Monday, January 25, 2010

आणखी एक सुवर्णक्षण.


२३ जानेवारी २०१०... मराठी चित्रपटसृष्टीतील आणखी एक सुवर्ण दिवस ठरला. या दिवशी मराठी चित्रपटांनी सात विविध श्रेणींमध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये बाजी मारली. मराठी चित्रपटसृष्टीला तीच्या उत्कृष्ट दर्जाची मिळालेली ही पावतीच आहे.
महाराष्ट्रीय चित्रपट रसिक हिंदीच्या मागे लागले असताना मराठी चित्रपट मात्र विविध पायऱ्या चढत उंची गाठत चालला आहे. ’जोगवा’ या चित्रपटाचा योग्य सन्मान राष्ट्रीय स्तरावर झाला. यापूर्वी या चित्रपटाने राज्य पातळीवर विविध पुरस्कार प्राप्त केले होते. ’जोगवा’च्या संगीताविषयी मला काही गोष्टी नमूद कराव्याशा वाटतात. मराठीतील सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक कोण? हा प्रश्न आज जर विचारला तर एकच नाव समोर येते.. अजय-अतुल. या संगीतकार द्वयीने आजवर उत्तमोत्तम संगीत मराठी चित्रपटांना दिले आहे. त्यांच्या कोणत्याही चित्रपटाने संगीत ’नापास’ झालेले नाही. आज गाजत असलेल्या ’नटरंग’ चे संगीत याच द्वयीने दिले आहे. मराठी चित्रपटांना अजय-अतुल आज देत असलेले संगीत हिंदीच्या धांगडधिंगा संगीतापेक्षा कितीतरी पटींनी श्रेष्ठ आहे. याचा पुरावा राष्ट्रीय पुरस्कारामुळे मिळाला. पुरस्कार समितीने असे नमूद केले होते की, ’जोगवा’ ला संगीत देताना त्यांनी लोकसंगीतातील बारकावे अगदी उत्कृष्टरीत्या टिपले आहेत. चित्रपटाचे संगीत ऐकल्यावर याची प्रचिती मात्र निश्चितच येते. ज्यांना अजय-अतुलच्या या कसबाबद्दल माहिती नसल्यास त्यांनी खालील निवडक मराठी गाणी जरूर ऐकावीत:
गीत: मल्हार वारी. चित्रपट: अगं बाई अरेच्चा...!
गीत: आई भवानी. चित्रपट: सावरखेड... एक गाव.
गीत: चांगभलं. चित्रपट: तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं
गीत: लल्लाटी भंडार. चित्रपट: जोगवा.
यावरूनच अजय-अतुलच्या संगीतातील जादू कळून येईल. निदान त्यांच्यामुळे तरी मराठी भाषिक मराठी संगीत ऐकू लागतील!
दुसरी गोष्ट म्हणजे ’जोगवा’ला सर्वोत्कृष्ट गायक व गायिकेचाही पुरस्कारही मिळाला आहे. ’जीव रंगला’ हे गायक हरीहरन यांनी गायलेले कदाचित पहिलेच मराठी गीत असावे. त्याच गीतासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. श्रेया घोषालने या चित्रपटातील दोन गीते गायली आहेत. त्यातील ’जीव रंगला’ हे द्वंद्व गीत आहे. मराठी गाण्यासाठी दोन अमराठी गायकांना पुरस्कार मिळण्याची ही पहिलीच वेळ असावी. मराठी चित्रपट व संगीतासाठी हा शुभसंकेतच आहे. अमराठी गायकांनी मराठी संगीताला अधिकाधिक योगदान द्यावे, अशीच सर्व मराठी रसिकांची इच्छा आहे.
उपेंद्र लिमये हा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला पहिलाच मराठी नायक. खरोखर खूप आश्चर्य वाटते की, मागच्या ५५ वर्षांच्या कालावधीत एकदाही मराठी नायकाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला नव्हता! उपेंद्रने ती पोकळी भरून काढली. त्याचे मनापासून अभिनंदन...! आपल्या मराठी चित्रपटांची भरभराट अशीच पुढे चालू राहो ही अपेक्षा...
हिंदी रसिकांच्या लाडक्या अमिताभ बच्चननेही ’विहीर’ हा मराठी चित्रपट काढला आहे. शिवाय तो अनेक चित्रपट महोत्सवात गाजतोही आहे. त्याचे यश पाहून ’बिग बी’ ने आणखी दोन मराठी चित्रपट काढायचे ठरविले आहे. विशेष म्हणजे पुढील काही काळात तो हिंदी चित्रपट तयार करत नाहीये. यातून मराठी भाषिकांनी काहीतरी बोध घेण्यासारखा आहे. आता निदान मधुर भांडारकर व आशुतोश गोवारीकर यासारख्या दिग्दर्शकांनी केवळ पैशाचे गणित न पाहता मराठी चित्रपटसृष्टीलाअ योगदान देण्याची वेळ आली आहे...

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com