Saturday, May 15, 2021

इमोजी: डिजिटल युगातील सर्वमान्य भाषा

सकाळी मोबाईल हातात घेतला आणि व्हाट्सअपचे मेसेज बघितले की बहुतांश सर्वच मेसेज इमोजीने भरलेले असतात. फेसबुकचही काहीच असंच आहे. ट्विटरही याला अपवाद नाही. शिवाय आज काल लिंक्डइनवर देखील इमोजीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. इंग्रजीमध्ये असं म्हटलं जातं, "पिक्चर सेज मोर दॅन वर्डस" अर्थात शब्दांपेक्षा चित्रे अधिक काही सांगून जातात. याच कारणामुळे शब्दांपेक्षा चित्र रूपात असलेल्या इमोजींचा वापर वाढत चाललेला आहे. किंबहुना स्मार्टफोन वापरणारा प्रत्येक जण त्यांचा अगदी सहजपणे वापर करत असतो. शिवाय शब्दांमध्ये लिहिण्यापेक्षा चित्रांमध्ये लिहिणे आज-काल सोपे होऊ लागले आहे. जवळपास सर्वच प्रकारच्या इमोजी आज मोबाईलमध्ये व सोशल मीडियावर उपलब्ध झालेल्या आहेत. म्हणूनच कमीत कमी शब्दांमध्ये व्यक्त होण्यासाठीचे एक उत्तम व प्रभावी माध्यम तयार झालेले आहे. नव्या पिढीची बहुतांश चॅटिंग ही याच स्वरूपामध्ये दिसून येते. ही भाषा चित्रांची असल्यामुळे ती सर्वमान्य आहे. यामध्ये चित्ररूपी भावनांमधून व्यक्त होता येते. ही भाषा अतिशय सोपी आहे. त्यामुळे इंटरनेटचा व सोशल मिडीयाचा वापर करणारा प्रत्येक जण या भाषेमध्ये व्यक्त होत असतो. अशी ही इमोजीची भाषा नक्की सुरू केव्हा झाली, ते बघूयात.
तुम्हाला आश्चर्य वाटेल पण इमोजीचा जन्म मागच्या शतकातला आहे. १९९९ मध्ये शिगेताका कुरिता नावाच्या जपानी विकसकाने इमोजी सर्वप्रथम तयार केले. दूरसंचार क्षेत्रातील आघाडीची जपानी कंपनी "डोकोमो" मध्ये कार्यरत असताना इमोजी त्याने तयार केली होती. दूरसंचार कंपन्यांमधील चढाओढ या काळामध्ये सुरू झाली होती. त्यातूनच इमोजीचा जन्म झालेला आहे. १२ x १२ पिक्सेलच्या १७६ इमोजी कुरिता याने तयार केल्या होत्या. आज त्या सर्व इमोजी 'न्यूयॉर्क म्युझियम ऑफ मॉडर्न आर्ट' मध्ये पाहता येतात. वातावरण, रहदारी, तंत्रज्ञान तसेच चंद्राच्या विविध कला अशा निरनिराळ्या थीमचा वापर करून तत्कालीन ईमोजी बनवल्या गेल्या होत्या. आज त्या अतिशय लोकप्रिय झालेल्या आहेत. सन २०१५ मध्ये 😂 या इमोजीला अर्थात LOL ला 'वर्ड ऑफ दी ईयर' म्हणून ऑक्सफर्ड शब्दकोशाने घोषित केले होते! म्हणजेच केवळ पंधरा वर्षांमध्ये इमोजीच्या भाषेतील शब्दांनी सर्वोच्च पातळी गाठली, असे म्हणता येईल. जागतिक महासत्ता असणाऱ्या अमेरिकेतील सत्ताकेंद्र अर्थात व्हाईट हाऊसने प्रकाशित केलेल्या आर्थिक अहवालामध्ये देखील इमोजींचा वापर पाहण्यात येतो!
सुरवातीच्या काळामध्ये याला 'इमोटिकॉन्स' म्हटले जायचे. त्यासाठी कीबोर्ड मधील अक्षरांचा विशिष्ट समूह उपयोगात आणायला जायचा. जसे हसण्याच्या स्माईलीसाठी :-) हे चिन्ह आणि नाराजीच्या स्माईलीसाठी :-( असे चिन्ह वापरले जात होते. "डोकोमो"मध्ये बनविण्यात आलेल्या या ईमोजी लवकरच लोकप्रिय होऊ लागल्याने स्पर्धक कंपन्यांनी देखील त्यांचा वापर सुरू केला. सन २००० नंतर जपानच्या बाहेर अनेक देशांमध्ये त्यांचा वापर व्हायला लागला. त्या काळामध्ये केवळ विशिष्ट मोबाईलसाठी ईमोजी उपलब्ध होत्या. परंतु सन २००७ मध्ये गुगलच्या पुढाकाराने इमोजीसाठी संगणकामध्ये युनिकोड देण्यात आला. युनिकोड प्रदान करणाऱ्या युनिकोड कन्सॉर्टियम या संस्थेने अनेक इमोजींना संगणकामध्ये वापर करण्यास मान्यता दिली. युनिकोड ही संगणकातील एक अधिकृत व सर्वमान्य कोडींग पद्धती आहे, ज्यामध्ये प्रत्येक अक्षराला एक जागतिक क्रमांक दिला जातो. त्यामुळे जगातील प्रत्येक संगणकांमध्ये ही अक्षरे वापरता येतात. शिवाय मोबाईलमध्येही त्यांचा वापर करता येतो. म्हणूनच इमोजींना देखील युनिकोड क्रमांक दिल्याने त्यांचा वापर सार्वत्रिक झाला. सन २००९ मध्ये ॲपल मधील या यासुओ किडा आणि पीटर एडबर्ग यांनी ६२५ नवीन इमोजींचा युनिकोडमध्ये अंतर्भाव केला. सन २०१० मध्ये या इमोजी सार्वत्रिक करण्यात आल्या. २०११ मध्ये ॲपल कंपनीच्या स्मार्टफोनवरील कीबोर्डमध्ये पहिल्यांदाच इमोजी दिसून आल्या. त्यानंतर दोन वर्षांनी अँड्रॉइड मोबाईलमधील कीबोर्डवर इमोजी दिसू लागल्या होत्या. आज युनिकोड कन्सॉर्टियमने हजारो इमोजी संगणकामध्ये वापरण्यास मान्यता दिलेली आहे. जवळपास जगातील सर्वच प्रकारच्या इमोजी संगणकात वापरता येतात. दरवर्षी शेकडो नव्या इमोजी युनिकोडमध्ये येत आहेत. सन २०१५ मध्ये युनिकोडने इमोजींचे स्किन टोन बदलण्याची देखील मान्यता दिली. ज्याद्वारे मानवी शरीराचे अंग असलेल्या ईमोजी आपल्याला त्वचेच्या विविध रंगांमध्ये वापरता येतात. इमोजी तयार करताना किंवा त्यांना मान्यता देताना युनिकोडला सर्वच गोष्टींची काळजी घ्यावी लागते. जगातील प्रत्येक वंश, धर्म, पंथ, भाषा, देश यांचा अपमान तर होत नाही ना? याची देखील त्यांना काळजी घ्यावी लागते.
मागच्या काही वर्षांमध्ये स्मार्टफोनचा वापर वेगाने वाढत चालल्याने आज स्मार्टफोनद्वारे होणारी माहितीची देवाण-घेवाण ईमोजीच्या भाषेमध्ये बदलताना दिसत आहे. जसे 'आय लव यू' साठी 🤎 हे चिन्ह वापरले जाते आणि लोटस ऑफ लाफ्टर अर्थात LOL साठी 😂 या चिन्हाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. इमोजींची लोकप्रियता पाहून ॲपल कंपनीने ऍनिमोजी अर्थात ऍनिमेटेड इमोजी नावाची नवीन संकल्पना तयार केली. तीदेखील बऱ्यापैकी लोकप्रिय झालेली आहे. आज युनिकोडने मान्यता दिलेल्या ३,५२१ ईमोजी अस्तित्वात आहेत. एखाद्या भाषेमध्ये देखील इतकी अक्षरे कदाचित अस्तित्वात नसावी. अर्थात डिजिटल वापरकर्त्यांची सर्वमान्य भाषा असल्यामुळे एवढ्या मोठ्या शब्दभांडाराचा अंतर्भाव तिच्यात असणे गरजेचेच होते. इमोजीची सध्याची प्रगती पाहता प्रिंट माध्यमांमध्ये देखील त्यांचा अशाच पद्धतीने वापर वाढला तर आश्चर्य वाटायला नको!



No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com