Tuesday, June 14, 2022

पृथ्वीवर माणूस उपराच - डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी

विज्ञानविश्वामध्ये वाद आणि प्रतिवाद चालूच असतात. जोपर्यंत एखादी गोष्ट पूर्णपणे १००% पुराव्यानिशी सिद्ध होत नाही, तोपर्यंत विज्ञानामध्ये त्या गोष्टीला अनेक अस्पष्ट बाबी घेरलेल्या असतातच. मानवाची पृथ्वीवरील उत्क्रांती हादेखील असाच एक बहुसंशोधनाचा विषय आहे. उत्क्रांतीचा सिद्धांत व त्यातील 'मिसिंग लिंक्स'चा आधार घेऊन इंग्रजीमध्ये तसेच मराठीमध्ये देखील पुस्तके लिहिली गेली आहेत. त्यातीलच डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी यांनी लिहिलेले हे पुस्तक, 'पृथ्वीवर माणूस उपराच'.
याच विषयावर बाळ भागवत यांचं देखील पुस्तक उपलब्ध आहे. ते पुस्तक वाचले तेव्हा अनेकांनी मला नाडकर्णी यांच्या या पुस्तकाविषयी देखील सुचवलं होतं. तसं पाहिलं तर दोन्ही पुस्तकांचा गाभा हा एकच आहे. तसेच त्यामध्ये नमूद केलेल्या काही घटना व गोष्टी देखील सारख्याच जाणवतात. पृथ्वीवर आज अतीप्रगत झालेला मानवप्राणी हा मूळचा पृथ्वीवरील नाहीच, या सिद्धांताला पुष्टी देण्यासाठी केलेला अभ्यास या पुस्तकामध्ये विस्कटून सांगितलेला आहे.
पृथ्वीवर फार वर्षांपूर्वी अस्तित्वात असणाऱ्या अनेक संस्कृतींचा तसेच त्या संस्कृतीमध्ये तयार झालेल्या रचनांचा अभ्यास करून अनेक अतिमानवी गोष्टींचा उहापोह या पुस्तकामध्ये केलेला आढळतो. अशा अनेक प्रश्नांची शास्त्रीय उकल आजही मनुष्यप्राण्याला करता आलेली नाही. यामुळेच उत्क्रांतिवादाचा सिद्धांत अजूनही १००% शास्त्रज्ञांनी स्वीकारलेला नाही! हजारो वर्षांपूर्वी पृथ्वीवर तयार झालेल्या किंबहुना तयार केल्या गेलेल्या रचना या आजदेखील प्रगत मानवाला तयार करणे शक्य नाही. मग त्यांचा उगम झाला तरी कसा? या प्रश्नाचे उत्तर लेखकाने अप्रत्यक्षरीत्या दिलेले आहे. माणसाची उत्क्रांती या पृथ्वीवर झालेली नाहीच. तो दुसऱ्या ग्रहावरून पृथ्वीवर आलेला आहे! मानव प्राण्यांमध्ये आणि अन्य प्राण्यांमध्ये असलेले छोटे छोटे फरक व त्यांचे विवेचन यास निष्कर्षापर्यंत पोहोचत असल्याचे लेखक म्हणतात. अर्थात ही संशोधकांची एक बाजू आहे. ती समजून घेणे देखील तितकेच गरजेचे वाटते. हजारो वर्षांपूर्वी इजिप्तमध्ये तयार केले गेलेले पिरॅमिड्स आणि पॅसिफिक महासागरातील ईस्टर आयलँडवर तयार केलेल्या भल्यामोठ्या मानवी आकृती यांचे गूढ अजूनही आजच्या वैज्ञानिकांना शोधता आलेले नाही. याच कारणास्तव हजारो वर्षांपूर्वीचा मानव कसा होता? या प्रश्नाचे उत्तर आजही तंतोतंत मिळत नाही. यावर आणखी खोलात जाऊन संशोधन होणे निश्चितच गरजेचे वाटते. तरच याविषयी अवैज्ञानिकपणे बोलणारी तोंडे बंद होतील!



 

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com