आजच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये गाडीने प्रवास करत असताना आपले सर्वात जवळचे सोबती म्हणजे "गुगल मॅप्स" होय. एका आकडेवारीनुसार जगात सर्वाधिक गुगल मॅप्सचा वापर भारतामध्ये होतो. आता तर कारच्या नवीन आवृत्तीमध्ये गाडीच्या सॉफ्टवेअरमध्येच गुगल मॅप्सचा अंतर्भाव केलेला आहे. अगदी छोटे-छोटे रस्ते शोधण्यासाठीदेखील आपण गुगल मॅपचा वापर करतो. एका अर्थाने प्रवासामध्ये आपल्या सारथ्यासारखे काम गुगल मॅप करत आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. अर्थात या गुगल मॅपचा वापर मी देखील सातत्याने करत असतो. परंतु मागच्या काही महिन्यांमध्ये मला आलेले तीन अनुभव या ठिकाणी मी मांडत आहे. ज्याचे निष्कर्ष मला निश्चितपणे सांगता येणार नाही. अर्थात ज्याने त्याने स्वअनुभवाने ठरवावेत, असे मला वाटते.
१. पुणे ते धुळे
पुण्याहून गाडी मार्गाने पहिल्यांदाच मी धुळ्याच्या दिशेने प्रवास केला. गुगल मॅपवर दोन वेगवेगळे रस्ते दाखवत होते. एक रस्ता सिन्नर-निफाड-चांदवड मार्गे धुळ्याकडे जाण्याचा होता, जो अंतराने सर्वात कमी होता. आणि दुसरा रस्ता सिन्नर होऊन थेट समृद्धी महामार्गाने प्रवास करत छत्रपती संभाजीनगर मार्गे धुळ्याच्या दिशेने दाखवत होता. ज्याला सर्वात कमी अंतर लागणार होते. समृद्धी महामार्गाने गेल्यास गुगल मॅपच्या अनुमानाप्रमाणे २५ मिनिटे कमी लागणार होती. परंतु पहिला रस्ता माझ्या बऱ्यापैकी ओळखीचा होता म्हणून आम्ही त्याच रस्त्याने जाण्याचे ठरवले. आम्ही समृद्धी महामार्ग पुणे-नाशिक महामार्गाद्वारे ओलांडल्यानंतर मला सर्वात जवळचा रस्ता नाशिकच्या दिशेने आहे, असे गुगल मॅपने दाखवले. परंतु तो रस्ता देखील मी घेतला नाही. सिन्नर-निफाड-चांदवडमार्गे धुळ्याला पोहोचलो. माझ्या पोहोचण्याची वेळ ही समृद्धी महामार्गाने दाखवलेल्या वेळेपेक्षाही पाऊण तासाने कमी होती, हे विशेष. याचा अर्थ गुगल मॅपने मला माझा प्रवासमार्ग सर्वाधिक वेळ खाऊ आहे, असे सांगितले होते. परंतु प्रत्यक्षात तसे काहीच घडले नाही. समृद्धी महामार्गाने गेल्यास मला साडेचारशे रुपये अतिरिक्त टोल लागणार होता. शिवाय नाशिकमार्गे गेल्यावरही तब्बल तीन अतिरिक्त टोलनाके लागणार होते. तसेही काही झाले नाही. मी या रस्त्याने देखील वेळेच्या आधीच पोहोचलो. मग गुगल मॅपने मला हे दुसरे रस्ते प्राधान्य क्रमाने का दाखवले असावेत?
२. पुणे ते पेण
पुण्याहून पेणला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग आणि पुणे-मुंबई जुना महामार्ग. या दोन्हींच्या वेळेमध्ये पंधरा मिनिटांचा फरक दाखवत होते. अर्थात यावेळेस मला पुणे मुंबई दृतगती महामार्ग प्राधान्य क्रमाने दाखवण्यात आला. परंतु त्या मार्गाने मी प्रत्यक्षात गेलो नाही. जुन्या महामार्गाने प्रवास केला. जेव्हा प्रत्यक्ष पेणमध्ये पोहोचलो तेव्हा फक्त चारच मिनिटांचा अतिरिक्त वेळ गेला होता! या प्रवासासाठी जर मी एक्सप्रेस वेने गेलो असतो तर ६२० रुपये टोल पडला असता. याउलट जुन्या महामार्गाने केवळ १४१ रुपये टोल लागला!
३. पुणे ते पणजी
पुण्याहून गोव्याला जाण्यासाठी बरेच वेगळे रस्ते आहेत. शिवाय कुठल्या ना कुठल्या घाटाने तुम्हाला कोकणामध्ये उतरावे लागते. गुगल मॅप प्राधान्य क्रमाने जो रस्ता दाखवते तो कोल्हापूर-निपाणी आणि आंबोली घाटामार्गे पणजी असा जातो. याशिवाय ताम्हिणी घाट, अनुस्कुरा घाट, अंबा घाट, फोंडा घाट या मार्गे देखील आपण कोकणात उतरू शकतो. यापैकी ताम्हिणी घाटामार्गे गेल्यास कुठेही कोणताही टोल नाका लागत नाही. तर आंबोली घाटामार्गे गेल्यास तब्बल पाच टोलनाके लागतात! त्याहून विशेष म्हणजे दोन्हीही रस्त्यांचा वेळ जवळपास प्रत्यक्षपणे सारखाच आहे. पुणे-कोल्हापूर रस्त्यावर सध्या खूप मोठ्या प्रमाणात रस्ता दुरुस्तीची तसेच रुंदीकरणाची कामे चालू आहेत. त्यामुळे अनेकदा रहदारीचा सामना करावा लागतो. अशावेळी प्रवासाचा वेळ देखील वाढत आहे. तो गुगल मॅप दाखवत नाही. याउलट मुंबई-गोवा महामार्गावर काही ठराविक ठिकाणे सोडली तर रस्ता बऱ्यापैकी रिकामा असतो. तरी देखील गुगल मॅप या रस्त्याला प्राधान्यक्रम देत नाही. इथे देखील, का? हा प्रश्न पडतो.
ही सर्व माझी स्वतःची उदाहरणे आहेत. यातून निष्कर्ष काढला तर असे लक्षात येते की गूगल मॅप जवळपास प्रत्येक वेळी आपल्याला ज्या ठिकाणी टोलनाके आहेत तोच रस्ता सर्वात जलद आहे असेच दाखवते. यामागे गुगल मॅपची नक्की काय बनवाबनवी आहे, हे समजत नाही. आपण आंधळेपणाने गुगल मॅपच्या रस्त्यांवर विश्वास ठेवतो. अर्थात गुगलने ती विश्वासार्हता कमावलेली आहे म्हणूनच... परंतु काही छोट्या छोट्या गोष्टी अजूनही आपल्या ध्यानात आलेल्या नाहीत. कदाचित आपल्या विश्वासार्हतेच्या बळावरच गुगल मॅप नक्की कोणती बनवाबनवी करत आहे, हे अजूनही समजलेले नाही.
--- तुषार भ. कुटे

No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com