Showing posts with label tamil movie. Show all posts
Showing posts with label tamil movie. Show all posts

Sunday, January 18, 2026

वाळाई

रोजच्या जीवनामध्ये सातत्याने संघर्षाचा सामना करणाऱ्या शिवानंद या मुलाची ही गोष्ट. तामिळनाडूतल्या एका छोट्याशा गावामध्ये तो राहत असतो. घरामध्ये आई, बहीण आणि तो असे तिघेजण. एका जमीनदाराच्या भल्यामोठ्या केळीच्या शेतांमध्ये केळीचे घड वाहण्याचे काम त्यांचे कुटुंब करत असते. शिवानंद शाळेत जायचा परंतु सुट्टीच्या दिवशी त्याला आई आणि बहिणीला मदत म्हणून केळांचे घड वाहण्याचे काम करावे लागायचेच. यातून येणारे त्यांचे उत्पन्न अत्यंत तुटपंजे होते. स्वतः शिवानंद शाळेमध्ये हुशार मुलगा होता. तो अतिशय आनंदाने शाळेमध्ये शिकायला जायचा. परंतु त्याला केळी वाहण्याचे काम आवडत नव्हते. ते टाळण्याकरता तो विविध क्लुप्त्या आजमावायचा. या गावातील जवळपास सर्वच लोक त्या केळीच्या शेतावर कामाला होते. एक दिवस जरी कामाला गेले नाही तरी जगण्यासाठी संघर्षाची परिस्थिती होती. बागायतदार देखील इथल्या लोकांना पिळून काम करायला लावायचा. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये शिवानंदाचे शिक्षण आणि काम सातत्याने चालू होते. आपली बहीण वेंबू आणि सख्खा मित्र शेखर हे त्याच्या अत्यंत जवळचे. परंतु एके दिवशी अचानक एक भयावह घटना त्याच्या आयुष्यामध्ये घडते. अगदी नशिबानेच तो स्वतः त्यातून वाचतो. आणि चित्रपट संपतो. 
चित्रपटाची गोष्ट गरिबीचे आणि संघर्षाचे विविध कंगोरे दाखवणारी आहे. आजही भारतातील बऱ्याच ग्रामीण भागातील लोकांना रोजच्या जीवनासाठी संघर्ष करावा लागतो. शिक्षण की उदरभरण? यातून एकाची निवड करावी लागते. त्याचेच प्रातिनिधिक उदाहरण म्हणजे शिवानंद होय. शेवटच्या प्रसंगांमध्ये तर त्याला कित्येक वेळा अन्नापासून वंचित व्हायला लागते. आपल्या जवळच्या व्यक्ती गेल्यानंतरही पोटाची भूक त्याला शांत बसू देत नाही. एका हृदय द्रावक घटनेने चित्रपटाचा शेवट होतो. शेवटी दाखवलेल्या श्रेय नामावलीमध्ये सदर घटना चित्रपट सत्यघटनेवर आधारित आहे, असे दाखवले जाते. त्यामुळे शेवट मनामध्ये अधिकच घट्ट रुतून बसतो.

--- तुषार भ. कुटे

 


 

Monday, October 31, 2022

इमाईका नोदिगल

'सिरीयल किलर' हा सस्पेन्स थ्रिलर चित्रपटांसाठी असणारा नेहमीचा विषय. या चित्रपटांमध्ये सातत्याने खून होत राहतात आणि या सर्व खुनांमध्ये एक विशेष साम्य असतं. ते सामने शोधण्यासाठी पोलिसांना बराच वेळ आणि बुद्धी खर्च करावी लागते. काहीशा अशाच पार्श्वभूमीचा परंतु वेगळ्या वाटेने जाणारा तमिळ रहस्यपट म्हणजे 'इमाईका नोदिगल'! 


सन २०१८ मध्ये अजय ज्ञानमुथू यांच्या दिग्दर्शनाखाली हा चित्रपट तयार झाला होता. नयनतारा या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेमध्ये आहे. सीबीआय ऑफिसर अंजली विक्रमादित्यनची मुख्य भूमिका तिने साकारलेली आहे. चित्रपटाची सुरुवात तिच्यापासूनच होते. एक धडाडीची आणि ध्येयाने प्रेरित झालेली आयपीएस ऑफिसर कशी असावी? हे तिच्या व्यक्तिरेखेतून दिसून येते. पण तिला आव्हान देणारा एक व्यक्ती आहे, तो म्हणजे रुद्र. खरंतर हा रुद्र काही वर्षांपूर्वी मृत झालेला होता. पण तरी देखील तो खून करत सुटला आहे. हा रुद्र आहे तरी कोण? त्याच्याभोवती फिरणारी कहानी या चित्रपटामध्ये चित्रीत करण्यात आलेली आहे.
तसं पाहिलं तर आधीच सांगितल्याप्रमाणे हा वेगळ्या वळणाचा चित्रपट आहे. काही अनपेक्षित धक्के तो देऊन जातो आणि अखेरीस असत्याचा पडदा दूर होऊन सत्य समोर येते. दक्षिणात्य चित्रपटांमध्ये असणारा वेग या चित्रपटामध्ये आपल्याला पुन्हा दिसून येतो आणि सस्पेन्स थ्रिलर च्या पठडीत मोडणारा आणखी एक चित्रपट पाहण्याची तो मजा देऊन जातो.

Saturday, March 6, 2021

डी मोंन्टे कॉलनी

तमिळ चित्रपट सृष्टीमध्ये हॉरर या विषयाला विविध प्रकारे हाताळण्यात आलेले आहे. काही चित्रपटांमध्ये हॉररला देखिल अनेक पैलू पाहण्यात येतात. अशाच वेगळ्या धाटणीचा चित्रपट म्हणजे डी मोंन्टे कॉलनी होय. नावावरून एखाद्या कॉलनीमधील भूतांसंदर्भात हा चित्रपट असावा, असे दिसते आणि ते खरे देखील आहे. परंतु पूर्ण चित्रपटभर हि कॉलनी दिसून येत नाही.
या चित्रपटामध्ये आहेत चार मुख्य कलाकार जीवनाशी संघर्ष देत जगत आहेत. भविष्यामध्ये काय वाढून ठेवले आहे, याची त्यांना कल्पना नाही. कदाचित तेच जाणून घेण्यासाठी ते ज्योतिषाकडे जातात. मग त्यांना स्वतःचे "खरेखुरे" भविष्य समजते. त्याच्या आदल्याच दिवशी सहज गंमत म्हणून ते चौघेही शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या डी मोंन्टे कॉलनी नावाच्या एका भुताटकी सदृश घरामध्ये गेलेले असतात. पंधरा-वीस मिनिटांनी मध्ये त्यांना तिथे काहीतरी भयावह आहे, याची जाणीव होते व ते तिथून निघून येतात. येताना चौघांपैकी एकाने तिथली "एक वस्तू" चोरून आणलेली असते. त्या वस्तूसोबतच घरातील पोर्तुगीज अधिकाऱ्यांचे एक भूत त्यांच्यासोबत येतं. आणि मग चित्रपटांमध्ये पुढील थरार सुरू होतो. डी मोंन्टे नावाच्या एका पोर्तुगीज अधिकाऱ्याने त्याच्या पत्नीसह घरातील सर्व नोकर यांची हत्या केलेली असते. शिवाय त्याचाही होरपळून मृत्यू झालेला असतो. हाच पोर्तुगीज अधिकारी आजही डी मोंन्टे कॉलनीवर आत्मा रुपाने राज्य गाजवत असतो. त्याची "ती" वस्तू शेकडो वर्षांपासून या बंगल्याच्या बाहेर गेलेली नसते. जी चौघेही जण तेथून घेऊन जातात. आता ती वस्तू परत त्या बंगल्यामध्ये येते का? येते तर कशी? याची कहाणी सांगणारा हा थरारपट आहे....




Saturday, October 31, 2020

ध्रुवांगल पथीनारू

पहाटे साडेचारची वेळ. तीन मित्र पार्टी करून भर पावसात आपल्या कारने घरी चालले आहेत. अचानक त्यांच्या कारसमोर एक व्यक्ती येते. अपघात घडतो. या अपघातात ती व्यक्ती मरण पावते. तिघेही त्या मृतदेहाला कुणाला शंका येऊ नये म्हणून गाडीच्या डिक्कीत टाकून घरी घेऊन येतात. दुसऱ्या दिवशी पोलिसांना रस्त्यावर स्वतःला गोळी झाडून आत्महत्या केलेली एक व्यक्ती सापडते. या घटनेच्या तपासासाठी पोलिस वरील तीन युवकांच्या बंगल्यावर येतात. त्यांची झडती घेतली जाते. परंतु काल मरण पावलेल्या व्यक्तीचा मृतदेह त्यांच्या गाडीच्या डिकीतुन गायब झालेला असतो. थोड्याच वेळात एका फ्लॅटमधून मधून एक मुलगी गायब झाली असल्याची तक्रार पोलिस स्टेशनमध्ये येते. पोलिस स्टेशनमधील इन्स्पेक्टर हा थंड डोक्याने विचार करणारा आहे. तो शांतपणे या सर्व घटनांचा पाठपुरावा करतो व त्यातील संबंध शोधून काढतो. एक अपघात, एक आत्महत्या व एक हरवलेली व्यक्ती यांचा एकमेकांशी काय संबंध असेल? या प्रश्नाभोवती फिरणारा रहस्यपट म्हणजे "ध्रुवांगल पथीनारू" होय. तसा हा चित्रपट फ्लॅशबॅकमध्ये दाखवला आहे. परंतु, शेवट मात्र वर्तमान काळातील आहे. तीन निरनिराळ्या घटनांमधील रहस्य क्षणोक्षणी उलगडत जातं. पण खरा गुन्हेगार कोण? हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. शेवटच्या मिनिटाला या प्रश्नाचे उत्तर मिळतं व कथेचा अनपेक्षित शेवट होतो.
२०१६ मध्ये प्रदर्शित झालेला हा तमिळ चित्रपट कार्तिक नरेन यांनी लिहिला व दिग्दर्शित केलेला आहे. रहस्य पटाची एक वेगळी आवृत्ती यात पहायला मिळते.