Thursday, May 26, 2022

मराठीतून पायथॉन

मागच्या सहा-सात वर्षांपासून पायथॉन नावाची नवी संगणकीय भाषा वेगाने पुढे यायला लागली होती. परंतु इंटरनेटवर ही भाषा शिकण्यासाठी हवे तितकेच स्त्रोत उपलब्ध नव्हते. हळूहळू तेदेखील इंग्रजीद्वारे उपलब्ध व्हायला लागले. परंतु मराठी भाषेतून मात्र ही संगणकीय भाषा शिकवण्यासाठी कोणताही स्त्रोत उपलब्ध नव्हता. मग आम्ही ठरवलं की, पायथॉन शिकवण्यासाठी मराठी भाषेतून व्हिडिओज तयार करायचे. मग हळू हळू एकेक व्हिडीओ तयार होत गेला आणि मी ते आमच्या अधिकृत युट्युब चॅनेल वर अपलोड करत गेलो. सुरुवातीच्या काळामध्ये फारसा प्रतिसाद नव्हता. परंतु काही महिन्यांमध्येच आमच्या चॅनेलच्या सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या व्हिडिओज मध्ये मराठीतून पायथॉन शृंखलेतील सर्वच व्हिडिओ यायला लागले! या व्हिडिओजला मिळणारे व्ह्यूज मोठ्या प्रमाणात वाढत गेले. त्यावर प्रेक्षकांच्या व विद्यार्थ्यांच्या येणाऱ्या कमेंट्स वाचून आपण प्रगत तंत्रज्ञानाचा नवीन स्त्रोत मराठी भाषेतून उपलब्ध करून दिल्याची मनोमन जाणीव झाली. खरंतर आम्हाला मिळणारे हे एक प्रोत्साहन होतं.
आज युट्युबवर असणारे व्हिडिओ दोन टप्प्यांमध्ये आम्ही तयार केले आहेत. विशेष म्हणजे गुगल किंवा युट्युबवर जरी तुम्ही python in marathi असं टाईप केलं तरी हेच व्हिडीओ तुम्हाला सर्वप्रथम दिसून येतील! इतकी लोकप्रियता त्यांनी मिळवलेली आहे. मागच्या दोन वर्षांपासून मोठ्या प्रमाणात कमेंट्स, ई-मेल्स तसेच व्हाट्सअप मेसेजेस आम्हाला प्राप्त झालेले आहेत. जवळपास ३५ चे ४०% चॅनेल सबस्क्राईबर हे याच व्हिडिओजमुळे आम्हाला मिळाले आहेत. याउलट इंग्रजीतून बनवलेल्या व्हिडिओजला फारसा प्रतिसाद मिळत नाही. कारण इंग्रजीतून याच विषयावर हजारो व्हिडीओ उपलब्ध आहेत. परंतु मराठीतून नाही. याचाच फायदा आमच्या चॅनेलचे रँकिंग वाढवण्यास आणि चॅनेल मॉनेटाईझ करण्यास देखील झाला. मराठी भाषेला स्कोप नाही, असं म्हणणाऱ्यांसाठी ही एक चपराक होती.
दीड वर्षांपूर्वी पायथॉन प्रोग्रॅमिंगवर मी मराठीतून पहिले पुस्तक ई-बुक स्वरूपात प्रकाशित केले. कोणत्याही प्रकारची जाहिरात न करता देखील या पुस्तकाचा ऑनलाइन पद्धतीने विक्रमी खप झाला. अजूनही त्याची विक्री थांबलेली नाही. यावरूनच मराठीला ज्ञानभाषा म्हणून आजही मोठा स्कोप असल्याचे दिसते. लोकांना आपल्या मातृभाषेतून शिकायचं आहे. परंतु संसाधने इंग्रजीतून उपलब्ध असल्यामुळे त्यात अनेक अडचणी येतात. याच अडचणींवर उपाय शोधण्यासाठी यापुढेही आमचे प्रयत्न अविरत चालू राहतील. फक्त तुमचा पाठिंबा गरजेचा आहे.
पुढील काही दिवसांमध्ये 'मराठीतून पायथॉन' ही युट्युब व्हिडीओ शृंखला आणखी दहा व्हिडिओजने वाढवण्यात येणार आहे.

YouTube Link: https://www.youtube.com/playlist?list=PL9D-kb1y7d4cL3xI0Wk1krRjjiPE4IPUd


Ⓒ Ⓐ तुषार भ. कुटे

 


No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com