Monday, July 19, 2010

मी, लेन विषयीचा गदारोळ आणि ‘टाईम्स’ …


’फेसबुक’ या सोशल नेटवर्किंग साईटवर राज्याचे गृहमंत्री श्री. आर. आर. पाटिल यांनी जेम्स लेनच्या पुस्तकबंदीबाबत मांडलेली मते सर्वांनी वाचावित. याकरिता ती मी इथे पुनर्प्रकाशित करित आहे.

सुप्रभात,

जेम्स लेन यांच्या ‘हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया ‘ या पुस्तकावर बंदी घालण्याच्या संदर्भात माझी मते ठाम आहेत. काल एका राष्ट्रीय स्तरावरील इंग्रजी वृत्तपत्रात जेम्स लेन यांच्या पुस्तकावर घातलेल्या बंदीसंदर्भात मी घेतलेला पुढाकार आणि त्याच वेळी माझ्या ब्लॉग वर मी माझ्या लोकशाही प्रेमाविषयी व्यक्त केलेला विचार हे परस्परविरोधी असल्याचे मत एका पत्रकाराने व्यक्त केले आहे. मी लोकशाही प्रेमी असल्याने मला त्यांच्या मताबद्दल पूर्ण आदर आहे.

त्यांच्या मताबद्दल आदर व्यक्त करून आणि माझे मत अबाधित ठेऊन मी नम्रपणे नमुद करू इच्छितो की “लोकशाही म्हणजे अराजक नव्हे”. लोकशाहीमध्ये जनता सार्वभौम असते. तिचे मत हे अंतिम असते आणि निवडून येणारे लोकप्रतिनिधी जनतेच्या या मताचे प्रतिनिधित्व करतात. महाराष्ट्रातील जनतेने विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये जवळजवळ एकमताने या पुस्तकावर बंदी घालण्याचे मत व्यक्त केलेले आहे.

महाराजांविषयी अनुदगार काढणार्‍या त्या पुस्तकातील ‘ती वाक्ये’ पूर्णपणे संदर्भरहित व सांगोवांगीच्या गप्पांतून आली आहेत. ते इतिहास संशोधन अजिबात नव्हे तर ती एक विकृती आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हे देशाच्या अस्मितेचे आणि स्वातंत्र्याचे प्रतिक आहेत. याही पलीकडे जाऊन छत्रपती शिवाजी महाराज हे अख्ख्या देशाचे प्रेरणास्थान आहेत. रवींद्रनाथ टागोरांसारख्या एका जागतिक दर्जाच्या प्रतिभाशाली व्यक्क्तीमत्वाने स्वतः छत्रपतींवर ‘स्वातंत्र्याची प्रतिमा’ ही कविता लिहिली होती. जिचे ‘जयतु शिवाजी’ हे मराठी भाषांतर स्वर्गीय पु. ल. देशपांडे यांनी केले आहे. शिवाय जे महापुरुष आज हयात नसल्याने आपल्या बाजूने खुलासा करू शकत नाहीत त्या महापुरुषांची बेधडक सांगोवांगीच्या गप्पांतून बदनामी करणं हे लोकशाही विरोधी आहे व ही लोकशाहीतील एक विकृती आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही.

जगातली कोणतीही लोकशाही आणि त्यातून येणारे स्वातंत्र्य हे अनिर्बंध असत नाही. ‘Statue of Liberty’ ज्या अमेरिकेत आहे तिथे सुद्धा हे स्वातंत्र्य अनिर्बंध उपभोगता येत नाही. तिथेही जगताना अनेक निर्बंध आहेत. स्वातंत्र्यातून येणारी जबाबदारी ही तितकीच महत्वाची आहे हे सर्वांनी लक्षात ठेवायला हवे.

या सार्‍या गोष्टींचा विचार करून लोकप्रतिनिधींच्या एकमताने आणि जनतेच्या संपूर्ण पाठिंब्याने या पुस्तकावर बंदी घालण्याचा हा निर्णय घेतलेला आहे. ही बंदी घालण्यासाठी मी पुढाकार घेतला याचा मला नितांत अभिमान वाटतो, वाटणार आणि वाटत राहील याची नोंद कृपया त्या ‘राष्ट्रीय स्तरावरच्या इंग्रजी वृत्तपत्राच्या पत्रकाराने’ आणि इतर सर्व लोकशाही प्रेमी नागरिक आणि माध्यमांनी घ्यावी ही नम्र विनंती.

माझ्या सर्व वाचकांना नमस्कार आणि प्रेम,
आबा

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com