Thursday, June 16, 2022

मऱ्हाटा पातशाह

मागील बरीच दशके मराठी माणसांची इतिहासाबद्दल अनास्था दिसून येते. जसे की शिवकालानंतर महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे एकही चित्र उपलब्ध नव्हते. परंतु, शंभर वर्षांपूर्वी इतिहासाचे भीष्माचार्य वा. सी. बेंद्रे यांनी महत्प्रयासाने छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले चित्र युरोपमधून भारतामध्ये आणले आणि शिवाजी महाराज कसे दिसत होते? हे महाराष्ट्रीयांना पहिल्यांदाच अनुभवता आले. विशेष म्हणजे त्यापूर्वीही शिवाजी महाराजांची चित्रे अनेक युरोपियन देशांमध्ये होती. परंतु इतिहास विषयाच्या अनास्थेमुळे आपण यावर फारसा विचार केला नाही. वा. सी. बेंद्रे यांनी शोधलेल्या पहिल्या चित्रानंतर हळूहळू शिवरायांची अनेक चित्रे उपलब्ध होत गेली. किंबहुना ती शोधण्यासाठी बेंद्रे यांची प्रेरणाच संशोधकांना कारणीभूत ठरली, असे म्हणता येऊ शकेल.
'शिवाजी महाराजांची चित्रे' हा विषय घेऊन लिहिलेला केतन कैलास पुरी लिखित 'मऱ्हाटा पातशाह' हा ग्रंथ होय. आजच्या काळामध्ये संशोधनात्मकरीत्या लिहिलेल्या निवडक ग्रंथांपैकी हा एक उत्तम ग्रंथ आहे. मागील शतकभरामध्ये शिवाजी महाराजांची विविध तत्कालीन चित्रकारांनी काढलेली चित्रे ही या पुस्तकांमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत. शिवाय त्यांमागील इतिहास, त्यांची चित्रशैली याचेही सारासार वर्णन सदर पुस्तकांमध्ये आपल्याला वाचायला मिळते. शिवाजी महाराजांचे समकालीन इतिहासकारांनी केलेले वर्णन व त्यांचे चित्र किती मिळतेजुळते आहे, याचा तपशील लेखकाने खूप सुंदररित्या दिलेला आहे. शिवाय त्यांनी वापरलेले संदर्भदेखील विश्वासार्ह असेच आहेत. पुस्तक वाचताना आपण देखील शिवाजी महाराजांना त्या रूपामध्ये मनोमन पाहत जातो. शिवरायांची चित्रे काढणाऱ्या अनेक व्यक्ती इतिहासाच्या पानांमध्ये हरवलेल्या आहेत. याची देखील खंत वाटते. खरंतर त्या चित्रकारांचे अगणित उपकार भारत देशावर आहेत, असे म्हणावे लागेल.
शिवाजी महाराजांव्यतिरिक्त आज विविध ठिकाणी उपलब्ध असणारी छत्रपती संभाजी महाराज, शाहू महाराज, शहाजीराजे, औरंगजेब यांची चित्रे देखील या पुस्तकांमध्ये कलर प्रिंट स्वरूपात पाहायला मिळतात. शिवाजी महाराजांचे बोलणे कसे होते? यावर सेतुमाधवराव पगडी वगळता अन्य इतिहासकारांनी फारसा विचार केलेला दिसत नाही. याविषयी देखील एक प्रकरण या पुस्तकामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे.
एकंदरीत शिवरायांचे व्यक्तित्व शोधण्याचा प्रयत्न लेखकाने केलेला दिसतो आणि तो यशस्वी देखील झालेला आहे.

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com