Saturday, May 28, 2022

जुन्नरच्या परिसरात - प्र. के. घाणेकर

भटकंतीची खरी मजा पावसाळ्यातच येते. महाराष्ट्रात पावसाळ्यामध्ये भटकंती करायची असल्यास अगणित पर्याय उपलब्ध आहेत. सह्याद्रीच्या डोंगररांगांमधील घाटवाटा, धबधबे, धरणे, नद्या, किल्ले ही #महाराष्ट्र पर्यटनाच्या हृदयस्थानी आहेत! पावसाळ्यात महाराष्ट्राबाहेरून देखील पर्यटक मोठ्या प्रमाणामध्ये इथे पर्यटनासाठी येत असतात. आपल्या येथील धार्मिक स्थळ देखील वर्षा पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते.
लवकरच पावसाळा सुरू होत आहे. त्यामुळे पावसात पर्यटनाची अनुभूती घेण्यासाठी पर्यटक पावसाची चातकासारखी वाट पाहत आहेत. #जुन्नर हा आमचा महाराष्ट्राचा पहिला घोषित केलेला पर्यटन तालुका होय. #शिवजन्मस्थान म्हणून जुन्नरची जगभरात ओळख आहेच. परंतु त्याहीपेक्षा महाराष्ट्र संस्कृतीचे दर्शन घडवणारी अनेक ठिकाणे तसेच पावसाळी पर्यटन स्थळे या भागांमध्ये वसलेली आहेत. सुमारे दहा #घाटवाटा, चार धरणे, पाच नद्या, सात किल्ले आणि उंच डोंगरांवरून कोसळणारे असंख्य धबधबे जुन्नरच्या परिसरात पाहता येतात. पावसाळ्यामध्ये जुन्नरचा निसर्ग सह्याद्रीतल्या मनमोहक सौंदर्याची उधळण करीत असतो.
अनेकांना या परिसरामध्ये नक्की कोणकोणती पर्यटन स्थळे आहेत, याची माहिती नसते. शिवाय सोशल मीडियाद्वारे जुजबी माहिती घेऊन अनेक जण भटकंती करतात. या सर्वांसाठी मार्गदर्शक असणारे हे #पुस्तक ज्येष्ठ दुर्ग अभ्यासक प्र. के. घाणेकर यांनी लिहिलेले आहे. जुन्नरच्या परिसरात असणाऱ्या सुमारे ५० विविध पर्यटन स्थळांविषयी त्यांनी या पुस्तकामध्ये विस्तृत माहिती दिलेली आहे. आम्ही स्वतः जुन्नरचे असलो तरी बरेचदा याच पुस्तकाचा संदर्भ घेऊन भ्रमंती केलेली आहे. शिवाय अनेक स्थळांना मधील अगदी छोट्या छोट्या गोष्टी देखील त्यांनी या पुस्तकात नमूद केलेल्या दिसतात.

Ⓒ Ⓐ  तुषार भ. कुटे


 

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com