Showing posts with label marathi medium. Show all posts
Showing posts with label marathi medium. Show all posts

Sunday, January 25, 2026

क्रांतीज्योती आणि प्रमोशन

मराठी चित्रपट तिकीटबारीवर चालत नाहीत, अशी अनेकांची बोंब असते. मराठी चित्रपट हे उत्तम असतातच. किमान ८० टक्के तरी! मग चित्रपटगृहामध्ये गल्ला जमवण्यासाठी ते कमी का पडतात? या प्रश्नाचे उत्तर कदाचित मराठी चित्रपटांच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांना माहीत असावे. परंतु तरीदेखील आपला चित्रपट चालावा, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा, त्यांनी पहावा यासाठी ते कष्ट घेत नाहीत.
सन २०२५ मध्ये जेवढे मराठी चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाले त्या सर्वांची एकत्रित कमाई जवळपास ९८ ते ९९ कोटी रुपये होती. एवढी कमाई दक्षिणेतले अनेक चित्रपट सहज करत आलेले आहेत. मग मराठी चित्रपटांना हे साध्य का होत नसावे? मूलतः मराठी चित्रपट हे प्रमोशनसाठी कमी पडतात, हे निर्विवाद सत्य आहे. चित्रपट बनवला, नंतर वितरकांना दिला आणि थिएटरला लागला की लोक आपोआप आपला चित्रपट बघायला येतील, असे निर्मात्यांना वाटत असते. शिवाय अतिशय कमी बजेटमध्ये चित्रपट तयार झालेला असतो. त्यात चित्रपट महामंडळाचे अनुदान देखील असते. म्हणून थोडी का होईना लाखांमध्ये कमाई झाली तरी चित्रपटाचे पैसे वसूल होतात. कदाचित याच कारणास्तव चित्रपटाचे प्रमोशन करण्यास निर्माते, दिग्दर्शक कमी पडत असावेत. ही निर्मात्यांची मानसिकताच तयार झाली आहे, असं दिसतं. याउलट अन्य भाषेतील चित्रपट त्यांच्या प्रदेशामध्ये तसेच दूरचित्रवाणीद्वारे, रेडिओद्वारे आणि भेटीगाठी व कार्यक्रमांद्वारे देखील चित्रपटाचे मोठ्या प्रमाणात प्रमोशन करतात. ही गोष्ट मराठी चित्रपटांच्या बाबतीत अगदीच नगण्य आहे.
सध्या मराठी चित्रसृष्टीमध्ये कमाईचे कोटीच्या कोटी आकडे पार करणारा चित्रपट म्हणजे "क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम" होय. या चित्रपटाचा विषय उत्तम आहेच. मांडणी देखील छान आहे. विषय तर अप्रतिमच आहे. परंतु चित्रपटाच्या चमुने तो प्रदर्शित झाल्यानंतर ज्या वेगाने, सातत्याने, वैविध्याने त्याचे प्रमोशन केले आहे, त्यामुळेच अजूनही चित्रपटगृहात गर्दी खेचताना दिसतो. आज त्याची कमाई २० कोटीच्या वर गेलेली आहे. ती का? तर यामागे दिग्दर्शक हेमंत ढोमे, निर्माती क्षिति जोग आणि चित्रपटातील अन्य कलाकारांनी त्याच्या प्रमोशनवर घेतलेले कष्टच कारणीभूत आहेत. अनेकदा निर्माते आपल्या चित्रपटाचे प्रमोशन केवळ मुंबई आणि पुण्यासारख्या शहरी भागातच करतात. कारण या बाहेरील शहरांमध्ये त्यांना हव्या त्या सुविधा कदाचित मिळत नसाव्यात. किंबहुना मराठी प्रेक्षकच मराठी चित्रपटांविषयी अनुत्सुक असावेत. पण प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्याशिवाय त्यांना आपला चित्रपट समजणार कसा? या प्रश्नाचे उत्तर त्यांनी शोधायला हवे. 'क्रांतीज्योती'च्या पूर्ण संघाने महाराष्ट्रातल्या विविध भागांमध्ये जाऊन चित्रपटगृहांमध्ये पोहोचून त्याचे प्रमोशन केले. शिवाय चित्रपटाच्या विषयाशी निगडित असणाऱ्या अनेक सेलिब्रिटींना, रिलस्टार्सना आणि समाज माध्यमांवर लोकप्रिय असणाऱ्या अनेक व्यक्तींना त्यांनी सोबत घेतले होते. त्या सर्वांच्या समाजमाध्यमांवरील पानांवर चित्रपटाचे प्रमोशन झाले. सातत्याने या चित्रपटातील कलाकार त्यांच्या समाजमाध्यमांवरील अकाउंटवर विविध पोस्ट करत होते. लोकप्रिय गाण्यांवरती रिल्स तयार होत होते. म्हणूनच चित्रपट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. आणि अजूनही हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये गर्दी खेचत आहे.
मागच्या वर्षी सर्व मराठी चित्रपटांनी केवळ ९८ कोटी कमावले होते तर यावर्षी पहिल्याच दिवशी प्रदर्शित झाल्याने चित्रपटाने २० कोटीपेक्षा अधिक कमाई केली आहे. हा मराठी चित्रपट निर्मात्यांसाठी एक धडा आहे आणि शिकवण देखील. केवळ 'माऊथ पब्लिसिटी'च्या जोरावर सर्वच चित्रपट लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. आपल्या चित्रपट हे उत्तम असतातच. परंतु ते बनवून आणि चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करून फायदा नाही. ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचायला हवेत. त्यासाठी प्रदर्शनापूर्वी आणि प्रदर्शनानंतरही प्रमोशनच्या विविध क्लुप्त्या त्यांना निश्चितच वापराव्या लागतील. लोकांना दिग्दर्शक आणि कलाकार माहीत झाल्यानंतर पुढील चित्रपटाची ते निश्चितच प्रतीक्षा करतील. हे समजून घेतले पाहिजे. बाकी मराठी चित्रपटसृष्टी गुणवत्तेच्या बाबतीत कोणाच्याही मागे नाही. फक्त आपल्याकडे जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे वाटते.

--- तुषार भ. कुटे 

 


Wednesday, January 21, 2026

प्रिय हेमंत ढोमे

प्रिय हेमंत ढोमे,

तुझा "क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम" हा चित्रपट पाहिला.... नाही आवडला... 

कारण या चित्रपटामध्ये तू खूप सार्‍या चुका केलेल्या आहेत... 

तुला माहीत नाही का आम्ही मराठी लोक फक्त आडनावाने मराठी आहोत.... आम्हाला आमच्या भाषेशी काही घेणेदेणे नाही... आम्हाला ज्ञान नको आहे... आम्हाला फक्त चकचकीत गुळगुळीत दिसणाऱ्या आणि भरमसाठ सुविधा देणाऱ्या इंग्रजी शाळा हव्या आहेत... तू हे काही दाखवलं का?.... नाही ना.... मग तू चुकलास!

आम्ही जरी मराठी शाळेतून शिकलो असलो तरी आज विविध कंपन्यांमध्ये उच्चपदस्थ ठिकाणी काम करतो आहे. आम्हाला मराठीतून शिकल्याची लाज वाटते. म्हणूनच आमच्या मुलांना देखील आम्ही मराठी शाळेमध्ये शिकवत नाही.... आमच्यासाठी इंग्रजी म्हणजेच सर्वकाही... तू हे काही दाखवलं का?.... नाही ना.... मग तू चुकलास!

मातृभाषेतून शिक्षण म्हणजे आपुलकीचं आणि हसत खेळत शिक्षण... मीही असेच शिकलो... अनेकदा शिकत गेलो... अनुभव संपन्न झालो.... आमच्या भाषेतील शिक्षणातून आमचं व्यक्तिमत्व घडवलं.... पण आम्हाला आमच्या मुलांना यातलं काहीच द्यायचं नाहीये..... त्यांच्यामध्ये कृत्रिमता आणायची आहे.... त्यांच्याकडून सर्व काही रट्टा मारून, घोकून, पाठ करून घ्यायचं आहे... आणि काही वर्षानंतर त्याला खोऱ्याने पैसा ओढताना पाहायचं आहे.... हेही तू दाखवलं नाहीस... म्हणजे तू चुकलासच!

आम्हाला आमच्या शिक्षकांनी आत्मीयतेने शिकवलं. अवघड गोष्टी सहज आणि सोप्या करून दाखवल्या. आजही त्या आमच्या डोक्यामध्ये एकदम फिट बसलेल्या आहेत. पाढ्यांचा तर विषयच नाही... 'पाचा साते किती?' असं कोणी विचारलं तर लगेचच ३५ हे उत्तर येतं.... पण याचा वास्तविक जीवनात काही उपयोग आहे का?... नाही... आमच्या मुलांना आम्हाला हे सर्व काही द्यायचं नाहीये... त्यांच्या शिक्षकांनी शिकवावं आणि निघून जावं.... आमच्या मुलाचं नाव त्याने लक्षात ठेवलं नाही तरी चालेल... काय चाटायची आहे ती आत्मीयता?.... हेही तू दाखवले नाहीस.... ही पुढची चूक.... 

आमच्याकडे आहे भरपूर पैसा... आम्हाला तो उधळायचा आहे..  इंटरनॅशनल, युनिव्हर्सल आणि ग्लोबल स्कूलच्या नावाखाली... उद्या आमच्या मुलाने आम्हाला विचारायला नको की तुम्ही माझ्या शिक्षणावर खर्च का नाही केला?... म्हणून करतो आम्ही खर्च... म्हणून आम्हाला हव्या असतात इंटरनॅशनल शाळा आणि त्यातल्या एसीवाल्या क्लासरूम... हे सुद्धा तुझ्या चित्रपटात नाही... म्हणजे तू परत चुकला... 

मराठी शाळा टिकल्या तरच मराठी भाषा टिकेल... असं तू म्हणतोस.... 
काय करायचं आहे भाषा टिकून? मेली तर मेली.... फार फार तर काय होईल? मराठी संस्कृती नष्ट होईल.... महाराष्ट्राची ओळख नष्ट होईल.... आम्हाला काय त्याचं? आम्ही कणा नसलेली आणि मराठी आडनावे घेऊन मिरवणारी माणसं आहोत....

- तुझा चित्रपट न आवडलेला एक मराठी प्रेक्षक 

(तुषार भ. कुटे यांच्या लेखणीतून)


Saturday, July 27, 2024

एक मार्गदर्शन

एका तंत्र शिक्षण कार्यक्रमामध्ये माझे प्रशिक्षण सुरू होते. जवळपास महिनाभराचा कार्यक्रम होता. बहुतांश विद्यार्थी मन लावून अभ्यास करताना दिसत होते. त्यातीलच एक विद्यार्थी सकाळी बरोबर वेळेवर वर्गात पोहोचायचा, अतिशय तन्मयतेने सर्व तासिकांना हजेरी लावायचा आणि दिलेला अभ्यास देखील वेळेवर पूर्ण करायचा.
एक दिवस दुपारी जेवणाची मधली सुट्टी झाली. मी बाहेर निघत असतानाच त्याने मला थांबवले आणि बोलू लागला,
“नमस्कार सर, मी तुमचं फेसबुक प्रोफाईल बघितलं.”
त्याच्या चेहऱ्यावरील माझ्याबद्दलची उत्सुकता बघून मी देखील चमकलो. तो पुढे बोलू लागला,
“सर तुमच्या सगळ्या पोस्ट मराठी मधून असतात. खूप भारी वाटतं वाचायला. आपल्यातलंच कोणीतरी लिहिलेलं आहे असं वाटतं. इथं शिकवताना तुम्ही सर्वकाही इंग्रजीतून शिकवता. ते पण छान वाटतं आणि सर्वकाही समजतं. तुम्ही कोणत्या शाळेतून शिकला आहात सर?”
त्याच्या या प्रश्नाने माझ्या चेहऱ्यावर आपोआपच स्मित उमटले. आणि मी त्याला उत्तर दिले.
“अर्थातच मराठी शाळेत. माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये झालेलं आहे. आणि दहावीपर्यंत पूर्ण मराठी माध्यमातून शिकलेलो आहे.”
“मग तुम्ही इतकं चांगलं इंग्रजी कसं बोलू शकता?”, त्याचा पुढचा प्रश्न.
“कसं आहे मित्रा… जर तुमचं तुमच्या मातृभाषेवर प्रभुत्व असेल तर तुम्ही इतर कोणतीही भाषा अतिशय सहजपणे शिकू शकता. माझंही असंच झालय. इंग्रजी शिकताना, बोलताना मी इतर कुठल्याही अन्य भाषेचा विचार केला नाही. किंवा पर्याय देखील शोधला नाही. बाहेरून आपल्या भागात आलेले लोक मराठी कसे बोलू शकतात? कारण त्यांनी जर मराठी ऐकली तरच हे शक्य आहे. तसेच मी देखील करतो. तुम्ही इंग्रजी ऐकली तरच तुम्ही ती बोलू शकता. आणि मातृभाषेतून शिकल्यामुळे मला कोणतीही गोष्ट अतिशय पटकन समजायला लागते. कदाचित याचमुळे मराठी इतकीच इंग्रजी देखील मला सहज जमत असावी.”
याशिवाय त्याला मार्गदर्शनपर इतर अनेक गोष्टी मी सांगितल्या. त्याला देखील त्या पटल्या. एक वेगळाच उत्साह त्याच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. शिवाय त्याचा आत्मविश्वास वाढविण्यास माझी मदत झाली, याचे देखील मला समाधान लाभले. 

Saturday, November 18, 2023

जगाची भाषा

जगभरात कुठेही गेलं की इंग्रजीच भाषा वापरतात, असा भारतीयांचा गोड गैरसमज आहे. याच कारणास्तव मागील काही वर्षांपासून इंग्रजी शाळांचं पेव सुटलेलं दिसतं. जगाची भाषा म्हणून आजकाल प्रत्येक जण आपल्या मुलांना इंग्रजी शाळेमध्ये घालताना दिसतो. असेच एक जण आमच्या मित्राच्या ओळखीतल्या निघाले.
त्यांचा मुलगा आयसीएसई नावाच्या आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या शाळेमध्ये चिंचवडमध्ये शिकतो. त्याचे वडील एका मल्टिनॅशनल अर्थात बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये कामाला आहेत. कदाचित परदेशातच सेटल व्हायचं म्हणून त्यांचे प्रयत्न चाललेले दिसतात. एकदा देश निश्चित झाला की, आपल्या कुटुंबासह ते त्या देशात स्थायिक होणार होते. अखेरीस त्यांना युरोपातील क्रोएशिया या देशात जाण्याची संधी मिळाली. एकंदरीत तिथलं वातावरण उत्तम... पगारही चांगला म्हणून त्यांनी आपल्या मुलाला आणि पत्नीला इथेच बोलवायचे निश्चित केले होते. परंतु त्यांना नंतर समजले की, या देशात कुठेही इंग्रजी शाळा नाही. सर्व शिक्षण त्यांच्या अधिकृत भाषेत अर्थात क्रोएशियन भाषेमध्ये चालते. म्हणूनच आता ते कात्रीत सापडले आहेत. जगाची भाषा इंग्रजी म्हणून मुलगा चौथीपर्यंत इंग्रजीमध्ये शिकला, आता क्रोएशियामध्ये स्थायिक व्हायचं म्हटल्यावर इंग्रजी काहीच कामाची नाही, हे त्यांच्या ध्यानात आलं. अजूनही त्यांचा निर्णय झालेला नाही!
एकंदरीत काय जगभरातील सर्वच देश मुलांना आपल्या भाषेमध्ये शिक्षण देत आहेत. आपण मात्र इंग्रजीला कवटाळून बसलेलो आहोत. मुलं इंग्रजीतून रट्टा मारताहेत, मार्क मिळवत आहेत, पण ज्ञान मिळवत आहेत का? हा मोठा प्रश्न पडतो. ज्ञानाधारित शिक्षण पद्धतीला जगाने स्वीकारले असतानाही भारत मात्र आपल्या देशाबाहेर उडण्याची स्वप्ने पाहतो आहे. मुलांना परकीय भाषेमध्ये शिक्षण देत आहे. ज्ञान जाऊ द्या, फाडफाड इंग्रजी बोलता आले पाहिजे हे त्यांच्या मनाने ठरवलेले आहे. पण नक्की आपला मार्ग योग्य आहे का? याची चाचपणी मात्र त्यांनी केलेली नाही. अजूनही अनेकांना हे समजलेले नाही की, इंग्रजी शिकणे आणि इंग्रजीतून शिकणे यात जमीन आसमानाचा फरक आहे.


 

Monday, April 10, 2023

पहिली ट्रॉफी

गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत असलेला तो क्षण आज अखेर आलाच. आमच्या ज्ञानेश्वरीने तिच्या शाळेसाठी मिळवलेली पहिली ट्रॉफी तिला आज प्रदान करण्यात आली. शाळेच्या पहिल्याच वर्षी तिने शाळेसाठी प्रतिनिधित्व करून ही ट्रॉफी मिळवून दिली. घरी पोहोचल्यावर तिचा आनंद आज गगनात मावत नव्हता.
मागील महिन्यामध्ये चिंचवडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धांपैकी तिने चित्रकला, हस्ताक्षर आणि फॅन्सी ड्रेस स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला होता. यापैकी हस्ताक्षर आणि चित्रकला स्पर्धा शाळेमध्येच घेण्यात आली. तर फॅन्सी ड्रेस स्पर्धेसाठी आम्ही तिला घेऊन चिंचवडमध्ये प्रत्यक्ष स्पर्धास्थळी पोहोचलो होतो. तिथे पिंपरी चिंचवड मधील बहुतांश शाळांमधील शालेय स्पर्धक सहभागी झाले होते. फॅन्सी ड्रेस स्पर्धेत तिला पारितोषिक मिळता मिळता राहून गेले. आपल्यालाही सर्वांसमोर ट्रॉफी मिळावी, अशी तिची मनोमन इच्छा होती. त्यासाठी तिने मेहनतही घेतली होती. पण या स्पर्धेत तिचे स्वप्न पूर्ण झाले नाही. आणि एक दिवस अनपेक्षितपणे चित्रकला स्पर्धेत सर्व शाळांमधून तिच्या गटात ती तृतीय क्रमांकावर आल्याचे समजले. परंतु ज्या दिवशी ट्रॉफी दिली जाणार होती त्याच दिवशी ती आजारी असल्याने घरी होती. तेव्हापासूनच आपल्याला ट्रॉफी कधी मिळणार, याची उत्सुकता तिला आणि आम्हाला देखील होती. आज अखेरीस मुख्याध्यापकांच्या हस्ते शाळेसाठी तिने मिळवलेली ही ट्रॉफी सर्वांसमक्ष तिला देण्यात आली. तिची स्वप्नपूर्ती झाली होती. नेमकी आजच शाळेची बस सुमारे अर्धा तास उशिरा आली. पण याचे देखील तिला भान नव्हते. घरी आल्यावर तिच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद आमच्या डोळ्यात देखील आनंदाश्रू घेऊन आला. तिने अभिमानाने सर्वांना ही ट्रॉफी दाखवली. तिच्यासाठी ती पुढील प्रवासासाठी प्रेरणास्त्रोत ठरणार याची आम्हाला खात्री आहे. आजवर आम्ही देखील बऱ्याच ट्रॉफी मिळवल्या. पण आज घरी आलेल्या या ट्रॉफीचे मोल या सर्वांपेक्षा अधिक आहे. 



 

Tuesday, January 19, 2021

ज्ञानार्थी विरुद्ध घोकंपट्टीवाले

पुणे विद्यापीठामध्ये अभियांत्रिकी क्षेत्रात प्राध्यापक म्हणून काम करत असताना अनेकदा विद्यार्थ्यांच्या तोंडी परीक्षा घेण्याची वेळ आली. बाहेरच्या महाविद्यालयातून परीक्षा घेण्यासाठी एखादा शिक्षक आला की त्याचा दरारा वेगळाच असायचा. याचा अनुभव मी बर्‍याचदा घेतला आहे. प्रत्यक्ष तोंडी परीक्षा चालू झाली की, परीक्षा खोलीच्या बाहेर घोळक्या घोळक्याने मुलं अभ्यास करत बसलेली दिसायची. आपल्याला नक्की कोणता प्रश्न विचारला जाईल, या प्रश्नांचे काहूर जवळपास सर्वांच्याच मनात माजलेले असायचे. यात एक गोष्ट निरीक्षणाने मला निश्चितच समजली. काहीसा भेदरलेला चेहरा आणि थोडा आत्मविश्वासाचा अभाव असलेली मुले आपल्या मातृभाषेतून शिकलेली असावी तर चेहऱ्यावर आत्मविश्वास दाखवणारी मुले बहुतांश इंग्रजी माध्यमातून शिकलेली असायची. जेव्हा प्रत्यक्ष तोंडी परीक्षेला सुरुवात होत असे त्यावेळेस मुलांच्या चेहऱ्यावरुनच त्यांची ओळख होत होती. पण आत्मविश्वासात फरक असला तसाच त्यांच्या ज्ञानामध्ये ही त्याच प्रमाणात फरक दिसून यायचा. मराठी माध्यमातून किंवा स्वतःच्या मातृभाषेतून शिकणारी मुले इंग्रजी आत्मविश्वासाने बोलू शकत नव्हती. पण त्यांचे प्रात्यक्षिकाचे ज्ञान मात्र खूप उत्तम असायचे. दुसरीकडे इंग्रजी फाडफाड बोलणारी मुले फक्त आम्हा परीक्षकांना इंग्रजीतले मोठमोठाले शब्द टाकून गोंधळात टाकण्याचा प्रयत्न करायची. समोरचा बसलेला व्यक्ती हा कोणी तरी मूर्ख आहे, ज्याला आपण अस्खलितपणे इंग्रजीत काहीही बोललो तरी तो लगेच प्रभावित होईल, अशा अशा प्रयत्नात ही मुले असायची. अक्कलशून्य पद्धतीने इंग्रजीमध्ये बडबड करत समोरच्याला वेड्यात काढायची कामे ही मुले व्यवस्थित करत होती. परंतु त्यांच्यापेक्षा कित्येक पावसाळे अधिक बघितलेले आम्ही परीक्षेत मात्र त्यांचा डाव व्यवस्थित ओळखून होतो. तेव्हाच मातृभाषेतली ज्ञानार्थी शिक्षण पद्धती व इंग्रजीतली घोकंपट्टीतून आलेली शिक्षण पद्धती यांच्यातला खराखुरा फरक लक्षात आला. मातृभाषेतील शिक्षण घेतलेल्या मुलांना विषय व्यवस्थित समजलेला असायचा, परंतु त्यांना इतरांसारखा तो अस्खलितपणे इंग्रजीमध्ये मांडता येत नव्हता. हाच काय तो फरक. यातून एक गोष्ट मात्र खूप खूप चांगल्या पद्धतीने विश्लेषण करता आली की, मातृभाषेतून शिकलेले मुले उत्तम प्रकारे ज्ञानप्राप्ती करतात किंबहुना त्यांना ती पहिल्यापासूनच सवय झालेली असते. एकदा सवय लागल्यावर मग भाषा बदलली तरी काही फरक पडत नाही. याउलट परभाषेतून शिकलेल्या विद्यार्थ्यांची स्थिती असते. पहिल्यापासूनच अनेक गोष्टी न समजल्याने त्यांना रट्टा मारायची अर्थात घोकंपट्टी करण्याची सवय झालेली असते. हेच शिक्षण आहे, असं कदाचित त्यांना वाटत असतं. पण जसं फाडफाड इंग्रजी बोलणं प्रतिष्ठा मिळवून देतं त्याहीपेक्षा तुमचं ज्ञान तुम्हाला अधिक प्रतिष्ठा मिळवून देतं असं अनुभवावरून मला वाटतं. 

आपल्या मातृभाषेतून शिक्षण घेतल्यावर आलेले ज्ञान इंग्रजीत मांडायचे असल्यास त्यावर थोडी मेहनत घेण्याची गरज आहे. माझ्यासारख्या मातृभाषेतून शिक्षण घेतलेल्या अनेकांनी अशी मेहनत घेऊन इंग्रजीवर प्रभुत्व प्राप्त केले आहे. एक मात्र नक्की आहे कि, तुमचा तुमच्या भाषेचा पाया पक्का असेल तर तुम्ही कोणतीही भाषा सहजरित्या आत्मसात करू शकता. आपल्याला इंग्रजी भाषा शिकणे जितके सोपे आहे, त्यापेक्षा एखाद्या इंग्रजाला मराठी भाषा शिकणे अवघड आहे, हेही तितकेच खरे!