Monday, September 28, 2020

वेगवान गोलंदाज

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान गोलंदाज कोणता? या प्रश्नाचे उत्तर जवळपास सर्वांनाच माहित आहे. परंतु, युट्युबवर जाऊन 175 एमपीएच या नावाने एकदा सर्च करून बघा. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मतिषा पथिराना याने मागील वर्षी कुमार विश्वचषकामध्ये भारताविरुद्ध 175 किलोमीटर प्रतितास वेगाचा चेंडूत टाकल्याचे व्हिडिओ तुम्हाला आढळून येतील. परंतु प्रत्यक्षात असे आहे का?
175 हा क्रिकेटमधला अविश्वसनीय वेग मानला जाईल. प्रत्यक्ष हा चेंडू पाहिला तर लक्षात येते की, काहीतरी गडबड आहे. खरं तर गडबड होतीच! त्यावेळी आयसीसीची स्पीडगन व्यवस्थित चालत नव्हती. त्यामुळे तिने 175 चा वेग दाखवला. अशी परिस्थिती सुमारे वीस वर्षापूर्वीही झाली होती. ज्यात पाकिस्तानच्या मोहम्मद सामी या गोलंदाजाचा वेग 163 इतका दाखवण्यात आला होता. याचेही व्हिडिओ युट्युबवर पाहता येतील. मोहम्मद सामीचा चेंडू सौरभ गांगुलीने सीमापार धाडला होता. तसा तो वेगवान होता. परंतु, 163 चा वेग गाठू शकेल, असे दिसत नाही. आयसीसीची स्पीडगन यापूर्वी बरेचदा अशीच बिघडलेली आहे. तरीही सर्वात वेगवान गोलंदाज कोणते? याचा खराखुरा आढावा आपण घेऊयात. मागच्या पंधरा वर्षांमध्ये शंभर मैलांचा अर्थात 160 किलोमीटर प्रतितास या वेगाचा पल्ला केवळ एकदाच एका गोलंदाजाने गाठलेला आहे. त्यापूर्वीची दहा वर्ष मात्र वेगवान गोलंदाजांनी क्रिकेट विश्वावर राज्य केले होते. त्यात प्रामुख्याने ऑस्ट्रेलिया व पाकिस्तानी गोलंदाजांचा समावेश होता. वेगवान गोलंदाजांचे वेग हेच सर्वात मोठे अस्त्र होते. त्याचा वापरही उत्तमरित्या मैदानावर केला गेला. परंतू, आजची परिस्थिती पाहिली तर ध्यानात येते की, गोलंदाजांना 150 चा वेगही मोठ्या मेहनतीने पार करता येतो. 


शोएब अख्तर आजवरचा सर्वात वेगवान गोलंदाज. या पाकिस्तानी गोलंदाजाने सन 2003 च्या विश्वचषकामध्ये इंग्लंड विरुद्ध 161.3 kmph चा वेग गाठला होता. हाच  आजवरचा सर्वात वेगवान चेंडू होय. इतर वेळेसही शोएब अख्तरचे बहुतांश चेंडू 150 च्यावर वेग गाठत असत. ऑस्ट्रेलियाचा ब्रेट ली हा दुसरा वेगवान गोलंदाज होय. वेस्ट इंडिज विरुद्ध खेळताना त्याने 161.1 चा वेग सन 2003 मध्येच गाठला होता. ऑस्ट्रेलियाचा शॉन टेट या गोलंदाजानेही 161 चा वेग इंग्लंड विरुद्ध पार केलेला आहे. चौथ्या क्रमांकावरील जेफ थॉमसन याचा विक्रम सुमारे पंचवीस वर्ष अबाधित होता. वेस्ट इंडिज विरुद्ध 1975 मध्ये खेळताना त्याने 160.6 चा वेग गाठला होता. पाचव्या क्रमांकावरही ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क हा गोलंदाज येतो. 160 च्यावर गोलंदाजी केलेला तो पाचवा गोलंदाज होता. या पाच जणांव्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कुणीही आजवर 160 किलोमीटर प्रतितास किंवा 100 मैल प्रतितास टप्पा पार केलेला नाही!


No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com