Wednesday, May 25, 2022

आय-ह्यूमन

सन २०१९ मध्ये 'आय-ह्यूमन' नावाची एक इंग्रजी डॉक्युमेंटरी रिलीज करण्यात आली होती. ऍमस्टरडॅम येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय डॉक्युमेंटरी फिल्म फेस्टिव्हलमध्ये तिचे सर्वप्रथम प्रदर्शन करण्यात आले.

 

जग बदल बदलविण्याची क्षमता असणारे किंबहुना मानवी भविष्याला नवीन आयाम देऊ शकणारे तंत्रज्ञान म्हणजे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स होय. मागील काही वर्षांपासून या तंत्रज्ञानाचा विकास अतिशय वेगाने होताना दिसतो आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या किंबहुना अन्य क्षेत्रातही कार्य करणाऱ्या अनेक कंपन्यांनी या तंत्रज्ञानाचा वापर व विकास सुरू केल्याचे दिसते. यामुळे मानवी जीवन सुकर होईल असे सर्वांना वाटत आहे. याव्यतिरिक्त या तंत्रज्ञानाद्वारे समोर येणारी दुसरी बाजू काय असेल? याची चर्चा आय-ह्युमन या डॉक्युमेंटरीमध्ये अतिशय उत्कृष्टरित्या करण्यात आलेली आहे.
जगातील विविध कंपन्यांमध्ये कार्य करणारे मशीन लर्निंग इंजिनियर, एआय इंजिनीयर तसेच डेटा सायंटिस्ट यांच्या मुलाखती घेऊन ही डॉक्युमेंटरी बनविण्यात आलेली आहे. सारांश सांगायचा तर आर्टिफिशिअल इंटेलिजन्सद्वारे समोर येणारी दुसरी बाजू अतिशय भयानक असेल, असे सर्वांनाच वाटते. त्याची एक झलक सन २०१६ मध्ये झालेल्या अमेरिकेतील राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्ये 'केंब्रिज ऍनालिटिका' नावाच्या कंपनीने आपल्याला दाखवली होती. अशा अनेक घटना यापूर्वी देखील घडलेल्या आहेत. किंबहुना घडत देखील आहेत. भविष्यामध्ये त्याची व्याप्ती आणखी वेगाने वाढत जाईल असे दिसते. इंटरनेटद्वारे जोडल्या गेलेल्या मानवी जगावर किंबहुना मानवाच्या आभासी जगावर आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचे अप्रत्यक्षपणे बारकाईने लक्ष आहे. फेसबुक आणि गुगलसारख्या कंपन्या जवळपास जगातील प्रत्येक माणसाला ओळखू लागलेल्या आहेत. कदाचित आर्टिफिशिअल इंटेलिजन्सद्वारे भविष्यामध्ये मानवी मनाचा ताबा घेण्याची क्षमता देखील त्यांच्यामध्ये आहे. यातून कोणत्या विनाशकारी घटना घडू शकतात, हे विविध संगणक तज्ञांनी काळजीपूर्वक या डॉक्युमेंटरीमध्ये सांगितलेले आहे.
फिल्मच्या सुरुवातीलाच स्टीफन हॉकिंग यांचं एक वाक्य दाखवण्यात येतं, 'आर्टिफिशिअल इंटेलिजन्स हे मानवी इतिहासातील सर्वोच्च यश असेल तसेच ते शेवटचे देखील असेल' असं ते म्हणतात. यामध्ये काहीच खोटं वाटत नाही. केंब्रिज ऍनालिटिका सारख्या शेकडो कंपन्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा ताबा घेण्यासाठी सज्ज झालेल्या आहेत. जगातील सर्वोत्कृष्ट इंजिनियर्सची फौजदेखील ते तयार करत आहेत. कदाचित येत्या काळामध्ये नैतिकता हा शब्द केवळ डिक्शनरीमध्येच वाचायला मिळेल. अशी शक्यता देखील अनेक शास्त्रज्ञ व्यक्त करतात.
या फिल्ममध्ये आणखी एक महत्त्वाचं वाक्य येतं. आपण सोशल मीडियावर ज्या गोष्टी वाचतो, त्या आपल्याला कोणीतरी दाखविलेल्या असतात. म्हणजेच आपल्या वाचन्यावर त्यांचे नियंत्रण असतं अर्थात भविष्यामध्ये ते आपल्या विचार करण्यावर देखील नियंत्रण ठेवू शकतात! ही आर्टिफिशिअल इंटेलिजन्सची कटू बाजू आहे. सोशल मिडीया लोकांच्या भावनांवर नियंत्रण ठेवू लागला आहे. अब्जावधी लोकांवर नियंत्रण ठेवायचे असल्यास तितकेच शक्तिशाली अल्गोरिदम तयार करावे लागतात. अशा शेकडो अल्गोरिदमचा भरणा या क्षेत्रांमध्ये वेगाने होताना दिसतो आहे.
हे तंत्रज्ञान वापरत असताना नियम व अटी कदाचित कोणीही लागू करणार नाही. तसेच लागू केल्या तरी कोणी त्या पाळतील याची शाश्वती देता येणार नाही. पुढचं शीतयुद्ध हे इंटरनेट आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्स याद्वारे लढलं जाणार आहे, हे मात्र नक्की!
या डॉक्युमेंटरीच्या शेवटी एक महत्त्वाचं वाक्य निर्माणकर्त्यांनी लिहिलेले आहे...  गुगल आणि फेसबुक यांनी आमच्या या फिल्मसाठी मुलाखत देण्यास नकार दिला होता!
या डॉक्युमेंटरीचं पार्श्वसंगीत अतिशय उत्तम आहे. त्यामुळे त्यातील वाक्य न वाक्य ऐकण्यासाठी आपण सातत्याने खिळवून राहतो. 


Ⓒ Ⓐ  तुषार भ. कुटे 








No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com