Tuesday, May 24, 2022

मानववंशशास्त्र

आपण अर्थात मानव या पृथ्वीवर कसे आलो व आपली प्रगती नक्की कशी झाली? हा प्रश्न वर्षानुवर्षे जिज्ञासू वृत्ती असणाऱ्या मानवाला पडलेला होता. देव नावाच्या एका संकल्पनेने त्या प्रश्नाचे उत्तर मानवाने स्वतःलाच देऊन टाकले. परंतु काही शतकांपूर्वी चार्ल्स डार्विन नावाच्या व्यक्तीने शास्त्रशुद्ध उत्तर आपल्याला दिले आहे. ते उत्तर म्हणजे 'मानवी उत्क्रांतीचा सिद्धांत'. या सिद्धांतामुळे मानववंशशास्त्र नावाची नवीन विज्ञान शाखा चालू झाली. उत्क्रांती या विषयाभोवती होणाऱ्या संशोधनाला वेग आला. आणि अद्भुत अशी माहिती विज्ञानाने जगासमोर आणली.
शालेय जीवनात शिकत असताना या शास्त्राची माहिती आपल्याला पहिल्यांदा होते. परंतु सारांश इतकाच लक्षात राहतो की, फार पूर्वी माणूस माकड होता आणि आज माकडाचा मानव तयार झाला! यापुढे आपण जात नाही. परंतु, मानववंशशास्त्र ही विज्ञानाची एक अद्भुत अशी शाखा आहे, जी मानवाच्या या उत्क्रांतीचं सविस्तर उत्तर देते. त्याबद्दल आपण जितकं वाचू तितकं कमीच वाटतं. किंबहुना त्याबद्दलची जिज्ञासा अधिक वेगाने वाढू लागते. विज्ञानविश्वामध्ये रमत ठेवण्याची ताकद या शास्त्रामध्ये आहे. मागच्या काही वर्षांमध्ये या विषयांवर भाष्य करणारी व माहिती देणारी विविध लेखकांची पुस्तके वाचून काढली. तरीही जिज्ञासा थांबायचं नाव घेत नाही. या अद्भुत जगापासून अलिप्त देखील राहता येत नाही, अशी सध्या परिस्थिती आहे.

Ⓒ Ⓐ  तुषार भ. कुटे


 

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com