Monday, April 12, 2021

गुढी: गौतमीपुत्राच्या विजयाचे प्रतिक

चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्षाचा पहिला दिवस. या दिवसाचे स्वागत महाराष्ट्रामध्ये गुढ्या उभारुन केले जाते. याच दिवशी महाराष्ट्राचा सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा अर्थात क्षत्रप राजा नहपान याचे हनन केले होते. या महान घटनेच्या निमित्ताने चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो. जागतिक कॅलेंडर अर्थात ग्रेगोरियन कॅलेंडर नुसार १ जानेवारी रोजी नवे वर्ष सुरू होत असते. महाराष्ट्रीय कालगणनेनुसार चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी नववर्ष सुरू होते. भारतातल्या सर्व भाषिक संस्कृतीमध्ये निरनिराळ्या दिवशी नववर्ष साजरे केले जाते. जसे गुजरात मध्ये दिवाळी पाडव्याला नववर्ष सुरू होते. तर पंजाब व बंगाल मध्ये ते बैसाखी म्हणून साजरे केले जाते. अनेक जण गुढीपाडव्याचा संबंध काही पौराणिक घटनांशी जोडतात. जर तसे असते तर गुढीपाडवा केवळ महाराष्ट्रातच साजरा केला गेला नसता.
सातवाहन हे नाव आपण इतिहासात अनेक वेळा ऐकतो. बऱ्याचदा त्याची त्रोटक माहिती दिलेली असते. हेच सातवाहन दोन हजार वर्षांपूर्वी राज्य करणारे महाराष्ट्राचे पहिले निर्माते होत. इसवी सन पूर्व २३० ते इसवी सन २३० अशी जवळपास साडेचारशे वर्षे सातवाहनांनी महाराष्ट्रावर सत्ता गाजवली व महाराष्ट्रीयांचा सांभाळ केला. महाराष्ट्रातील अनेक गिरिदुर्ग व लेण्या ही सातवाहनांची निर्मिती आहे. इसवीसन ७८ पासून शालिवाहन शक सुरु होतो. शालिवाहन हा मूळ शब्द "सालाहण" असा आहे. तसेच सातवाहन हेही मूळचे "छातवाहन" होय! याचा अर्थ पर्वत निवासी असा होतो. सिमुक सातवाहन हा सातवाहन घराण्याचा संस्थापक होता. त्याच्यामुळेच या घराण्यातील राज्यकर्त्यांना सातवाहन म्हटले जाते. इसवी सनाच्या सुरुवातीच्या कालखंडात महाराष्ट्र व बहुतांश भारतीय भूप्रदेशावर क्षत्रप या परकीय घराण्याची सत्ता होती. जुन्नर ही त्यांची राजधानी होती. तसेच पैठण, नाशिक सारखी व्यापारी केंद्रे बहुतांश महाराष्ट्र क्षत्रपांच्या अधिपत्याखाली होती. गौतमीपुत्र सातकर्णी हा सातवाहन घराण्यातील विसावा राजा होय. क्षत्रप राजा शकवंशीय नहपानाने गौतमीपुत्राच्या पूर्वज राज्यकर्त्यांवर वारंवार आक्रमणे करून सातवाहन सत्ता खिळखिळी करून टाकली होती. गौतमीपुत्राचा जेव्हा राज्याभिषेक झाला तेव्हा त्याच्याकडे केवळ साताऱ्याच्या आजूबाजूचा परिसर होता. कोकण, मराठवाडा, खानदेश परिसर नहपानाचा सत्तेखाली चालत असत. महाराष्ट्रीय प्रजा या राजवटीत गुलामीचे जीणे जगत होती. परंतु गौतमीपुत्र सातकर्णीने नहपानाविरुद्ध संघर्षाला सुरुवात केली. त्याने क्षत्रपांशी अनेक युद्धे केली. अखेर महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठे युद्ध सातवाहन व नहपानामध्ये नाशिकच्या गोवर्धन येथे इसवी सन ७८ मध्ये झाले. याच गौतमीपुत्राने नहपानाचा पराभव केला. तो दिवस होता चैत्र शुद्ध प्रतिपदा. नाशिकच्या पांडवलेणीतील एका शिलालेखात उल्लेख आहे, 'क्षहरात वंस निर्वंस करत' अर्थात गौतमीपुत्राची क्षत्रपांच्या निर्वंश करणारा राजा, अशी प्रशंसा केली आहे. गौतमीपुत्राने आपले साम्राज्य पूर्ण महाराष्ट्र व आंध्र प्रदेशातही वाढवले व महाराष्ट्राची खरी भरभराट सुरू झाली. सह्याद्रीतील दुर्गम गिरिदुर्ग बांधले गेले. पूर्वीपासूनच ग्रीक व रोमन सत्तांशी व्यापार चालू झाला होता. सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये सातवाहनांनी अनेक घाट तयार केले. गौतमीपुत्राने सातवाहनांची खरी ख्याती वाढवली. त्यामुळेच सातवाहनांना तीन समुद्रांचे पाणी प्यायलेले घोडे ज्याच्याकडे आहेत ते सातवाहन अर्थात त्रीसमुद्रतोयवाहन असे अभिमानाने म्हटले जाऊ लागले. गौतमीपुत्राच्या नावापुढे शकारी अशीही पदवी लावली जाते. यावरूनच शकांवरील विजयाचे महत्व प्रतीत होते. महाराष्ट्रीय जनता गेली १९४२ वर्षे गौतमीपुत्राच्या नहपानावरील विजयाचा दिवस साजरा करीत आहे. हा दिवस मराठी संस्कृतीतील साडेतीन मुहूर्तांपैकी एक दिवस मानला जातो. गुढी उभारताना सकाळी गौतमीपुत्राच्या नहपानावरील विजयाची आठवण महाराष्ट्रीयांनी करायलाच हवी.


 

2 comments:

  1. खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

    ReplyDelete

to: tushar.kute@gmail.com