुन्नरमध्ये सह्याद्रीच्या कड्यांवर कोरलेल्या नाणेघाटातून सर्वप्रथम यायचा. तत्कालीन महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी बाजारपेठ होती, त्याला जीर्णनगर असेही म्हटले जायचे. सातवाहनांच्या राज्याची भरभराट होत असताना जुन्नर शहर मोठे होत होते. कोकण आणि देशाला जोडणारा जुन्नर हा एक दुवा होता. याच्या अनेक पाऊलखुणा आजही जुन्नर शहरांमध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये दिसून येतात. सातवाहन राजे हे बौद्ध विचारधारेचे आश्रयदाते होते. नाणेघाटामार्गे जुन्नर आणि इतर परिसरामध्ये येणाऱ्या बौद्ध भिक्खूंसाठी आजूबाजूच्या डोंगरांमध्ये अनेक लेण्या खोदण्यात आल्या होत्या. याच लेण्या आज जुन्नरचे प्राचीन वैभव बनून स्थितप्रज्ञपणे उभ्या आहेत. सुमारे २०० लेण्या या परिसरामध्ये पाहता येतात. त्यांचे प्रामुख्याने सहा गट आहेत. शिवनेरी किल्ल्याच्या तीन दिशांना असणारा शिवनेरी गट, मानमोडी डोंगराच्या तीन बाजूंना असणारा भीमाशंकर गट, अंबा-अंबिका गट आणि भूतलेणी गट, लेण्याद्री डोंगरातील लेण्याद्री आणि सुलेमान गट, पिंपळेश्वर डोंगरातील तुळजा गट आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नाणेघाट लेण्या. जुन्नरच्या या प्राचीन वैभवांमध्ये बौद्ध लेण्यांची सर्व शिल्पे, वास्तुकला पाहता येतात. शिवाय या सर्व लेणी समूहांमध्ये तत्कालीन प्राकृत भाषेमध्ये आणि ब्राह्मी लिपीमध्ये लिहिलेले शिलालेख देखील पाहता येतात. प्राचीन वास्तुकला अभ्यासकांसाठी तसेच बौद्धधर्म उपासकांसाठी जुन्नर म्हणजे एक आदर्श ठाणे आहे. मराठी आणि प्राकृत या दोन्ही भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठीचे पुरावे याच परिसरातील नाणेघाट लेण्यांनी दिले. आज २००० वर्षांनंतर देखील या लेण्या महाराष्ट्राचं वैभव टिकवून आहेत.

अनेक संशोधकांनी जुन्नर परिसरातील शिलालेखांवर अभ्यास केला. याच अभ्यासकांपैकी एक म्हणजे शोभना गोखले होत. त्यांनी लिहिलेल्या जुन्नर इनस्क्रीप्शन्स या पुस्तकामध्ये प्राचीन जुन्नरचे विस्तृत वर्णन केलेले आहेत. तसेच इथल्या लेण्यांमधील असणारे सर्व शिलालेख सविस्तरपणे या पुस्तकामध्ये मांडलेले आहेत. शिवाय त्यांचा अर्थ देखील समजावून सांगितलेला आहे. १९ व्या शतकामध्ये सर्वप्रथम पश्चिम घाटातील लेणी व शिलालेखांवर अभ्यास झाला. याचा संदर्भ गोखले यांनी या पुस्तकांमध्ये दिलेला दिसून येतो. 

केवळ जुन्नरच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या इतिहासावर सखोल प्रकाशझोत टाकणारे असे हे पुस्तक आहे. प्राचीन नाणेशास्त्राच्या अभ्यासक असणाऱ्या शोभना गोखले लिखित हे पुस्तक भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेने प्रकाशित केलेले आहे.



Monday, August 19, 2024

लेट अस सी

इयत्ता नववीमध्ये असताना माझी प्रोग्रामिंगची ओळख झाली. त्या काळात आम्हाला “बेसिक” नावाची संगणकीय भाषा शिकवली जायची. आठवड्यातून एक ते दोन तास हा वर्ग चालायचा. शिवाय या विषयाला गुण देखील नव्हते. आणि कदाचित याच कारणास्तव त्यावेळी आम्ही त्याला फारसे गांभीर्याने घेतले नाही.
परंतु डिप्लोमा इंजिनिअरिंगला प्रवेश घेतल्यानंतर दुसऱ्या वर्षी पहिल्यांदाच “सी प्रोग्रामिंग लँग्वेज”ची ओळख झाली. संगणकाच्या इतिहासामध्ये लोकप्रिय असणारी आणि आजही वापरात असणारी ही संगणकीय भाषा. २५-२६ वर्षांपूर्वी संगणकीय भाषा शिकण्यासाठी उपलब्ध असणारी साधने अतिशय मर्यादित होती. इंटरनेट अस्तित्वात होते परंतु सदैव उपलब्ध नव्हते. आणि शिवाय त्यावरील माहिती देखील अपुरी होती आणि विस्तृत नव्हती. याच कारणास्तव संगणकीय प्रोग्रामिंग शिकणे हे आव्हानात्मक होते. अर्थात सदैव केवळ पुस्तकांवरच आणि त्यावरील त्यातील ज्ञानावरच विसंबून राहावे लागत असे. अशावेळी यशवंत कानेटकर यांनी लिहिलेले “लेट अस सी” हे पुस्तक वाचण्यात आले. त्या काळात देखील सी प्रोग्रामिंगवर आधारित असणारे हे सर्वात लोकप्रिय पुस्तक होते. बऱ्याच जणांनी शिफारस केलेले हे पुस्तक मी वाचायला सुरुवात केली. खरं सांगायचं तर माझ्या संगणकीय प्रोग्रामिंगची सुरुवातच या पुस्तकाने झाली. फोटोमध्ये या पुस्तकाची तिसरी आवृत्ती आहे. अगदी हीच आवृत्ती सर्वप्रथम मी वाचली होती. आणि याच पुस्तकातून माझ्या प्रोग्रामिंगचा श्रीगणेशा झाला. संगणकीय भाषेमधील विविध संकल्पना याच पुस्तकातून मला समजायला लागल्या. अर्थात यासाठी मला माझ्या मित्रांनी देखील बरीच मदत केली होती. परंतु या पुस्तकाव्यतिरिक्त अन्य कोणतेही पुस्तक प्रोग्रामिंग शिकण्यासाठी मी त्याकाळी वापरले नाही. कानेटकर म्हणतील तोच अंतिम शब्द, असं काही त्या काळात आम्ही समजत असू. अर्थात ते खरं देखील होतं. प्रोग्रामिंगच्या विविध संकल्पना प्रात्यक्षिकांद्वारे मी या पुस्तकातूनच अनुभवल्या. आणि कदाचित याच कारणास्तव प्रोग्रामिंगचा आमचा पाया अधिक भक्कम होत गेला. एका अर्थाने माझ्यासाठी प्रोग्रामिंगची ही भगवद्गीताच होती, असे म्हणायला हरकत नाही. आज या पुस्तकाची १९ वी आवृत्ती बाजारामध्ये आलेली आहे. पण माझ्यासाठी मी वाचलेली आणि अनुभवलेली तिसरी आवृत्ती महत्त्वाची वाटते. आज पुन्हा हे पुस्तक विकत घेतले. याच पुस्तकामध्ये माझ्या प्रोग्रामिंग इतिहासाच्या भावना जखडलेल्या होत्या आणि आजही आहेत. 

---  तुषार भ. कुटे



Tuesday, August 1, 2023

ग्रंथांची गोष्ट सांगणारा ग्रंथ

पारंपारिक ज्ञान प्राप्त करण्यासाठी पुस्तकांचा वापर होतो. पुस्तके मानवी जीवनावर भाष्य करतात, तत्त्वज्ञानाच्या गोष्टी सांगतात, आयुष्याची शिकवण देतात आणि शहाणपणाचे धडे देखील देतात. पण पुस्तकांविषयी भाष्य करणारी पुस्तके अतिशय कमी आहेत. त्यातीलच एक आणि मी आजवर वाचलेले सर्वोत्तम पुस्तक म्हणजे, 'जग बदलणारे ग्रंथ'.
जग बदलण्याची ताकद जितकी मानवामध्ये आहे, निसर्गामध्ये आहे तितकीच ती ग्रंथांमध्ये देखील आहे. मागील हजारो वर्षांपासून ग्रंथांची परंपरा मानवी इतिहासामध्ये दिसून येते. त्यातील प्रामुख्याने धार्मिक ग्रंथांनी मानवी जीवनावर प्रभाव टाकलेला दिसतो. परंतु धर्मग्रंथांव्यतिरिक्त अजूनही अनेक असे ग्रंथ आहेत ज्यामुळे मानवी जीवनावर विशिष्ट बदल घडेल, असा प्रभाव देखील पडलेला आहे. अशा निवडक आणि सर्वोत्तम ५० ग्रंथांविषयी लेखिका दीपा देशमुख यांनी या ग्रंथामध्ये लिहिलेले आहे. हे ग्रंथ लिहिणारे लेखक काही सामान्य व्यक्ती होते तर काही असामान्य. धर्म, अर्थ, काम, विज्ञान, तत्त्वज्ञान, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, मानववंशशास्त्र, गणित अशा विविध ज्ञानशाखांमध्ये लिहिले गेलेले ग्रंथ त्या शाखेमध्ये मैलाचा दगड ठरले होते. किंबहुना अनेक ग्रंथांनी या ज्ञानशाखेच्या अभ्यासाची दिशाच बदलवून टाकली. काही ज्ञानशाखा तर याच ग्रंथांमुळे पुढे आलेल्या आहेत. भगवद्गीता, त्रिपीटक, बायबल, कुराण यासारखे ग्रंथ धर्मग्रंथ असल्यामुळे त्यांनी मानवी जीवनावर प्रभाव तर टाकलाच होता. परंतु इतिहासामध्ये अजरामर झालेल्या अन्य व्यक्तींनी लिहिलेले ग्रंथ देखील तितकेच महत्त्वाचे होते. अनेकदा इतिहासातील बऱ्याच व्यक्ती त्यांच्या या ग्रंथांमुळेच ओळखल्या जातात. अनेक शास्त्रज्ञांनी आपले सिद्धांत, प्रमेय आपल्या मूळ ग्रंथातूनच मांडली. त्यावर बरेच वादविवाद झाले. सुरुवातीला बहुतांश लोकांनी त्यांचे विचार स्वीकारले नाहीत. अनेकांनी तर धर्मविरोधी म्हणून त्याच्या प्रती देखील जाळल्या. परंतु अखेरीस हे ग्रंथ समाजमान्यता पावले. आज विविध ज्ञानशाखातील सखोल ज्ञान प्राप्त करायचे असल्यास सर्वप्रथम हेच ग्रंथ वाचले जातात, प्रमाण मानले जातात. इतकी ताकद यांच्या लेखकांमध्ये व त्यांच्या लेखणीमध्ये होती. कौटिल्याचे अर्थशास्त्र, युक्लीडचे द इलेमेंट्स, गॅलिलिओचे डायलॉग, आयझॅक न्यूटनचा प्रिन्सिपिया, कार्ल लिनियसचा सिस्टीमा नॅचुरे, अरिस्टॉटलचा वर्क्स, कार्ल मार्क्सचा दास कॅपिटल, चार्ल्स डार्विनचा द ओरिजिन ऑफ स्पेशीस, रवींद्रनाथ टागोर यांचा गीतांजली, मोहनदास करमचंद गांधी यांचा सत्याचे प्रयोग, स्टीफन हॉकिंग यांचा ए ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम आणि युवाल नोवा हरारीचा सेपियन्स हे ग्रंथ तर प्रत्येकाने आपले आयुष्यात किमान एकदा तरी वाचावे असेच आहेत.
लेखिकेने केवळ ग्रंथाविषयीच नव्हे तर त्यातील मूळ गाभ्याविषयी देखील सखोल भाष्य केले आहे. लेखकाने कोणत्या उद्देशाने किंवा कोणत्या परिस्थितीमध्ये हा ग्रंथ लिहिला, याची देखील माहिती आपल्याला होते. शिवाय एखादा ग्रंथ आपण वाचलेला नसेल तरी तो वाचण्याची उत्सुकता निश्चित तयार होते. कार्ल लिनियसचा सिस्टीमा नॅचुरे बद्दल मला या पुस्तकातून पहिल्यांदाच माहिती मिळाली होती. नंतर त्याचे पुस्तक देखील वाचले आणि खरा जीनियस कसा असतो याची माहिती मिळाली. अजूनही यात वर्णिलेले अनेक ग्रंथ मी देखील वाचलेले नाहीत. पण आगामी काळामध्ये ते नक्की वाचू, याची मला खात्री वाटते.

- तुषार भ. कुटे


 

Wednesday, January 18, 2023

प्रा. सोनाली मोरताळे

प्रा. सोनाली मोरताळे म्हणजे पिंपरी चिंचवड तंत्रनिकेतन मधील माहिती तंत्रज्ञान विभागाच्या विभाग प्रमुख होय. मागील पाच ते सहा वर्षांपासून विविध कार्यशाळेच्या निमित्ताने मॅडमचा आणि आमचा संवाद होतच असतो. त्यांची विद्यार्थ्यांना सातत्याने नवीन तंत्रज्ञान ओळख करून देण्याची तळमळ मला माहिती आहे. याच कारणास्तव माहिती तंत्रज्ञान विभागातील विद्यार्थी अन्य महाविद्यालयांपेक्षा विशेष कामगिरी करताना दिसतात. माझ्या "पायथॉन प्रोग्रॅमिंग" या पुस्तकासाठी मोरताळे मॅडमने आपला अभिप्राय देखील दिला होता. आज त्यांना प्रत्यक्ष पुस्तक भेट म्हणून दिले. त्या स्वतः पायथॉन प्रोग्रॅमिंग शिकलेल्या आहेत. शिवाय मी मराठीतून पुस्तक लिहिल्याबद्दल त्यांनी माझे विशेष अभिनंदन देखील केले.


 

Monday, January 9, 2023

प्रा. मंगला माळकर

पिंपरी चिंचवड तंत्रनिकेतनमधील संगणक अभियांत्रिकीच्या विभागप्रमुख म्हणजे प्रा. मंगला माळकर होत. त्या महाविद्यालयाच्या तसेच महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या अनेक अनुभवी शिक्षकांपैकी एक आहेत. मागील सहा ते सात वर्षांपासून आमची ओळख आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची व त्यातील बदलांची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी म्हणून त्या नेहमी कार्यरत असतात. तंत्रनिकेतनमध्ये शिकवत असून देखील त्यांच्या या दृष्टिकोनामुळे अनेक अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती विविध तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित करून विद्यार्थ्यांना त्या देत असतात. मला देखील त्यांचे मार्गदर्शन सातत्याने मिळत आलेले आहे. काही कारणास्तव त्यांना माझ्या 'पायथॉन प्रोग्रॅमिंग' या पुस्तकासाठी अभिप्राय देता आला नाही. पण प्रत्यक्ष पुस्तक पाहिल्यानंतर त्यांची सकारात्मक प्रतिक्रिया सूचक अशीच होती. आज त्यांना मी माझे पुस्तक भेट दिले. एका विद्यार्थीभिमुख शिक्षकास पुस्तक दिल्याचा आनंद मला मिळाला.


 

Friday, December 9, 2022

डॉ. संजय तलबार

"अलार्ड अभियांत्रिकी महाविद्यालय, मारुंजी" चे प्राचार्य डॉ. संजय तलबार म्हणजे एक दिलखुलास व्यक्तिमत्व. सहा वर्षांपूर्वी नांदेडच्या श्री. गुरु गोविंद सिंहजी तंत्रज्ञान संस्थेमध्ये ते कार्य करत असताना माझी त्यांच्याशी ओळख झाली. ते स्वतः इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये 'पीएचडी' आहेत. शिवाय अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली 'पीएचडी' देखील पूर्ण केली आहे. वेगळ्या शाखेचे प्राध्यापक असून देखील सरांना प्रोग्रामिंग मध्ये विशेष रुची आहे. ते सातत्याने नवीन गोष्टी शिकत असतात. म्हणूनच माझ्यासाठी ते प्रेरणास्थानी आहेत. पायथॉन प्रोग्रामिंगवर लिहिलेल्या माझ्या पहिल्या मराठी ई-पुस्तकासाठी सरांना अभिप्राय देण्यासाठी विनंती केली. तेव्हा त्यांनी लगेचच होकार कळविला आणि काही दिवसांमध्येच आपल्या अभिप्रायाचा व्हिडिओ बनवून देखील मला पाठविला. त्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये आम्ही या व्हिडिओचा समावेश केला होता. त्या त्यातीलच सारांशरुपी अभिप्राय पुस्तकाच्या प्रिंट आवृत्तीमध्ये देखील घेण्यात आलेला आहे. आज सरांना हे पुस्तक स्वहस्ते देताना होणारा आनंद अवर्णनीय होता. माझ्या नवनवीन कार्याला त्यांची त्यांचा सदैव पाठिंबा असतो. या भेटीत देखील त्यांनी दिलेल्या शुभेच्छा व सूचना बहुमूल्य अशा होत्या!


 

Saturday, December 3, 2022

एक भेट

मागील आठवड्यामध्ये जुन्नर मधील बेल्हे इथल्या समर्थ महाविद्यालयामध्ये पायथॉन प्रोग्रामिंगच्या व्याख्यानाच्या निमित्ताने जाणे झाले. समर्थ शैक्षणिक संकुलाचे विश्वस्त श्री. वल्लभ शेळके यांची देखील त्यादिवशी भेट झाली. खरंतर या औपचारिक भेटीचे अनौपचारिक संवादामध्ये कसे रूपांतर झाले, ते आम्हाला देखील समजले नाही. वल्लभ शेळके हे इतिहासाचे एक गाढे अभ्यासक होय. त्यांनी इतिहासामध्ये मास्टर्स पदवी देखील प्राप्त केली आहे, हे त्यादिवशी आम्हाला पहिल्यांदाच समजले. आम्ही देखील ऐतिहासिक पुस्तकांचे प्रकाशक आहोत, हे ऐकल्यावर त्यांचा आनंद द्विगुणित झाला. त्यांनी इतिहासातील विविध विषयांवर, ऐतिहासिक व्यक्तिरेखांवर आणि इतिहास संशोधकांवर आमच्याशी सखोल चर्चा केली. यातूनच त्यांच्या एकंदरीत अभ्यासू व्यक्तिमत्त्वाचा आम्हाला देखील अंदाज आला. शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापन मंडळातील सदस्य इतका अभ्यासू असू शकतो, याचे उदाहरण म्हणजे वल्लभ शेळके होत. वाचनाची आवड असलेल्या या व्यक्तिमत्वाला मी माझे पुस्तक दिले याचा मला देखील मनस्वी आनंद झाला. 

 

Wednesday, June 15, 2022

एक विशेष संवाद

'पायथॉन प्रोग्रॅमिंग' या मराठीतील माझ्या पुस्तकाची 'लिंक्डइन'वर मी पोस्ट केली होती. अनेक मराठी तसेच अमराठी तंत्रज्ञांकडून त्यावर लाईक, कमेंट्स आणि शेअर्सचा पाऊस पडला. त्यामुळे ती अधिकाधिक लोकांकडे पोहोचण्यास मदत झाली. मराठी लोक आपल्या भाषेतून तंत्रज्ञान शिकण्यास व समजावून घेण्यास उत्सुक आहेत, ही बाब समाधानाची होती. परंतु काही अमराठी लोकांनी देखील आमच्या या प्रयत्नाची प्रशंसा केली.
बंगळुरूमधील 'डेटा सायन्स'मध्ये काम करणाऱ्या एका कन्नड अभियंत्याशी झालेला संवाद मला विशेष महत्त्वाचा वाटतो. त्याने आग्रहाने माझ्याकडून माझा मोबाईल नंबर घेतला होता आणि मी दिलेल्या वेळेवरच मला फोन केला. त्याने युरोपमधील फ्रान्स आणि जर्मनी सारख्या देशांचे दौरे केले होते. तिथल्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी व तंत्रज्ञान शिक्षण हे त्यांच्याच भाषेमध्ये दिले जातं. इंग्रजी भाषा ते वेगळी ट्युशन लावून शिकत असतात. याच कारणास्तव तंत्रज्ञानातील अनेक मूलभूत तत्वे त्यांची पक्की झालेली असतात. परंतु भारतात मात्र परिस्थिती अगदीच उलटी आहे. आपण अभियांत्रिकी असो व मेडिकल असो कायदा, वाणिज्य, विज्ञान असो किंवा औषधनिर्माणशास्त्र असो सर्वच गोष्टीत इंग्रजीमधून शिकवत असतो. इंग्रजी ही जगाची भाषा आहे, असं आपल्याला वाटतं. त्यात खोटं काहीच नाही. ती एक संवादाची भाषा आहे. परंतु ज्ञानग्रहण करायची असल्यास स्वभाषा हीच सर्वोत्तम भाषा होय. ज्यामधून आपल्याला सर्व गोष्टी नीट समजतात. परंतु भारतात असं कुठेही होताना दिसत नाही, याबद्दल त्याने खंतही व्यक्त केली. आपल्यासारख्या तंत्रज्ञांनी यासाठी पुढाकार घ्यायला हवा. अधिकाधिक ज्ञान भारतीय भाषांमध्ये यायला हवं. याविषयीही तो आग्रही होता. इंग्रजीमध्ये बहुतांश जणांना समजत नसल्याने ते केवळ रट्टा मारून परीक्षा देतात व पास होतात. आज अभियांत्रिकी शिक्षण घेणारे सत्तर टक्‍क्‍यांपेक्षा अधिक विद्यार्थी केवळ प्रश्नांची उत्तरे पाठ करूनच परीक्षा देत असतात. अशी परिस्थिती भारतातील सर्वच राज्यांमध्ये आहे. याच कारणास्तव भारतामध्ये मनुष्यबळ पुरेसे असले तरी ज्ञानाधारित पिढी तयार होताना दिसत नाही. उलट भारतीय भाषांमधून शिकवले तर ते अधिक उत्तमरीत्या समजू शकतात, असेही त्याला वाटत होते. मी देखील त्याच्या या मताशी शंभर टक्के सहमत आहे. आज भारतातील अभियांत्रिकी व तंत्रज्ञान संस्थांमधील बहुतांश विद्यार्थी ज्ञानग्रहण करतच नाही. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांच्या पदव्यांना केवळ एक प्रिंट केलेला एक आकर्षक कागदी तुकडा म्हणता येईल. आणि मग आम्हाला नोकरी का मिळत नाही? या प्रश्नाचे उत्तर ते दुसऱ्या कुणावर तरी सोपवून मोकळे होतात. यातून सुयोग्य मार्ग काढण्याची गरज आहे. शासनाने देखील थोडे सर्वेक्षण केले तरी त्यांना चांगला मार्ग सापडू शकतो.
(टीप: आमचा हा पूर्व संवाद इंग्रजीतून झाला!)

Ⓒ Ⓐ  तुषार भ. कुटे

Friday, December 20, 2019

एका पुस्तक प्रदर्शनात

मागच्या आठवड्यात एके ठिकाणी पुस्तक प्रदर्शनाला जाणे झाले. वाचनसंस्कृतीची आपल्या इथे काय स्थिती आहे, हे आपल्याला माहीतच आहे. त्याप्रमाणेच सदर प्रदर्शनाला अगदी तुरळक गर्दी दिसून आली. माझी पुस्तके घेऊन झाल्यानंतर मी ती काउंटरवर घेऊन आलो. तिथे पैसे घेण्यासाठी बसलेला युवक आपल्या मोबाईल मधल्या व्हाट्सअपवर विविध मिम्सचे व्हिडिओ पाहत गुंग झाला होता. मागच्या अर्ध्या तासापासून त्याची नजर जराही मोबाईल मधून बाहेर आलेली नव्हती. माझे बिल करण्यासाठी त्याने काही सेकंद मोबाईल बाजूला ठेवला व परत आपल्या इच्छुक कार्यात गुंग होऊन गेला. 


प्रदर्शनातून बाहेर आल्यावर मी विचार केला, अशा मोठ्या पुस्तक प्रदर्शनाच्या काउंटरवर जर मी बसलो असतो तर कदाचित मी दिवसभर फक्त तिथली पुस्तकेच वाचत बसलो असतो! किंबहुना कोणत्याही पुस्तक प्रेमीने हेच केलं असतं. पुस्तके वाचायची सोडून मोबाईल मधले व्हिडिओ पाहण्यात हे लोक किती वेळ वाया घालवतात? त्यांना नक्की त्यातून कोणते ज्ञान मिळतं? हा टाईमपास नाही का?
पण थोड्याच वेळात मला माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली. विचार केल्यानंतर समजले की, तो वाचत नाहीये..  कदाचित त्याला वाचनाची आवड नाहीये. म्हणून तो आज या ठिकाणी फक्त गल्ल्यावर पैसे गोळा करण्याची कामं करतोय. त्याचा त्याच्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असता तर कदाचित त्यालाही त्याच्या प्रगतीचा मार्ग सापडला असता. अर्थात तुमचा दृष्टीकोनच तुमचा भविष्य ठरवत असतं, हे पुनश्च एकदा त्या दिवशी समजलं.

© तुषार कुटे

Wednesday, October 30, 2019

डिंभक

डॉ. जयंत नारळीकर, निरंजन घाटे व बाळ फोंडके यांच्यानंतर मी वाचलेले डॉ. संजय ढोले हे चौथे विज्ञान कथा लेखक आणि त्यांचा "डिंभक" हा विज्ञान कथासंग्रह! आपल्या आवडत्या विषयात वाचन करण्याची मजाच काही और असते. 'मनोरंजनाबरोबरच कुतूहल जागृत करणाऱ्या लक्षवेधक विज्ञानकथा' या सारांशाने मेहता पब्लिशिंग हाऊसने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. विज्ञानाला अनुसरून लिहीलेल्या जवळपास सर्वच कथांची भट्टी छान जमून आलीये.


पुस्तकाच्या मलपृष्ठावर नमूद केल्याप्रमाणे कथांचा सारांश असा...
नॅनो तंत्रज्ञानाद्वारे मृतांना जिवंत करण्याचा प्रयोग...  मृत माणसाच्या मेंदूचे रोपण जिवंत कुत्रीच्या शरीरात करणे...  भविष्यात नेऊ शकणारी खुर्ची आणि एका राजकीय नेत्याने तिचा केलेला गैरवापर...  शिशाच्या अणूचे सोन्याच्या अणूमध्ये रूपांतर करण्यात यशस्वी झाल्याने मालामाल झालेला शास्त्रज्ञ...  परग्रहावरील डिंभक... पिंजकामुळे लाभलेल्या अदृश्य होण्याच्या शक्तीमुळे एका शास्त्रज्ञाने अतिरेक्यांचा केलेला खात्मा...  क्लोननिर्मिती...  गर्भाबरोबरच वाढणाऱ्या ट्युमरला शास्त्रज्ञाने दिलेली मात...  ग्राफीनच्या कणांवरचे संशोधन...  विशिष्ट प्रयोगाद्वारे खुन्यापर्यंत पोहोचणारा शास्त्रज्ञ...  एक विचित्र कीटक. अशा विविध वैज्ञानिक संकल्पनांचा सदुपयोग व दुरुपयोग करणारे शास्त्रज्ञ. त्यातून घडणारे मानवी मनाचं दर्शन. वैज्ञानिक संकल्पना आणि मानवी मन यांच्या कल्पनेतून साकारलेल्या रंजक विज्ञान कथांचा वाचनीय संग्रह...
थोडसं वेगळं सांगायचं तर बऱ्याच कथांमध्ये ध्येयवेडे शास्त्रज्ञ व त्यांची प्रयोगशाळा अशी कथा रचना तयार झाली आहे. त्यामुळे कथेचा मूळ गाभा जरी वेगळा असला तरी त्यात सारखेपणा जाणवत राहतो. लेखकाने विज्ञानाच्या सर्व अंगांचा विचार केल्याचेही दिसते. एकंदरितच विज्ञान प्रेमींनी हे पुस्तक वाचावे असेच आहे.

Sunday, March 4, 2012

माझ्या पहिल्या पुस्तकाच्या निमित्ताने....


साधारणत: दहा वर्षांपूर्वी जेव्हा मी इंजिनियरिंगला शिकत होतो, तेव्हा मी कधी विचारही केला नव्हता की, मी एखाद्या पुस्तकाचा लेखक होईल. सन २००० मध्ये मी माझ्या मराठी लेखनाला सुरुवात केली होती परंतु, पुस्तक लिहिण्याचा विचार मनातही नव्हता. लेखन करणे, हे केवळ छंद म्हणून मी जोपासू लागलो होतो. आज त्याचे फलित मला माझ्या पहिल्या पुस्तकाच्या रूपाने समोर दिसत आहे.
इंजिनियर आणि तोही शिक्षक व मराठी लेखकही... हे समीकरण काहींना न समजणारे आहे. महाराष्ट्रातील सर्वोत्तम अभियांत्रिकी महाविद्यालयातून संगणक अभियांत्रिकीची पदवी घेऊन शिक्षक बनणाऱ्याला काहीजण मूर्ख म्हटले होते. त्यांच्या भावना मी समजू शकतो. परंतु, ’काही मिळविण्यासाठी काही गोष्टींचा त्याग करावा लागतो’, हेही तितकंच खरं आहे. माझ्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर मला मिळालेल्या प्रतिक्रियांत मी माझ्या विद्यार्थ्यांपेक्षा माझ्या महाविद्यालयीन मित्रांच्या प्रतिक्रिया महत्वाच्या मानतो. त्याचे कारणही तसेच आहे. त्यांनी मला घडताना पाहिले होते व मी काय करू शकतो, याची जाणीवही त्यांना होती. आज मागे वळून बघताना मला काहीही गमावल्याचे दु:ख वाटत नाही. असो... पुस्तकाच्या खऱ्या कथेकडे वळूयात.
 पूर्वी केवळ अलंकारिक लिहिणं वगैरे किंवा नव्या पिढिच्या प्रतिनिधीच्या भावना मांडणे, अशा कल्पनांतून मी पुण्याच्या दैनिक युवा सकाळमधून लिहिणे सुरू केले होते. सकाळ समूहाचे ते नुकतेच सुरू झालेले दैनिक होते. माझे लेख वृत्तपत्रांतून प्रकाशित होऊ लागल्यावर मला खरोखर नवा हुरूप मिळू लागला होता. पूर्वी पेपरात नाव आलं की खूप अभिमान वाटायचा. पण, आता त्याचं फारसं काही वाटत नाही. आता नावापेक्षा आपलं लिहिलेलं प्रसिद्ध झालंय, याची किंमत जास्त वाटू लागलीय. गेल्या बारा वर्षांची लेखन तपस्या आज ’बिटस न्ड बाईट्स’ या नितीन प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकाद्वारे मला प्रकाशित करता आली. पूर्वीचं हलकंफुलकं लेखन गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञानाकडे वळून गेलं व पुस्तकरूपी प्रकाशितही झालं. मला त्याचा विशेष आनंद वाटतो.
माझा सतत लिहित राहण्याचा छंद मला या पुस्तकासाठी कामाला आला. संगणक विषयावर वृत्तपत्रांत लिहावे, असे अनेक दिवसांपासून मनात होते. त्यासाठी सर्वप्रथम नाशिकच्या ’दैनिक गांवकरी’ ला संपर्क साधला. नोव्हेंबर २००८ मध्ये त्यांच्या कार्यालयातून फ़ोन आला. ’दैनिक गांवकरी’चे उपसंपादक श्री. शैलेंद्र तनपुरे यांच्याशी भेट निश्चित झाली. संगणकाच्या विविध हार्डवेअर व सॉफ़्टवेअर शोधामागील नक्की इतिहास काय आहे? हे समजावून सांगण्याकरीता दैनंदिन लेखमालिका तयार करण्याची संकल्पना तनपुरे सरांनीच मला सांगितली. संगणकाचा इतिहास माझा पक्का असल्याने मला या विषयी लिखाण करण्यास काहीच अडचण येणार नव्हती. माझ्या या दैनंदिन स्तंभाला मीच ’बिट्स अन्ड बाईट्स’ हे नाव सुचविले व तनपुरे सरांनीही त्याला तात्काळ होकारही दिला. वृत्तपत्रात दैनंदिन लिहिण्यासाठी मला मिळालेली ही पहिलीच संधी होती.
१ जानेवारी २००९ रोजी ’बिट्स अन्ड बाईट्स’ मधला पहिला लेख प्रसिद्ध झाला. महिनाभरातच उत्तर महाराष्ट्रातून अनेक फ़ोन व ई-मेल प्राप्त झाले. विशेष म्हणजे यात शहरी भागातून कमी तर ग्रामीण भागातून जास्त प्रतिसाद प्राप्त झाला होता. संगणकाविषयी वृत्तपत्रांमधून प्रथमच अशी दैनंदिन लेखमालिका प्रसिद्ध झाली होती. या मालिकेचा फ़ायदा जितका वाचकवर्गाला होत तितकाच तो मलाही झाला. संगणकाच्या एखाद्या भागाविषयी केवळ वरकरणी माहिती असून चालणार नव्हती म्हणून अनेक लेखांना समृद्ध करण्याकरीता मला इंग्रजीतील दर्जेदार पुस्तकांचा तसेच इंटरनेटवरील लेखांचा मोठा आधार घ्यावा लागला. त्यातून मला ही मोठी ज्ञान प्राप्ती झाली. शिक्षकी पेशात असल्यामुळे या ज्ञानाचा मला सतत फ़ायदा सतत झाला आहे. एखाद्या संकल्पनेला शिकवताना सुरुवात करतेवेळी मी यातील नक्की इतिहास काय आहे! अशा प्रकारच्या उत्तराने सुरुवात करतो. त्यामुळे विद्यार्थ्यांची उत्सुकता वाढत जाते. एकंदरीत लेखमालिका लिहताना मला तनपुरे सरांच्या सूचनांचाही मोठा फ़ायदा झाला आहे. या लेखमालिकेला पुस्तक रुपात आणण्याची संकल्पना मला त्यानीच दिली होती.
संगणक इतिहास मांडताना अनेक धडाडीच्या संशोधकांची व संगणक विकसकांची चांगलीच ओळख होते. प्रत्येक  क्षेत्रात व्यवस्थापन शास्त्राला वाव आहे, याची कल्पना येते. संगणकाचा मुलभूत विषय  मानला जाणारा ’कॉम्प्युटर र्गनायझेशन’ हा विषय शिकवताना मी विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो. Computer is not a magic, but it is a logic!’ हे १०० टक्के खरे आहे. अनेक धडपड्या व ध्येयवेड्या संगणक तज्ञांनी आजचा परिपूर्ण संगणक तयार केला आहे यात वाद नाही. त्यांनी संगणकाच्या विविध संकल्पना तयार केल्या नसत्या तर आजचा संगणक अस्तित्वात आलाच नसता. एखादे हार्डवेअर वा सॉफ़्टवेअर वापरताना ते बनविण्याचे श्रेय कोणाचे आहे याची माहीती जवळपास कोणालाच नसते. पण त्यांचे योगदान आपण कधीच हिरावून घेऊ शकत नाही. जुन्या पिढीतील संगणक विकसकांनी जो संगणकाचा विकास केला आहे अशा ज्ञात व अज्ञात तज्ञांना माझा सावंद्य नमस्कार ! त्यांचे कार्य मराठी वाचकांना समजावे याकरीता मी केलेला हा एक प्रयत्न होय.
नितीन प्रकाशनाकडे जेंव्हा मी ’बिट्स अन्ड बाईट्स’ च्या पुस्तकरूपी प्रकाशनाचा प्रस्ताव मांडला तेंव्हा त्यांनी मला तात्काळ होकार दिला. आज नितीन प्रकाशन मराठीमध्ये तंत्रज्ञानाला आणू पाहत आहे, याचा मला अभिमान वाटतो. मराठीतील माझे पहिले पुस्तक प्रकाशित करत असल्याबद्द्ल मी श्री. नितीन गोगटे व श्री. अविनाश काळे यांना मन:पूर्वक धन्यवाद देतो.
प्रस्तावना लिहण्याकरीता मी अच्युत गोडबोले सरांना जेंव्हा विनंती केली तेंव्हा त्यांनी तात्काळ मला होकार दिला. माझ्यासारख्या नवोदित लेखकाला त्यांनी प्रोत्साहन दिले. त्यांचे शतश: धन्यवाद. मराठी तंत्रज्ञान लिखाणासाठी मी गोडबोले सरांना माझा आदर्श मानत आलो आहे. त्यांचीच प्रस्तावना माझ्या पुस्तकाला लाभली, हे मी माझे भाग्य मानतो.
माझ्यातील संगणक अभियंत्याची ओळख मराठी तंत्रज्ञान लेखक म्हणून दैनिक गांवकरी मुळे झाली. गांवकरी वृत्तपत्र समूहाचा मी ऋणी आहे. माझे धाकटे बंधू अमित व अमोल यांचे सहकार्य ही लेखमालिका व पुस्तक लिहिण्यासाठी खूप मोलाचे ठरले. याशिवाय क. का. वाघ तंत्रनिकेतन मधील तसेच संदिप तंत्रज्ञान संस्था व संशोधन केंद्र येथील सर्व सहकाऱ्यांचा मी आभारी आहे.
प्रत्यक्ष दिसत नसले तरी माझ्या सर्व यशात मोलाचा सहभाग असणारे माझी आई-वडील, काका-काकी, ज्यांच्या कडून मी लिखाणाचा वसा घेतला ते मामा विजय आवटे व नेहमीच मला प्रोत्साहित करणारे माझे इतर सर्व कुटुंबिय व लिखाणाबद्द्ल नेहमीच चौकस असणारे मित्र अर्जून, प्रमोद, माणिक व पत्रकार अशोक डेरे यांचही योगदान मोलाचं आहे, हे देखिल तितकच खरं.