Wednesday, May 12, 2021

समांतर: अर्धी वेब सिरीज आणि अर्धे पुस्तक

मागच्या एक वर्षापासून वेब सिरीज हा प्रकार काही आता नवीन राहिलेला नाही. लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर वेब सिरीज रिलीज होत आलेल्या आहेत. मराठीमध्ये तशी त्यांची संख्या कमीच होती. पण हळूहळू हा ट्रेंड आता मराठीत देखील दाखल झालेला आहे. अशीच एक मराठी वेब सिरीज म्हणजे "समांतर" होय.
मागच्या वर्षभरामध्ये मराठीत सर्वाधिक चर्चिली गेलेली ही लोकप्रिय वेबसिरीज होय. मागील आठवड्यामध्ये एमएक्स प्लेयरवर पाहण्याचा योग आला. सुहास शिरवळकर यांच्या 'समांतर' या कादंबरीवर ही वेबसिरीज आधारलेली आहे. या कथेतील नायक कुमार महाजन याची भूमिका स्वप्निल जोशी याने साकारलेली आहे. तसेच त्याच्या पत्नीची अर्थात निमाची भूमिका तेजस्विनी पंडित हीने साकारली आहे. कुमार महाजन हा परिस्थितीने पीडित आणि सातत्याने अपयशाला सामोरे जाणारा एक युवक आहे. त्याचा मित्र वाफगावकर त्याला एका ज्योतिष सांगणार्‍या स्वामींकडे घेऊन जातो. त्यांचं भविष्य आजवर कधीही चुकलेले नसतं. परंतु हे स्वामी त्याचं भविष्य सांगायला नकार देतात. शिवाय त्याचा हात त्यांनी यापूर्वी पाहिलेला आहे, असेही ते सांगतात. त्यामुळे भविष्यामध्ये नक्की काय होईल? हे जाणून घेण्याची कुमारची आणखी तीव्र इच्छा तयार होते. त्यातच त्याला समजतं की, ज्या माणसाचा हात अगदी तंतोतंत त्याच्याशी जुळतो असा सुदर्शन चक्रपाणी नावाचा मनुष्य देखील अस्तित्वात आहे. मग शोध सुरू होतो..  या नव्या माणसाचा अर्थात सुदर्शन चक्रपाणीचा. त्याच्या शोधासाठी कुमारला अनेक दिव्ये पार करावी लागतात. परंतु तो जिद्द सोडत नाही. अखेरीस चक्रपाणीपर्यंत पोहोचतोच. या सुदर्शन चक्रपाणीची भूमिका नितीश भारद्वाज यांनी साकारलेली आहे. दोघांच्या हातांवरील रेषा समान असल्यामुळे दोघेही समांतर आयुष्य जगत आहेत, असं दिसून येतं. चक्रपाणी जे आयुष्य यापूर्वी जगलेला आहे, तसंच कुमारच्या बाबतीत होणार असतं. म्हणून त्याचं भविष्य सुदर्शन चक्रपाणीकडून जाणून घेण्याचाच त्याचा प्रयत्न असतो. तेव्हा त्याला सुदर्शनच्या आयुष्यातील डायऱ्या मिळतात आणि इथून पुढे सुरु होतो खरा थरार. सुदर्शनच्या आयुष्यातील घटना कुमार महाजनच्या आयुष्यात घडू लागतात. परंतु डायरीतल्या एका पानापाशी येऊन ही वेब सिरीज थांबते. त्यामुळे आता पुढे काय होणार? या प्रश्नाचे उत्तर मात्र मिळत नाही. माझेही काहीसे असेच झाले. वेब सिरीजमध्ये रंगलेला थरार अचानकपणे थांबतो. तेव्हा पुढे काय होणार? या प्रश्नाचे उत्तर देण्याचा शोधण्याचा आपणही त्याच्या परीने प्रयत्न करू लागतो. या वेब सिरीजचा पुढचा भाग कधी येईल, ते माहीत नाही. त्यामुळे सुहास शिरवळकर यांचे समांतर पुस्तकच वाचायला घेतले.
एकूण १९६ पानांच्या या पुस्तकातील कथेनुसार वेब सिरीज १२२ व्या पानापर्यंत तयार झालेली आहे. तिथूनच पुढे पुस्तक वाचायला सुरुवात केली. हा काही वेगळाच अनुभव होता. अर्धी कथा व्हिडिओ रूपात आणि अर्धी कथा वाचनाच्या रुपाने अनुभवायला मी सुरुवात केली. तसं पाहिलं तर पुस्तकावरूनच जशीच्या तशी वेबसिरिज तयार करण्यात आलेली आहे. पात्रांची नावेही तीच आहेत फक्त कथाविस्तार करण्यासाठी काही घटनांचा अंतर्भाव वेब सिरीजमध्ये करण्यात आल्याचा दिसतो. पुस्तकाची १२२ ते १९६ ही पाने उत्सुकतेने वाचून काढली. कथा तुटत असल्याचे बिलकुल जाणवले नाही. या भागांमध्ये मात्र दोन नव्या पात्राची एन्ट्री झाल्याचे दिसते. पुस्तक वाचताना पदोपदी कुमार महाजन म्हणजे स्वप्नील जोशीच असल्याचे जाणवत होते. प्रत्येक घटना वेबसिरीजमध्ये दाखवलेल्या परिस्थितीप्रमाणे पुढे चालली आहे, याचाही अनुभव येत होता. अखेरीस एका मोठ्या रहस्य भेदाने या कादंबरीचा शेवट झाला. खरोखर शिरवळकरांनी लिहिलेल्या एका अप्रतिम रहस्य कथेचा हा शेवट असल्याचे जाणवले. काही कथा लिहिताना लेखकाच्या सर्जनशीलतेची कसोटी लागते. तशीच ही कादंबरी होय. शिरवळकरांच्या अनेक उत्तम कलाकृतीपैकी समांतर ही सुद्धा एक कलाकृती आहे. भय आणि रहस्य या दोन्ही प्रकारात मोडणारी ही दीर्घ कथा आहे. यापूर्वीही अनेकांनी समांतर वेबसीरिज आणि पुस्तक वाचले असावे. परंतु अर्धी वेबसिरिज आणि अर्धे पुस्तक असा प्रयोग करणारा आणखी कोणी आहे का? असाही प्रश्न मला विचारावासा वाटतो.
दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी केलेले दिग्दर्शन अप्रतिम आहे. परंतु वेब सिरीज म्हटलं की, गलिच्छ शिव्यांचा भडिमार करायचा आणि किसिंग सीनचा अंतर्भाव करायचा, हे कदाचित दिग्दर्शकाने आधीच मनोमन ठरवले असावे. तसा याचा कादंबरीशी काहीच संबंध नाही. शिवाय शिरवळकरांच्या या 'दुनियादारी'नंतरच्या या दुसऱ्या पुस्तकाचा नायकही स्वप्नील जोशी आहे, हे विशेष! स्वप्निल जोशी आणि नितीश भारद्वाज हे दोघे कदाचित दूरदर्शनवर अनेक वर्षांपूर्वी प्रसारित झालेल्या श्रीकृष्ण मालिकेनंतर पहिल्यांदाच एकत्रित आले असावेत. यातही त्यांनी एकमेकांशी जोडलेल्या भूमिका केलेल्या आहेत.
एकंदरीत काय, वेबसिरीज बघा किंवा कादंबरी वाचा, शिरवळकरांच्या कथेतील थरार आपल्याला रोमांचित करून सोडतो, हे मात्र नक्की!




No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com