Saturday, January 23, 2010

फोडा आणि राज्य करा...

तेलंगाणा राज्याला परवानगी दिल्यानंतर महाराष्ट्राच्या वेगळ्या विदर्भाचा मुद्दा सध्या विदर्भवादी नेते जोरात लाऊन धरू लागले आहेत. नुकताच त्यांनी विदर्भ बंद यशस्वी करून दाखविला त्यामुळे हे नेते भलतेच चेतावले आहेत. विशेष म्हणजे या वेगळ्या विदर्भाला डॉ. आंबेडकरांचे नातूही पाठिंबा देताना दिसत आहेत. डॉ. आंबेडकरांनी भाषावार प्रांतरचना सुचविली होती व ती अमलातही आणली. याच संकल्पनेला छेद देणारी संकल्पना आज महाराष्ट्रात राबविली जाऊ लागली आहे, याचाच खेद वाटतो.
खरं तर महाराष्ट्रापासून विदर्भ हा मागासच राहिला, असे सांगून वैदर्भिय नेते स्वत:चाच नाकर्तेपणा जगजाहिर करत आहेत. विदर्भ मागास राहिला, याला ते स्वत:च मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहेत. सरकारमध्ये राहून त्यांना त्यांच्या प्रदेशाचा विकास करवून घेता येत नसेल, तर लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचा जनतेला काय उपयोग झाला? हाही प्रश्न उभा राहतो. वेगळे राज्य तयार करवून विकास करता येत असेल, तर महाराष्ट्राचे कोकण, खानदेश, मराठवाडा असेही तुकडे करण्यास काहीच हरकत नसावी. त्यामुळे अखिल मराठी जनांचे कल्याण होणार असेल, तर महाराष्ट्राचे तुकडे नक्कीच करावेत!
सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी विदर्भाचा मुद्दा लाऊन धरल्याने त्यामागच्या उद्देशाविषयी निश्चितच शंका निर्माण होते. याच नेत्यांनी झगमगता पश्चिम महाराष्ट्र डोळ्यासमोर दाखवून वैदर्भिय जनतेला तोडण्याचे उद्योग चालू केले आहेत. त्यामध्ये त्यांचा मोठा स्वार्थ दडल्याचे दिसून येते. वेगळे राज्य निर्माण झाल्यावर सर्व काही वेगळे होणार व ’खाण्याचे’ नवे मार्ग या नेत्यांना मिळणार आहेत, हे पूर्ण सत्य आहे. याउलट हाच पैसा सध्याच्या विदर्भप्रदेशासाठी वापरला तर काय हरकत आहे?
या सर्वातून एक गोष्ट मात्र दिसून येते की भारतीय जनमानसात ’आम्हाला वेगळं व्हायचंय’ ही वृत्ती मोठ्या प्रमाणात बळावताना दिसते. मग त्यासाठी कोणतीही कारणं पुरेशी ठरू लागली आहेत. ’विविधतेत एकता’ असं या देशाचे वर्णन केलं जाते. कदाचित पुढील काही काळात अन्य देश भारताचे दाखले ’विविधता नसावी’ याकरीता देऊ लागतील. विविधता असेल तर भारतासारखी हालत होईल, असेही ते म्हणतील.
त्यामुळे सद्यपरीस्थितीत तरी विदर्भ राज्याला मान्याता देऊ नये, असे मला वाटते. अन्यत: आजपासून बरोबर दोन वर्षांनी भारत हे ५० विविध राज्यांचे ’संघराज्य’ असणार आहे, यात शंकाच नाही...!

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com