पहाटे साडेचारची वेळ. तीन मित्र पार्टी करून भर पावसात आपल्या कारने घरी
चालले आहेत. अचानक त्यांच्या कारसमोर एक व्यक्ती येते. अपघात घडतो. या
अपघातात ती व्यक्ती मरण पावते. तिघेही त्या मृतदेहाला कुणाला शंका येऊ नये
म्हणून गाडीच्या डिक्कीत टाकून घरी घेऊन येतात. दुसऱ्या दिवशी पोलिसांना
रस्त्यावर स्वतःला गोळी झाडून आत्महत्या केलेली एक व्यक्ती सापडते. या
घटनेच्या तपासासाठी पोलिस वरील तीन युवकांच्या बंगल्यावर येतात. त्यांची
झडती घेतली जाते. परंतु काल मरण पावलेल्या व्यक्तीचा मृतदेह त्यांच्या
गाडीच्या डिकीतुन गायब झालेला असतो. थोड्याच वेळात एका फ्लॅटमधून मधून एक
मुलगी गायब झाली असल्याची तक्रार पोलिस स्टेशनमध्ये येते. पोलिस स्टेशनमधील
इन्स्पेक्टर हा थंड डोक्याने विचार करणारा आहे. तो शांतपणे या सर्व
घटनांचा पाठपुरावा करतो व त्यातील संबंध शोधून काढतो. एक अपघात, एक
आत्महत्या व एक हरवलेली व्यक्ती यांचा एकमेकांशी काय संबंध असेल? या
प्रश्नाभोवती फिरणारा रहस्यपट म्हणजे "ध्रुवांगल पथीनारू" होय. तसा हा
चित्रपट फ्लॅशबॅकमध्ये दाखवला आहे. परंतु, शेवट मात्र वर्तमान काळातील आहे.
तीन निरनिराळ्या घटनांमधील रहस्य क्षणोक्षणी उलगडत जातं. पण खरा गुन्हेगार
कोण? हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. शेवटच्या मिनिटाला या प्रश्नाचे उत्तर
मिळतं व कथेचा अनपेक्षित शेवट होतो.
२०१६ मध्ये प्रदर्शित झालेला हा
तमिळ चित्रपट कार्तिक नरेन यांनी लिहिला व दिग्दर्शित केलेला आहे. रहस्य
पटाची एक वेगळी आवृत्ती यात पहायला मिळते.
Saturday, October 31, 2020
ध्रुवांगल पथीनारू
Saturday, October 17, 2020
रतशासन
दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये नाविन्य ठासून भरलेले आहे. अनेक चित्रपटांमधून लेखकाची व दिग्दर्शकाची मेहनत पदोपदी जाणवते. यात प्रकारातला तमिळ रहस्यपट म्हणजे "रतशासन" होय. मागील काही महिन्यांपासून विविध भाषांमधील अनेक रहस्यपट पाहिले. परंतु, हा चित्रपट मात्र थोडा वेगळ्या धाटणीचा आहे. शिवाय चित्रपटाची लांबी अडीच तासांची आहे. त्यामुळेच रहस्य आणि थरार दीर्घकाळापर्यंत ठासून भरल्याचे दिसते.
सन २०१८ मधील हा चित्रपट प्रेम कुमार यांनी दिग्दर्शित केला होता. अभिनेता विष्णू विशाल यात मुख्य भूमिकेमध्ये आहे. त्याची एक यशस्वी दिग्दर्शक होण्यासाठी धडपड चालू असते. एका सिरीयल किलरच्या गोष्टीवर त्याचं काम पूर्ण झालेलं असतं. परंतु कोणताही निर्माता त्याचा चित्रपट बनवण्यासाठी पुढे येत नाही. मग "दुर्दैवाने" तो पोलिसांची नोकरी स्वीकारतो. मागील काही वर्षांपासून आपल्या सीरियल किलरच्या स्टोरीवर काम केल्यामुळे त्याचा खूप मोठा अभ्यास यावर झालेला असतो. त्याचा फायदा शहरात घडत असलेल्या एका विचित्र खून शृंखलेचा माग काढण्यासाठी तो करतो. अशी या चित्रपटाची स्टोरी लाइन आहे.
रहस्यपट म्हटलं की, त्यात अनेक गोष्टींचा बारकाईने विचार करावा लागतो. अनेक शक्यता तपासाव्या लागतात. या सर्वांचा लेखकाने अतिशय बारीक अभ्यास केल्याचे या चित्रपटातून दिसून येते. पदोपदी तयार होणारे प्रश्न आणि निर्माण होणारे रहस्य, पुढे काय होईल? या प्रश्नाचे उत्तर शोध घेण्यास भाग पाडते. छोट्यातील छोटे सुगावे लेखकाने खूप उत्तमरित्या जमवून आणलेले आहेत. खरं तर एखाद्या पोलीस अधिकाऱ्याने गुन्ह्याचा तपास कसा व कोणत्या दिशेने करायचा असतो, यासाठी मार्गदर्शन करणारा असाच हा चित्रपट आहे. कथेतील चढ-उतार, दिशा, सातत्य आणि वेग याला तोडच नाही. त्यामुळे रहस्य पटाचा विचार करत असल्यास हा चित्रपट नक्की आणि नक्की पहा.

