Monday, May 24, 2021

रुमाली रहस्य: गो. नी. दांडेकर

गोपाळ नीलकंठ दांडेकर यांच्या लेखणीतून उतरलेली ही ऐतिहासिक रहस्यकथा होय. या कादंबरीला पेशवेकालीन पार्श्वभूमी आहे. घाशीराम कोतवाल यातून एका वेगळ्या रूपामध्ये आपल्याला अनुभवायला मिळतात. याशिवाय नाना फडणवीस व रामशास्त्री प्रभुणे देखील या कथेतून आपल्याला भेटतात. कादंबरीची सुरुवात होते सर्जेराव घारे नावाच्या मराठा सरदाराच्या खुनापासून आणि थोड्याच वेळामध्ये आणखी एका खुनाची वार्ता घाशीराम कोतवाल यांच्या कानावर येते. लगेचच शोध पथके आपल्या कामाला लागतात. अंदाज बांधले जातात, तर्कवितर्क करून खुन्याच्या मार्गावर मराठी सरदार पाठवले जातात. उत्तरेकडून आलेले व बैराग्याचा वेश घेतलेले दोन जण वेगाने दक्षिणेकडे कूच करत असतात. मराठी सरदार त्यांचा निजामाच्या सीमेपर्यंत पाठलाग करतात. परंतु त्यांना यश येत नाही. तरीही प्रयत्नांची पराकाष्ठा करत वेगळ्या मार्गाने खुन्यापर्यंत पोहोचण्याचा विचार केला जातो. घाशीराम कोतवाल यांची दृष्टी व मराठा सरदारांचे साहस यातून या खुनाची उकल होते. परंतु ज्या गोष्टीसाठी हा खून झालेला असतो ती मात्र खोटी असते. मग खरी गोष्ट नक्की कुठे आहे? त्याची उकल शेवटच्या प्रकरणामध्ये करण्यात आलेली आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली ही कादंबरी अनेक रेखाचित्रांनी सजलेली आहे. त्यामुळे आपल्या डोळ्यासमोर प्रसंग उभे करण्यात ती निश्चितच यशस्वी होते. शिवाय गो. नी. दांडेकर यांचा रहस्यमय साहित्याचा हा प्रयोगही उत्कंठावर्धक शेवटाने संपतो. 



No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com